-
भारतातील स्मार्टफोन मार्केटवर चिनी कंपन्यांचा दबदबा आहेच. मात्र त्याचबरोबर भारत हा चिनी अॅप्ससाठीही मोठी बाजारपेठ आहे. लाखो भारतीय अनेक चिनी अॅप्स वापरतात. यामध्ये अगदी गेमिंग अॅप्सपासून ते सोशल मिडिया अॅप्सपर्यंतच्या अनेक अॅप्सचा समावेश होतो. याचबरोबर काही युटिलीटी म्हणजेच ब्राऊझरसारखे अॅप्सही आहेत. अनेकदा हे अॅप्स चिनी असल्याचे युझर्सला ठाऊकही नसते. त्यातच आता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अॅप्ससंदर्भात इशारा दिला आहे. भारत सरकारने या अॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिली आहे. ही ५२ अॅप्स सुरक्षित नसून या अॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आपण या फोटोगॅलरीमध्ये भारतीयांकडून वापरले जाणारे आणि सर्वात लोकप्रिय असणाऱ्या चिनी अॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत.
-
टिक-टॉक : भारतामधील सर्वाच लोकप्रिय चिनी अॅप म्हणजे टिक-टॉक. छोटे व्हिडिओ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे हे अॅप्लिकेशन करोडो भारतीयांच्या मोबाइलमध्ये आहे. या अॅपला एक अरबहून अधिकवेळा प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करण्यात आलं आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे अॅप्लिकेशन नवीन नवीन विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. टिक-टॉक सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत पहिल्या स्थानी आहे.
-
पबजी : एकाच वेळी अनेकांना खेळता येणारा पबजी हा देशातील सर्वात लोकप्रिय मोबाइल गेम झाला आहे. या गेममध्ये एकाचवेळेस चार खेळाडू वेगवेगळ्या बॅटलग्राउण्डवर म्हणजेच युद्धभूमीवर खेळू शकतात. हा मोबाइल गेम १० कोटींहून अधिक जणांनी डाउनलोड केला आहे. या गेमचे लाइट म्हणजेच कमी मेमरी लागणारे व्हर्जनही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
-
युसी ब्राउझर: नावावरुनच हे अॅप्लिकेशन इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी वापरले जात असल्याचे समजते. हे अॅप यूसी वेब या कंपनीने तयार केले आहे. ही कंपनी चीनमधील अलिबाबा ग्रुपशी संबंधित आहेत. गुगल क्रोमनंतर सर्वात लोकप्रिय मोबाइल ब्राउझरच्या यादीमध्ये या अॅपचा नंबर लागतो. हे अॅप ५० कोटींहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.
-
हॅलो : हॅलो हे एक सोशल नेटवर्किंग अॅप आहे. हे अॅप बाईट डान्स कंपनीने तयार केलेले आहे. टिक-टॉकही याच कंपनीच्या मालकीचे आहे. भारतामध्ये हे अॅप वापरणारे ५० लाख युझर्स आहेत. या अॅपमध्ये अनेक भारतीय भाषा उपलब्ध आहेत. या अॅपवर मजेदार व्हिडिओ आणि स्टेटस शेअर केले जातात. १० कोटींहून अधिक वेळा हे अॅप गुगल प्लेवरुन डाउनलोड करण्यात आलं आहे.
-
वीमेट : टिक-टॉक प्रमाणेच वीमेट हे ही एक छोटे व्हिडिओ बनवण्याचे अॅप आहे. या अॅपवरही मोठ्या प्रमाणात भारतीय युझर्स आहे. हे अॅप खास करुन तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. भारतामध्ये हे अॅप वापरणारे करोडो युझर्स आहेत.
-
एक्झेण्डर : शेअरइट इतके हे अॅप लोकप्रिय नसले तरी या अॅपच्या मदतीनेही फाइल शेअर करता येतात. हे अॅप असणारे दोन फोन एकमेकांना कनेक्ट होऊ शकता. या अॅपची खास गोष्ट म्हणजे फाइलचा आकार कितीही मोठा असला तरी काही सेकंदात त्या ट्रान्फर करता येतात. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन १० कोटींहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.
-
ब्यूटी प्लस : फोटो एडिटींगसाठी आणि फिल्टर्स असलेले सेल्फी काढण्यासाठी लाखो भारतीय हे अॅप वापरतात. या अॅपच्या मदतीने फोटो एडीट करण्याबरोबरच फोटोंना इफेक्टही देता येतात. तसेच फोटो काढतानाच फिल्टर वापरण्याची सुविधा या अॅपमध्ये असल्याने ते तरुणांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालं आहे. हे अॅप चीनमधील मीटू (Mietu) कंपनीने तयार केलं आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप १० कोटींहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.
-
यू व्हिडिओ : व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर लहान लहान व्हिडिओ स्टेटस ठेवण्यासाठी अनेकजण या अॅपची मदत घेतात. या अॅपवरुन अनेक व्हिडिओ स्टेटस डाउनलोड करता येतात. हे डाउनलोड केलेले व्हिडिओ स्टेटस इतर सोशल मिडियावर शेअर करता येतात. हे अॅप ५ कोटींहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.
-
शेअरइट : एका मोबाइलमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये डेटा आणि माहिती पाठवण्यासाठी अनेक जण शेअरइट वापरतात. या अॅपच्या मदतीने स्मार्टफोनवरुन कंप्युटरवरही फाइल ट्रान्सफर करता येते. हे अॅप एक अरबहून अधिकवेळा प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करण्यात आलं आहे.
-
कॅम स्कॅनर : शेअरइटप्रमाणेच दैनंदिन जीवनात रोजच्या वापरातील अॅप म्हणजे कॅम स्कॅनर. कागदपत्रांचे पीडीएफ, जेपीजी इमेजेस बनवण्यासाठी वापरण्यात येणारे कॅम स्कॅनर हे चिनी कंपनीची निर्मिती आहे. हे अॅप १० कोटींहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. हे अॅप चीनच्या सीसी इंटेलिजेन्स कॉर्पोरेशनने तयार केलं आहे. काही महिन्यापूर्वी या अॅपमध्ये एक मालवेअर असल्याचे वृत्त समोर आलं आहे.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…