-
आपल्या आहाराकडे लक्ष देणे नेहमीच गरजचे आहे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्या त्या ऋतूत येणारी फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असते. या फळांचे काही आरोग्यदायी गुणधर्म आहेत आणि उन्हाळ्यात या फळांचे विविध फायदेही शरिराला होत असतात.
-
जांभूळ – लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. या फळात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. कावीळ, रक्तदोषाविकार या आजारांवर जांभळामध्ये असलेल्या लोह तत्त्वामुळे लवकर गुण येतो. जांभूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. जांभळाचे बी व साल ही मधुमेह या आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. याच्या चूर्णाने मधुमेह आटोक्यात आणण्यास उपयोग होतो. दात व हिरड्या कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर त्यावरही जांभळाच्या सालीचा वापर केला जातो. जांभळाच्या सरबतामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पण जांभळे खाताना नेहमी काळजी घ्यावी, रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नयेत.
-
कलिंगड – रणरणत्या उन्हात शरीराला आतून थंड ठेवणारे फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्यात अनेक त्रास होतात या त्रासावर कलिंगड म्हणजे रामबाण उपाय. उन्हाळ्यात होणारा गरम लघवीचा त्रास, अंगावर उष्णतेमुळे उठणारे पुरळ वगैरे तक्रारींवर कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते, जे तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास साहाय्य करते. कलिंगडाच्या साली डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो.
-
करवंद – करवंद हा रानमेवा ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून ओळखली जाते. करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा त्वचाविकारामध्ये करवंद सेवन फायदेशीर ठरते. करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अॅसिड असते त्यामुळे या दिवसांत उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक आजारांवर करवंद फायदेशीर आहेत. या दिवसात उष्णतेमुळे शरीराची काहिली होते तेव्हा करवंदाचे सरबत प्यायल्याने अधिक आराम मिळतो. करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी देखील करवंद उत्तम आहेत.
-
बोर – बोरांच्या विविध जाती आहेत पण त्यातली आंबटगोड बोरेच औषधी गुणधर्माची मानली जातात. बोरे वाळवून तयार केलेल्या चूर्णाचे सेवन केल्याने तोंडाला चव येते. वात विकार आणि जुलाब होण्याचा त्रासही बोरांच्या सेवनाने बरा होतो. वारंवार चक्कर येणाऱ्या रुग्णांना बोर फळं ही फायदेशीर आहे.
-
तुती – तुतीची फळं ही आंबट, गोड असतात. उन्हाळ्यात तुतीची फळं खाणे फायदेशीर असते. तुतीमध्ये अ जीवनसत्त्व आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम देखील आहे.
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल