-
‘संडे हो या मंडे… रोज खाओ अंडे’… दूरचित्रवाणीवरील ही जाहिरात अंड्याचे आरोग्यदायी महत्त्व पटवून देते. निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी आहारात प्रत्येक पदार्थाचा समावेश करणं गरजेचं आहे. पालेभाज्या, कडधान्य, फळे आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने, कॅल्शिअम मिळत असतात. आरोग्यासाठी अंडी कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतात आणि अंडी खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
-
शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे अंड्यातून मिळतात. अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२ ब ५ आणि ब २ ही जीवनसत्त्वे असतात. याबरोबरच फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा ३ आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे.
-
अंड्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असले तरीही त्याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कोलेस्टेरॉलमधील अनेक घटक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.
-
आहारात अंड्याचा समावेश केला तरीही शरीरावर किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलवर त्याचा परिणाम होत नाही. विशेष म्हणजे यामुळेच मधुमेह असणाऱ्यांनाही डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात.
-
अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यामुळेच हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंड्यांचा आहारातील समावेश उपयुक्त ठरतो.
-
अंड्यामध्ये ल्यूटीन आणि झिझेन्थिन ही दोन अँटी ऑक्सिडंटस असतात. हे दोन्हीही घटक उत्तम दृष्टीसाठी अतिशय आवश्यक असतात.
-
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये हे घटक समाविष्ट असल्याने बलक खाणेही तितकेच गरजेचे असते. मोतीबिंदू आणि रेटिनाच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी हे दोन्हीही अँटी ऑक्सिडंटस आवश्यक असतात.
-
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने अंडी खाल्ल्यास बराच वेळ भूक लागत नाही.
-
अंड्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत तर त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. अंड्यांचे दररोजचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल