-
धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी धोक्याचे असते हे आपल्यातील अनेकांना माहित आहे. मात्र धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आसपास वावरणेही धोक्याचे असते हे लक्षात घ्यायला हवे.
-
जागतिक आरोग्य संघटनेकडून ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवासानिमित्त तंबाखूच्या सेवनाविरोधी जनजागृती केली जाते. याच निमित्ताने आपण या गॅलरीमधून पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात हे जाणून घेणार आहोत.
-
सिगारेट, सिगार आणि पाईप यांच्यातून येणारा धूर श्वासाद्वारे शरीरात गेला की त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
-
त्यामुळे एखादी व्यक्ती जास्त काळ धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीसोबत असेल किंवा अशा लोकांच्या संगतीने वावरत असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
-
जगात दरवर्षी ७० लाख लोक तर भारतात दररोज २७३९ लोक धुम्रपानामुळे आपले प्राण गमावतात. यामध्ये पॅसिव्ह स्मोकिंग करणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असते.
-
धुम्रपान करताना त्यामधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निघणारे जवळपास चार हजार रासायनिक पदार्थ आणि १५० टॉक्सिन्स शरीरासाठी अतिशय घातक असतात.
-
दोन महिने ते पाच वर्षे वयाच्या मुलांमधील ३८ टक्के मुले धुम्रपानातून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात येतात.
-
या धुरामुळे लहान वयात दमा, डोळ्यांचे त्रास, घशाचा संसर्ग, सर्दी-खोकला होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
-
घसा, स्वरयंत्र, मेंदू, मूत्राशय, जठर, गुदाशय, स्तन या महत्वाच्या अवयवांच्या कर्करोगाचा धोका पॅसिव्ह स्मोकर्सलाही अधिक असतो.
-
पॅसिव्ह स्मोकर्सच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांवर विपरित परिणाम होऊन हृदयविकाराचा किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो.
-
धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या पत्नीला हृदयाशी निगडीत तक्रारी, सीओपीडी आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
-
धुम्रपान करणाऱ्यांच्या सतत सानिध्यात राहिल्यास लहान मुले सतत आजारी पडू लागतात.
-
धुम्रपान करणाऱ्यांच्या सतत सानिध्यात राहून लहान मुलांना सर्दी, खोकला, दमा, कान फुटणे असे साधे आणि दमा, ब्रॉन्कायटिस, न्युमोनियासारखे श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
-
सिगारेटच्या धुरामुळे या मुलांना दम्याचा अटॅकही येऊ शकतो.
-
या मुलांना लिम्फोमा, रक्ताचा कर्करोग, मेंदूचे ट्युमर्स तसेच यकृताचे गंभीर आजार होऊ शकतात.
-
गरदोर महिलांनी धुम्रपान करणे किंवा धुम्रपान करणाऱ्यांच्या सानिध्यात राहणे हे जन्माला येणाऱ्या बाळाच्या दृष्टीने फार वाईट असतं. याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊन जन्माच्या वेळी कॉम्पलिकेशन्सही होऊ शकतात.
-
नवजात अर्भकाचा सिगारेटच्या धुराने श्वास गुदमरून अचानक मृत्यू होऊ शकतो, याला ‘सडन इन्फंट डेथ सिंड्रोम’ म्हणतात.
-
पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कमालीचे मानसिक नैराश्यही येऊ शकते. अगदी तुम्ही सिगारेट पीत नसला तरी चहा पिता पिता टपरीवर सिगारेट पिणाऱ्या मित्रासोबत उभं राहणंही आरोग्यासाठी धोकादायक असतं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यामुळेच धुम्रपानबंदी आणि तंबाखूमुक्तीचा लढा सर्वांनी एकत्र लढणं आवश्यक आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. सौजन्य रॉयटर्स, पिक्साबे, पीटीआय, एपीवरुन साभार)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”