शरीरासाठी पहिला आहार कोणत्या पदार्थांचा असणार आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रिकाम्यापोटी केलेला प्रथम आहार, यावर शरीराला लागणारी शक्ती आणि वापरली जाणारी शक्ती अवलंबून असते.
बहुतेकवेळा भूक लागली की आपण काय खात आहोत याचे भान राहत नाही आणि याचाच परिणाम पुढे शरीरावर होतो.
यावेळी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, याबद्दल अनेकदा सांगितले जाते, परंतु कुठल्या पदार्थांच्या सेवनाने त्रास होऊ शकतो याबद्दल अधिक चर्चा होत नाही.
चुकीच्या घटकांचे सेवन केले तर पचनशक्तीवर अधिक परिणाम होऊ शकतो. नक्की कोणते आहेत हे पदार्थ पाहूया पुढे-
दही : दह्यामध्ये असलेल्या लैक्टिक ॲसिडमुळे ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. रिकाम्यापोटी दह्याचे सेवन केले तर शरीरातील चांगल्या जीवाणूंचा नाश होतो. यामुळे ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांची समस्या वाढू शकते.
आंबट फळं – द्राक्ष, संत्र, आवळा यांसारख्या आंबट फळांचे सेवन रिकाम्यापोटी केल्यास पचनशक्तीला त्रास होऊ शकतो. यामुळे ॲसिडिटी, आंबट ढेकर आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
कॉफी : चहा किंवा कॉफीचे सेवन ॲसिडिटी आणि बद्धकोष्टतेला आमंत्रण देतात. इतकेच नाही तर कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनचा मेंदूवर वाईट परिणाम होतो.
तेलकट पदार्थ : तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे व्यक्तीला गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
गोड पदार्थ : सकाळी रिकाम्यापोटी गोड पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, यामुळे दिवसभर सुस्ती आल्यासारखे वाटते.
(सर्व फोटो सौजन्य ; पेक्सएल्स / अन्स्प्लॅश )
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)