हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. स्वेटर, मफलर व कानटोप्या दिसू लागल्या आहेत. त्याबरोबरच सर्दी-खोकला यांसारख्या आजारांना आमंत्रणही मिळू लागले आहे.
या थंडीपासून होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी प्राचीन काळापासून काही पौष्टिक पदार्थांचं सेवन केले जाते. या पदार्थांना आजही तितकेच महत्त्व आहे. शरीराला उब देणारे हे पदार्थ अत्यंत फायदेशीर ठरतात.
लसूण- आहारात लसणाचा समावेश केल्यास बऱ्याच समस्यांना तोंड देण्यास मदत मिळते. सर्दी, खोकला आणि हृदयविकार यांपासून आराम मिळतो.
गूळ- प्राचीन काळापासून हिवाळ्यात विशेषत्वाने गुळाचा वापर केला जातो. गुळाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, गॅस व अपचन यांसारख्या पचनक्रियेच्या आजारांपासून सुटका होते.
डाळिंब- हिवाळा सुरू होताच डाळिंबाचे पीकही तयार होते. वाढत्या वयाची लक्षणे, कर्करोगापासून हृदयविकारापर्यंतच्या सर्व आजारांसाठी डाळिंब उपयुक्त आहे.
बदाम- हिवाळ्यात बदाम अतिश उपयुक्त ठरतात. बदाम सेवन केल्याने हृदयविकार आणि मधुमेह यांच्याशी लढण्यास मदत मिळते.
गाजर- हिवाळ्यात गाजराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने गाजराचा हलवा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. हे गाजर शरीरासाठी अत्यंत फायदेशीरही असते. गाजरामध्ये कॅल्शियम आणि अ जीवनसत्त्वाचा समावेश असतो. गाजरामधील अ जीवनसत्त्व निरोगी त्वचा, हाडे व दातांसाठी, तसेच विविध आजारांशी लढण्यासाठी आवश्यक असते.
रताळी- हिवाळ्यात नियमित आहारात रताळ्याचा समावेश केल्याने शरीराला चांगली ऊब मिळते.
संत्र- हिवाळ्यात बाजारामध्ये सर्वत्र संत्री पाहायला मिळतात. क जीवनसत्त्वाने भरपूर असलेले संत्रे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते.
आले- हिवाळ्याच्या दिवसांत आल्याचे सेवन केल्याने रक्त परिसंचरणला चालना मिळते आणि शरीराला ऊब मिळते. त्याचबरोबर आल्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
(सर्व फोटो सौजन्य ; पेक्सएल्स)