-
राजस्थानच्या राजकारणात आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये जे घडतंय, जो संघर्ष सुरु आहे, तो अजिबात आश्चर्य वाटण्यासारखा नाहीय. राजस्थानात २०१८ मध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तेव्हापासूनच या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा, संघर्ष सुरु झाला.
-
मतभेद पहिल्यापासूनच होते, फक्त आज हे मतभेद सरकार कोसळण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. सचिन पायलट यांनी थेट अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. म्हणजेच सरकारच्या स्थिरतेलाच त्यांनी अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.
-
काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्याजागी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हाच सत्ता संघर्षाची बीजं रोवली गेली. काँग्रेस राजस्थानात सत्तेवर आली, तेव्हा सचिन पायलट प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख होते. प्रदेशाध्यक्ष या नात्याने राजस्थानात काँग्रेसला सत्तेवर आणण्यात आपला प्रमुख वाटा आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
-
राहुल गांधी शेवटपर्यंत सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण गेल्या ३५ वर्षांपासून राजस्थानच्या राजकारणात सक्रिय असलेल्या अशोक गेहलोत यांनी पायलट यांना मागे टाकून मुख्यमंत्रीपद मिळवले.
-
राजस्थान काँग्रेस बहुमतापासून दूर राहणार असे दिसत असताना अशोक गेहलोत यांनी १३ अपक्ष आणि आरजेडीच्या आमदारासह हायकमांडला आपली ताकत दाखवून दिली. तिथूनच सर्व चित्र बदलले.
-
अशोक गेहलोत राजस्थानातील लोकप्रिय चेहरा असून मे २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करेल, अशी कारणे देऊन सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आले.
-
लोकसभा निवडणुकीत मात्र उलटं घडलं. काँग्रेसला राज्यातील सर्वच्या सर्व २५ जागा गमवाव्या लागल्या. त्यावेळी सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा विचार होईल, अशी अपेक्षा होती. पण काँग्रेस हायकमांडने नकार दिला. त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवले.
-
राजस्थानत काँग्रेसचे सरकार आल्यानंतर शपथविधीच्यावेळी राजभवनात सचिन पायलट यांच्यासाठी मंचावर खुर्ची ठेवण्यात आली होती. अशावेळी फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपालांसाठी खुर्ची ठेवली जाते. सचिन पायलट यांनी आग्रह धरल्यामुळे राजभवनातील मंचावर ही खुर्ची त्यांच्यासाठी ठेवण्यात आली होती. अशोक गेहलोत यांनी त्यावेळी विरोध केला होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
-
राजस्थान सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सचिन पायलट यांना अपेक्षित प्राधान्य मिळत नव्हते. गेहलोत आणि पायलट दोघेही परस्परांचे नाव न घेता टीका करत रहायचे.
-
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाचा पराभव झाला. त्यावेळी गेहलोत यांनी जाहीरपणे सचिन पायलट यांनी माझ्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी, असे विधान केले होते. त्यावर सचिन पायलट यांनी "मुख्यमंत्र्यांनी एकटया जोधपूरमध्ये सर्वाधिक वेळ खर्च करण्याऐवजी अन्यत्र प्रचार केला असता तर निकाल दुसरा लागला असता" असे उत्तर दिले. त्यानंतर वेगवेगळया कारणांवरुन हे मतभेद असेच वाढत गेले आणि पक्ष फुटीपर्यंत हे मतभेद जाऊन पोहोचले आहेत.
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”