-
देशातील काही बँकांनी आपले आर्थिक गणित सावरण्यासाठी आणि डिजिटल पेमेंटची सुविधा अधिक वापरली जावी या कारणासाठी १ ऑगस्टपासून बँक खात्यात ठेवण्यात येणाऱ्या किमान रक्कमेमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. तसेच महिन्याला तीन मोफत व्यवहारांनंतर या बँकांकडून पुढील व्यवहारांसाठी पैसे आकारण्यात येणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेमध्ये अतिरिक्त पैसे आकारण्याचा नियम १ ऑगस्टपासून लागू होणार आहे.
-
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते असणाऱ्यांना किमान २००० हजार रुपये रक्कम ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. पूर्वी ही रक्कम १५०० रुपये इतकी होती.
-
किमान रक्कम खात्यावर नसल्यास बँक ऑफ महाराष्ट्र शहरी भागातील खातेदारांकडून ७५ रुपये, अर्ध शहरी म्हणजेच विकसित शहरांमधील ग्राहकांकडून ५० रुपये तर ग्रामीण भागातील खातेदारांकडून २० रुपये प्रती महिना आकारणार आहे.
-
बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये एका महिन्यात तीनवेळा मोफत व्यवहार करता येणार आहेत. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. त्याचबरोबरच बँकेने लॉकर सुविधेसाठी जमा करण्यात येणाऱ्या रक्कमेत म्हणजेच लॉकर डिपॉझीटमध्ये कपात केली आहे. असं असलं तरी लॉकर सेवेशी संबंधित पेनल्टीची रक्कम वाढवण्यात आली आहे.
-
बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रमुख कार्यकारी अधिकारी असणाऱ्या ए. एस. राजीव यांनी बँक सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर डिजीटल पेमेंटला चालना देत असल्याचे स्पष्ट केलं. बँकेच्या शाखेत कमीत कमी लोकांना यावे लागेल या दृष्टीने बँकेने हे निर्णय घेतल्याचे राजीव यांनी सांगितलं. बँकेने सेवा दरातही (सर्व्हीस चार्जेसमध्येही) काही बदल केले आहेत.
-
अॅक्सिस बँकेच्या खातेदारांनाही आता इसीएस म्हणजेच इलेक्ट्रीक क्लियरिंग सिस्टीमच्या सुविधेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी २५ रुपये ट्रॅनझॅक्शन फी द्यावी लागणार आहे. आतापर्यंत बँक इसीएसवर कोणतेच शुल्क घेत नव्हते.
-
अॅक्सिस बँकने १० रुपये किंवा २० रुपये तसेच ५० रुपयाच्या नोटांच्या बंडलवर प्रती बंडल १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे निर्णय घेतला आहे.
-
कोटक महिंद्रा बँकेने बचत खाते आणि पगाराशी संबंधित म्हणजेच सॅलरी अकाउंट असणाऱ्यांसाठी नवा नियम बनवला आहे. या दोन्ही प्रकारच्या खातेधारकांना डेबिड कार्डच्या मदतीने एटीएममधून महिन्याला पाच वेळा मोफत व्यवहार करण्याची मूभा देण्यात आली आहे. पाच व्यवहार झाल्यानंतर पुढील प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये आकारण्यात येणार आहेत.
-
खात्यामध्ये रक्कम नसल्याने व्यवहार रद्द झाल्यास २५ रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे कोटक महिंद्रा बँकेने स्पष्ट केलं आहे.
-
कोटक महिंद्रा बँकेमधील खातेदारांना खात्याच्या प्रकारानुसार किमान रक्कम न ठेवल्यास दंड भरावा लागणार आहे. तसेच डिपॉझीट खात्यातील प्रत्येक चौथ्या व्यवहारानंतर प्रती व्यवहार १०० रुपये आकारण्यात येतील असं बँकेने स्पष्ट केलं आहे. (फोटोगॅलरीमधील सर्व फोटो हे फाइल फोटो आहेत.)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”