-
मंगळवारी (२९ सप्टेंबर २०२० रोजी) ‘आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया’च्या २०२० सालातील धनाढ्यांची सूची असलेला अहवाल प्रसिद्ध झाला. यामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या सांपत्तिक स्थितीला करोनाग्रस्त खंगलेल्या अर्थव्यवस्थेची कोणतीही बाधा झाली नसून, उलट मार्चपासून सुरू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात त्यांनी तासाला ९० कोटी रुपये याप्रमाणे कमाई केल्याचे स्पष्ट झालं आहे. केवळ अंबानीच नाही तर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये किती घट आणि वाढ झाली यासंदर्भातील सविस्तर माहिती या अहवालामध्ये आहे. विशेष म्हणजे या यादीमधील अव्वल दहा श्रीमंतांपैकी ७ जण हे महाराष्ट्रात राहणारे असल्याचेही स्पष्ट झालं आहे. चला तर मग पाहुयात नक्की कोणाची किती संपत्ती वाढली आणि कमी झाली. (सर्व फोटो पीटीआय, रॉयटर्सवरुन साभार)
-
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहेत शापूरजी पालनजी मिस्त्री. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये शापूरजी यांची संपत्ती एक टक्क्यांनी कमी झाली आहे. या यादीमध्ये त्यांचा क्रमांकही एका स्थानाने घसरला आहे. त्यांची एकूण संपत्ती ७६ हजार कोटी इतकी आहे. शापूरजी पालनजी कंपनीचे ५५ वर्षीय मालक हे मोनॅको देशात राहतात असं या अहवालात म्हटलं आहे.
-
'हुरून इंडिया’च्या या यादीमध्ये नवव्या स्थानी शापूरजी पालनजी कंपनीचेच सायरस मिस्त्री आहेत. शापूरजींप्रमाणे त्यांचीही संपत्ती एका टक्क्यांनी कमी झाली आहे. ५२ वर्षीय सायरस हे सध्या महाराष्ट्रात राहतात. त्यांची एकूण संपत्ती ही ७६ हजार कोटी इतकी आहे. मागील यादीत आठव्या स्थानी असणारे सायरस यंदा नवव्या स्थानी आहेत.
-
सन फार्मास्युटीकल्स इंडस्ट्रीजच्या दिलिप सांघवी यांनी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दोन स्थानांनी उडी घेत आठवे स्थान मिळवले आहे. ६४ वर्षीय दिलिप हे महाराष्ट्रात राहतात आणि त्यांची एकूण संपत्ती १७ टक्क्यांनी वाढली आहे. सांघवी यांची एकूण संपत्ती ८४ हजार कोटी इतकी आहे.
-
संपत्ती कमी झालेल्यांमध्ये आणखीन एक नाव म्हणजे कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष उदय कोटक. कोटक यांची संपत्ती ८ टक्क्यांनी कमी झाली आहे. या यादीमध्ये मागील वर्षी सातव्या क्रमांकाला असणारे कोटक यंदा आठव्या क्रमांकावर आहेत. ६१ वर्षीय कोटक यांची एकूण संपत्ती ८७ हजार कोटी इतकी आहे. कोटक हे ही महाराष्ट्रामध्येच राहतात.
-
सर्वाधिक नफा झालेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये डीमार्टचे राधाकिशन दमानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अंबानींनंतर दमानी यांनाच लॉकडाउनच्या काळामध्ये सर्वाधिक फायदा झाल आहे. दमानी यांची संपत्ती ५६ टक्क्यांनी वाढली आहे. दमानी यांनी या यादीमध्ये १३ व्या स्थानावरुन थेट सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. दमानी यांची एकूण संपत्ती ८७ हजार २०० कोटी इतकी आहे. ६५ वर्षीय दमानी हे सध्या महाराष्ट्रातच राहतात.
-
पुण्यातील सायरस पुनावाला हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहेत. १९६६ साली 'सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया'ची स्थापना करणाऱ्या पुनावाला यांची एकूण संपत्ती ९४ हजार ३०० कोटी इतकी आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायरस पुनावाला हे ७९ वर्षांचे आहेत. करोनावरील लस बनवण्यासंदर्भातील कामामध्ये 'सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया'चा महत्वाचा सहभाग आहे.
-
अझीम प्रेमजी हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहेत. विप्रोचे सर्वेसर्वा असणारे अझीम प्रेमजी हे मागील वेळेस या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी होते. प्रेमजी यांच्या संपत्तीमध्ये दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. प्रेमजी यांची एकूण संपत्ती एक लाख १४ हजार कोटी इतकी आहे. ७५ वर्षीय अझीम प्रेमजी हे कर्नाटकमध्ये राहतात. एप्रिल महिन्यामध्येच करोनाच्या पार्श्वभूमीवर विप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्राईझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशननं एक हजार १२५ कोटी रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला.
-
करोना कालावधीमध्ये सर्वाधिक नफा झालेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये गौतम अदानी हे तिसऱ्या स्थानी तर श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. अदानी यांची संपत्ती ४८ टक्क्यांनी वाढली आहे. ५८ वर्षीय गौतम अदानी यांची एकूण संपत्ती एक लाख ४० हजार २०० कोटी इतकी आहे. अदानी हे गुजरातमध्ये राहतात. मागील वेळेस ते या यादीमध्ये सहाव्या स्थानी होते.
-
एचसीएल टेकचे शिव नाडार यांच्या धनवैभवात ३४ टक्के वाढ झाली आहे. दिल्लीत राहणारे नाडार हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. नाडार यांची एकूण संपत्ती एक लाख ४१ हजार ७०० कोटी इतकी आहे. तिसऱ्या स्थानी असणारे नाडार हे मागील वेळस पाचव्या क्रमांकावर होते. नाडार हे ७५ वर्षांचे आहेत.
-
नवैभवाला गळती लागलेल्यांच्या यादीमध्ये हिंदुजा बंधू अव्वल स्थानी असले तरी ते श्रीमंतांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. एकूण संपत्तीमध्ये २३ टक्के घसरण झाल्यानंतरही हिंदुजा बंधूंची संपत्ती एक लाख ४३ हजार ७०० कोटी इतकी आहे. हिंदुजा बंधू हे महाराष्ट्र, युके आणि स्वित्झर्लंडमध्ये राहतात.
-
भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी यांची वैयक्तिक संपत्ती २,७७,७०० कोटी रुपयांवरून, ६,५८,४०० कोटी रुपयांवर गेली असून, ते सलग नवव्या वर्षी हुरून इंडिया सूचीतील सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून अग्रस्थान सांभाळून आहेत. म्हणजे मागील केवळ एका वर्षांत त्यात तब्बल ७३ टक्क्यांची भर पडली आहे.
-
रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मौल्यवान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष असलेले अंबानी हे जगातील चौथ्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत. त्यांनी टेस्लाचे इलॉन मस्क आणि अल्फाबेटचे सहसंस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनाही पिछाडीवर टाकले आहे.
-
हुरूनच्या मते, जागतिक धनाढय़ांच्या अव्वल पाचांत स्थान मिळविणारे अंबानी एकमेव भारतीय आहेत. उल्लेखनीय म्हणजे या जागतिक सूचीत अंबानी यांचे धनवैभव, हे क्रमवारीत त्यांच्यानंतर असलेल्या पाच धनाढय़ांच्या एकत्रित संपत्तीइतके आहे.
-
करोनाचा कहर सुरू झाला तेव्हा अंबानी यांच्या धनवैभवाला २८ टक्क्यांचे खिंडार पडून ते ३,५०,००० कोटींवर घसरले होते. परंतु पुढे फेसबुक, गूगल, सिल्व्हर लेकसह अनेक ख्यातकीर्त गुंतवणूकदारांकडून रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमधील हारीने सुरू राहिलेल्या गुंतवणुकीने, नंतरच्या चार महिन्यांच्या काळात अंबानी यांचे मूल्यांकन जवळपास ८५ टक्क्यांनी फुगले, असे आयआयएफएल-हुरूनचा हा अहवाल सांगतो.
-
ही पाहा देशातील दहा श्रीमंत व्यक्तींची यादी. (Source: Hurun Research Institute; IIFL Wealth Hurun India Rich List 2020)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं