-
चीनच्या कुरापतींना विरोध करत देशात चीनविरोधी भावना तयार झाली आहे. त्यातच देशवासीयांकडून चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. अशातच करोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी 'व्होकल फॉर लोकल'चं आवाहन केलं होतं. तसंच दिवाळीच्या कालावधीत पंतप्रधानांनी देशवासीयांना स्थानिक वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, दीपावलीच्या कालावधीत व्यावसायिक स्वरूपात चीनला मोठा झटका बसला आहे.
-
दिवाळीच्या कालावधीत देशवासीयांनी मोठ्या प्रमाणात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं. व्यापाऱ्यांची संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (कॅट) दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत व्यावसायिक स्वरूपात चीनला तब्बल ४० हजार कोटी रूपयांचा झटका बसला आहे. दीपावलीच्या कालावधीत अनेकांचा चिनी वस्तू न घेण्याकडेच कल होता.
-
कॅटच्या नेतृत्वाखाली देशभरातील व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमांना यशस्वीरित्या लागू केलं असल्याचं कॅटनं म्हटलं आहे. दिवाळीच्या कालावधीत खरेदी विक्री ही उत्तम होती. परंतु लोकांनी चिनी वस्तूंना उघडपणे विरोध केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
-
देशातील निरनिराळ्या २० शहरांमधून मिळालेल्या अहवालानुसार दीपावलीच्या कालावधीत देशात तब्बल ७२ हजार कोटी रूपयांचा व्यवसाय झाला. परंतु चीनला थेट ४० हजार कोटी रूपयांचं नुकासन झालं असल्याची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल यांनी दिली.
-
कॅटच्या माहितीनुसार रिटेल क्षेत्रालाही या कालावधीत चांगले दिवस आले. भारतात तयार झालेली एफएमजीसी उत्पादनं, खेळणी, वीजेची उपकरणं आणि साहित्य, स्वयंपाकघरात वापरण्यात येणारं सामान, भेटवस्तू, मिठाई, घरातील सामान, सोनं, कपडे, घराच्या सजावटीच्या वस्तू, मातीचे दिवे अशा प्रकारच्या अनेक वस्तूंची विक्री उत्तम होती.
-
दरम्यान, दीपावलीच्या कालावधीत खादीच्या उत्पादनांचीही विक्रमी विक्री झाली.
-
या वर्षी २ ऑक्टोबरनंतर केवळ ४० दिवसांमध्येच दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील खादी इंडियाच्या प्रमुख दुकानातील एका दिवसाच्या विक्रीनं चौथ्यांदा एक कोटींचा पल्ला गाठला.
-
१३ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी १.११ कोटी रूपयांची विक्री झाली होती. यावर्षी एका दिवसात झालेल्या विक्रीचा हा सर्वात मोठा आकडा होता.
-
तर दुसरीकडे २ ऑक्टोबर रोजी १.०२ कोटी २४ ऑक्टोबर रोजी १.०५ कोटी रूपयांची तर ७ नोव्हेंबर रोजी १.०६ कोटी रूपयांची विक्री झाली होती.
-
दरम्यान, या कालावधीत देशांतर्गत तयार झालेल्या स्वदेशी वस्तूंच्याच खरेदीकडे अनेकांचा कल असल्याचंही दिसून आलं.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं