-
ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घऱी सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहीम सुरु आहे. मुंबई तसंच ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून शोधमोहीम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं होतं. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं.
-
त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना झालं. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
-
मागील बऱ्याच काळापासून वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारं सरनाईक कुटुंब ईडीच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ठाण्यातील राजकारणामध्ये दबदबा असणाऱ्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल आपण या गॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत.
-
प्रताप सरनाईक हे २०१९ साली शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. सरनाईक हे ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत.
-
सरनाईक यांचा जन्म वर्ध्याचा असून ते ६५ वर्षांचे आहेत. लहानपणीच ते वर्ध्यातून मुंबईला स्थायिक झालेत.
-
प्रताप सरनाईक यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. डोंबवली पूर्वेतील एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं.
-
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ रिक्षाही चालवली. त्यानंतर सरनाईक राष्ट्रवादीचे सदस्य झाले आणि १९९७ साली त्यांनी सक्रीय राजकरणामध्ये उडी घेतली.
-
सरनाईक हे सध्या जरी शिवसेनेत असले तरी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही राष्ट्रवादीमधून झाली.
-
१९९७ साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले.
-
२००८ मध्ये सरनाईकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
-
लगेचच पुढच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रताप सरनाईकांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले.
-
प्रताप सरनाईक यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग असून धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत.
-
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
-
पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव असून युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात.
-
पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक २९ चे प्रतिनिधित्व करतात.
-
विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांचं नाव १९८९ पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सामील आहेत.
-
विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे विहंग रिअल इस्टेटने उभारलेले अनेक रहिवासी प्रकल्प ठाण्यात आहेत.
-
घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे.
-
विहंग्ज पाम क्लबचीही मालकीही सरनाईक यांच्या विहंग्ज ग्रुपकडे आहे. स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा अत्याधुनिक सोयी या क्लबमध्ये आहेत.
-
ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या करण्यात ज्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या समावेश होता त्यात प्रताप सरनाईक यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.
-
सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे वर्तकनगर येथे दहीहंडीचे आयोजन केलं जातं.
-
अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाची प्रस्ताव आणण्यापासून ते कंगानाविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने महिला आयोगाने नोटीस पाठवण्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे सरनाईक कायमच चर्चेत राहिल्याचे पहायला मिळालं आहे.
-
अनेक सार्जनिक व्यासपिठांवर सरनाईक कुटुंबातील सदस्य एकत्र दिसून येतात.
-
सध्या शिवेसेना आणि राष्ट्रवादी राज्यामध्ये एकत्र सत्तेत असल्याने ठाणे महानगरपालिकेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे नेते एकत्र दिसून येतात. अशाच एका कार्यक्रमातील हा फोटो ज्यामध्ये सरनाई त्यांचे जुने पक्ष सहकारी असणाऱ्या जितेंद्र आव्हाडांसोबत दिसत आहेत.
-
सरनाईक यांनी २०१९ साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण (स्थावर आणि जंगम एकत्रित) मालमत्ता १२५ कोटींहून अधिक आहे. (सर्व फोटो एनएनआय आणि प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं