-
पूर्व इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. यामुळे दोन हजार ८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर आकाशात चार हजार मीटरपर्यंत (१३ हजार १२० फूटांपर्यंत) उडाल्याचे सांगण्यात येत आहे. या ज्वालामुखीच्या आसपासच्या २८ गावांना खाली करण्यात आलं आहे. दोन हजार ८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून उर्वरित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे.
-
इंडोनेशियातील डिझास्टर मॅटिगेशन एजन्सीचे प्रवक्ते रेडिटी जाति यांनी पूर्वेकडील नूसा तेंगारा प्रांतातील लेम्बाटा बेटावरील माउंट इली लेवोटोलोकचा उद्रेक झाल्याची माहिती दिली. या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या २८ गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आलं आहे. सध्या तरी या विस्फोटामुळे कोणतीही जिवितहानी झाल्याचे किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही.
-
प्रशासनाने या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर विमानांना या प्रदेशामधून प्रवास न करण्यासंदर्भातील सूचना केल्या आहेत. तसेच या बेटावर असणारं एक लहान विमानतळ तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलं आहे.
-
रविवारी हा ज्वालामुखी सक्रीय झाला. यामुळे पर्यावरणाचे आणि जंगलांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर ज्वालामुखीतून बाहेर आलेला धूर आणि राख ही हवेमध्ये चार हजार मीटरपर्यंत फेकली गेली.
-
एजन्सी फॉर व्होल्कोलॉजी अॅण्ड जिओलॉजिकल डिझास्टर मिटिगेशनच्या हवाल्याने वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या बेटांना हाय अलर्ट देण्यात आला.
-
ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर या परिसरावर पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने मोठ्या आकाराचे राख आणि धुराचे ढग निर्माण झाल्याचे दिसून आलं. समुद्रसपाटीपासून एक हजार १८ मीटर उंचीवर असणाऱ्या या ज्वालामुखीच्या आजूबाजूला दोन किमीच्या परिघामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
ज्वालामुखीचा स्फोट रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास झाला. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार स्फोट झाल्यानंतर तातडीने या बेटावरील स्थानिकांना सुरक्षित स्थळी हवलवण्याचं काम सुरु झालं. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार सर्व विमानतळांना इशारा देण्यात आला आहे.
-
सध्या इंडोनेशियामध्ये जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत. इंडोनेशियामध्ये १३० सक्रिय ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखींमधून लाव्हा रस आणि विषारी वायू बाहेर पडतात.
-
नुकताच फिलिपीन्समधील ताल येथील ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर १६ हजार ७०० जणांना सुरक्षित स्थळी हवलण्यात आलं होतं. हा विस्फोट एवढा मोठा होता की या विस्फोटानंतर राख हवेत ७० किमीपर्यंत राजधानी मनीलापर्यंत पोहचली होती. या विस्फोटानंतर फिलिपीन्समध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. यामुळे विमानसेवेला मोठा फटका बसला होता.
-
इंडोनेशियातील डिझास्टर मॅटिगेशन एजन्सीचे प्रवक्ते रेडिटी जाति यांनी मदतकार्य सुरु असल्याचे सांगितलं आहे. (सर्व फोटो: रॉयटर्स आणि एएफपीवरुन साभार)

New Passport Rules: सरकारने बदलले पासपोर्टचे नियम; आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य, जाणून घ्या बदल