-
वागळे इस्टेट भागातील संभाजीनगर परिसरात (कोरम मॉलजवळ) मंगळवारी सकाळी पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यावर खणलेल्या खड्ड्यात पडून प्रसाद देऊळकर (३५) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी नगर अभियंता रवींद्र खडताळे यांची एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले. (सर्व फोटो : दिपक जोशी)
-
दिवा येथे राहणारे प्रसाद देऊळकर काही कामानिमित्त संभाजीनगर भागात राहणाऱ्या त्यांच्या मित्राच्या घरी आले होते. मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने घरी परतत असताना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी खणलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडले.
-
या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने प्रसाद यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी कंत्राटदाराविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुमारे तीन वर्षांपूर्वी मुल्लाबाग येथे अशाच प्रकारे कंत्राटदाराने रस्त्यावर खणलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
-
सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना : या घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी नगर अभियंता रवींद्र खडताळे यांची एक सदस्य समिती नेमली आहे. या समितीला २४ तासांत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
-
या चौकशीमध्ये कोणत्या कंपनीमार्फत हे काम सुरू होते, कंत्राटदाराचे नाव, कामाची किंमत, खड्ड्याभोवती मार्गरोधक बसविण्यात आले होते का, पर्यवेक्षण करणाऱ्या अभियंत्याचे नाव आणि हुद्दा आणि अपघाताची कारणमीमांसा असा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे