-
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या वृत्तावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं असून यावेळी वडील गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने त्या भावूक झाल्याचंही पहायला मिळालं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना डावलल्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक प्रश्नांना उत्तर दिलं. जाणून घेऊयात पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे. (Photos: Pankaja Munde Facebook)
-
“आमच्या नावाची नेहमी चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचं कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणं कर्तव्य आहे”
-
“मी भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी बोलले होते. त्यांना आदल्या दिवशी मेसेज आल्याने ते दिल्लीत होते आणि प्रीतम मुंडेंना मेसेज नसल्याने त्या मुंबईत होत्या. काही महान लोकांनी पंकजा मुंडेंनी ट्वीट केलं म्हणून प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद गेलं असं म्हटलं असून हे हास्यास्पद आहे”
-
"रात्री १२.३० वाजता भागवत कराड यांचा फोन आला होता. मुख्यालयातून फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालो आहे अशी माहिती त्यांनी दिली होती".
-
"माझे लोकांशी नातं आहे, संबंध नाही. नातं कधीच तुटत नाही पण संबंध कडू गोड होत असतात. लोकांचं प्रेम असल्याने ते व्यक्त होत असतात".
-
“भाजपामध्ये एक पद्धत आहे, त्याचप्रमाणे निर्णय घेतले जातात. सगळ्या राज्यांच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय झाले होते. फक्त प्रीतम मुंडे नाही तर हिना गावित यांचंही नाव चर्चेत होतं. नव्या लोकांना संधी देण्यास काही हरकत नाही, त्यांच्यात काही गुण असू शकतात जे पक्षासाठी भविष्यात फायद्याचे ठरु शकतात. त्यामुळे हरकत असण्याचं कारण नाही”
-
“जे मत असतं ते वैयक्तीक असतं. ते जाहीरपणे व्यक्त करायचं नसतं. प्रीतम मुंडे यांचं नाव होतं आणि ते योग्य होतं. त्या विक्रमी मताने निवडून आल्या आहेत. त्यांनी छान काम केलं, खूप हुशार आहेत. सर्व बैठकींना त्या उपस्थित असतात. कोणताही कार्यक्रम डावललेला नाही. तरुण आहेत, बहुजन चेहरा आहेत. म्हणून त्यांचं नाव न येण्यासारखं काही नाही. केवळ प्रीतम ताईंचंच नाव आलं नाही असं नाही. चर्चा नावाच्या वलयामुळे होत आहे”
-
“पक्षाचे निर्णय पटण्याचा विषय नाही. कारण पक्षाने मला फॉर्म भरायला लावला तेव्हाही मी पात्र आहे का असं विचारलं होतं. नंतर त्यांनी रमेश आप्पा कराड यांचं नाव अंतिम झाल्याचं सांगितलं होतं. तो निर्णयही मला पटला होता. पक्ष आमच्या संस्कारात अंतिम सत्य आहे. त्यामुळे निर्णय पटणं आणि न पटणं हा प्रश्न नसतो”
-
सामनामध्ये पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे असं म्हणण्यात आलं आहे यासंबंधी विचारण्यात आलं असता, “मला वाटत नाही भाजपाला मला संपवायचं आहे. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की पंतप्रधानांपासून सर्व कामाला लागतील. त्यांनी जे लिहिलंय ते वाचलं नाही. वाचल्यावर प्रतिक्रिया देईन,” असं म्हटलं.
-
“मी राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून आले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर बिखरलेल्या संतप्त समाजाला एका ठिकाणी आणणं माझ्यासाठी आव्हान होतं. मुंढेंनी बसवलेली घडी विस्कटू नये माझी जबाबदारी आहे. मी वंजारी समाजाबरोबरच राज्यातील नेता आहे. वंजारी समाजातील नेता मोठा होत असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभी आहे”
-
“टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण हे मला माहिती नाही. पण हे भाजपाला मान्य नाही. भाजपाला देश प्रथम, नंतर राष्ट्र आणि नंतर आपण. भाजपात मीपणा मान्यच नाही. आपण, आम्ही असं म्हणणं मान्य आहे. त्यामुळे अशी कोणती टीम असणं पक्षाला मान्य असेल असं वाटत नाही”
-
“मी भाजपाच्या संस्कृतीचा सन्मान करणारी कार्यकर्ता आहे. मी कोणती मंत्री नाही, मी कोणत्या पदावर नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षनिष्ठा माझ्या वडिलांनी मला संस्कारात दिली आहे”
-
“गोपीनाथ मुंडे निवडून आले, त्या निवडणुकीला मी एकटीच होते. आमच्या इथे जिल्ह्यात आमदार नव्हता. माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला आहे”, हे सांगताना त्यांचा गळा दाटून आला होता. “प्रीतमताई वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या. पण आत्ता जी निवडणूक त्या जिंकल्या, ती निवडणूक त्या त्यांच्या मेरिटवर जिंकल्या. तरीही प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार आहेत की नाही इथून चर्चा होते”, असंही त्यांनी म्हटलं.
-
“मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि ३ जूनला ते गेले. गंमतीचा भाग असा आहे की माझ्या आईला पेन्शन मिळते. पण मुंडे साहेबांच्या शेवटच्या टर्मची मिळत नाही. कारण त्यांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती. ते शपथ घेण्याआधीच गेले. १७ दिवसांत ते गेले. हे केवढं मोठं घोर दु:ख आहे. प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या. त्या लोकांना शांत करण्यासाठी आल्या”
-
“आम्ही जे कष्ट केलेत ते पक्षासाठीच केले. माझ्याकडे येणारी गर्दी पक्षासाठीच आहे. त्यामुळे मी वेगळी आहे आणि पक्ष वेगळा आहे असं मी म्हणून शकत नाही. मंत्रीपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपामध्ये १ मतही वाढत असेल, तर त्यांचं स्वागतच आहे”
-
"आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. म्हणून नाराज होण्याचं कारण नाही. माझ्या घरात कोणताही पूर आला नाही. माझं घर वाहून गेलं नाही. मी कुठेही आश्रित होण्याचा अर्ज करत नाहीये. मग माझं पुनर्वसन कोणी कशाला करेल? असा सवाल करतानाच जे बरबाद झालेत. जे वाहून गेलेत. जे खत्म झाले आहेत. त्यांचं पुनर्वसन केलं जातं. पुनर्वसन शब्द मला मान्य नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
-
एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीसंबंधी बोलताना त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "मला वाटतं ईडी, सीबीआय, सीआयडी या मोठ्या संस्था आहेत. त्यात आपण कमी बोलू तेवढं योग्य आणि न्याय होईल. चूक असेल तर त्याचा न्याय होईल. बरोबर असेल तर त्याचाही न्याय होईल. त्याला आपण कुठे डिस्टर्ब करू नये. खडसेंच्या चौकशीवर मीडियातून भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण मी काही एक्सपर्ट नाही," असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”