-
येडियुरप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बसवराज बोम्मई यांच्यावर पक्षानं कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे.
-
पक्षाच्या कर्नाटक प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सर्व आमदारांनी एकमताने बसवराज बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. खुद्द येडियुरप्पांनीच यासंदर्भातली माहिती माध्यमांना दिली.
-
खरंतर बोम्मई हे येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी आत्तापर्यंत राज्य सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला आहे.
-
बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत.
-
भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेले धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांच्या भेटीनंतर बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
-
लिंगायत समाजातीलच बी. एल. संतोष, प्रल्हाद जोशी आणि आमदार अरविंद बेल्लाड हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. खुद्द येडियुरप्पांच्या पुत्राचं देखील नाव घेतलं जात होतं. मात्र, अखेर बसवराज बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
-
२८ जानेवारी १९६० रोजी जन्मलेल्या बोम्मई यांनी मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून आपलं शिक्षण पूर्ण केलं असून त्यांनी जनता दलापासून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती.
-
२००८मध्ये बोम्मई यांनी भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. मात्र, त्याआधी त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्यासोबत काम केलं आहे.
-
बोम्मई यांनी १९९८मध्ये पहिल्यांदा कर्नाटक विधानसभा गाठली. धारवाड मतदारसंघातून ते कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले होते.
-
त्यानंतर पुन्हा २००४ मध्ये सलग दुसऱ्यांदा बसवराज बोम्मई यांनी धारवाडमधून विजय मिळवत कर्नाटक विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांचं कर्नाटकच्या राजकारणातलं वजन वाढू लागलं.
-
२००८मध्ये बसवराज बोम्मई यांनी हवेरी जिल्ह्यातल्या शिगगाव मतदारसंघातून निवडणूक जिंकत पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला. यंदा ते भाजपाचे आमदार होते.
-
बसवराज बोम्मई हे येडियुरप्पा यांच्याप्रमाणेच लिंगायत समाजाचे नेते आहेत. येडियुरप्पा यांनीच भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांचं नाव सुचवलं. त्याला भाजपाच्या आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला.
-
आत्तापर्यंत बसवराज बोम्मई यांनी तीन वेळा विधानसभेचे आमदार म्हणून कार्यकाळ पूर्ण केला आहे. सध्या ते शिगगावमधून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
-
बसवराज बोम्मई हे मुख्यमंत्रीपदी निवड होण्याआधी कर्नाटकचे विद्यमान गृहमंत्री होते. त्यासोबत त्यांनी कर्नाटक सरकारमध्ये जल व्यवस्थापन, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत.
-
कर्नाटकसमोर सर्वात मोठं आव्हान सध्या करोनाचं असल्याची प्रतिक्रिया बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर त्यांचं प्राधान्य राज्यातील करोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचं असले, असा अंदाज बांधला जात आहे.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे