-
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी माहीममध्ये एका कार्यक्रमादरम्यान केलेलं विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. "त्यांना आपली एवढी भिती की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणार. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू", असं विधान प्रसाद लाड यांनी केलं.
-
मात्र, त्यांच्या विधानावरून वाद निर्माण होऊ लागताच त्यांनी घुमजाव करत आपण असं विधान केलंच नव्हतं, विधानाचा विपर्यास केल्याची भूमिका मांडली.
-
प्रसाद लाड यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर एक व्हिडीओ पोस्ट करून "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून शिवसेना प्रमुख किंवा त्यांनी बांधलेल्या कोणत्याही वास्तूचा मला अपमान करायचा नव्हता. तरी कुणाचं मन दुखावलं असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असं सांगितलं.
-
मात्र, प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण येईपर्यंत शिवसेना नेत्यांनी या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली होती. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रसाद लाड यांना आव्हानच दिलं होतं. "तुम्ही सेना भवन फोडा, आम्ही तुमचं काय फोडू, हे तुमच्या लक्षात येईल", असं ते म्हणाले.
-
रविवारी सकाळी तर संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणंही टाळलं. “या विषयावर आमचे स्थानिक शाखाप्रमुख प्रतिक्रिया देतील”, असं म्हणून त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं.
-
दरम्यान, पत्रकारांशी बोलल्यानंतर संजय राऊतांनी ट्विटरवर जात खोचक ट्वीट केलं. "महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही", असं ते म्हणाले.
-
शिवसेना आमदार राजन साळवी यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली. "शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे थोबाड फोडू. शिवसेना भवनाला हात लावणे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं आहे, असं काही भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. शिवसेना भवन हे आम्हा शिवसैनिकांचे मंदीर आहे", असं ट्वीट राजन साळवींनी केलं आहे.
-
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रसाद लाड यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. "शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपाच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीचं उत्तर महाराष्ट्रातील जनता निवडणुकीत ह्यांना भुईसपाट करून नक्की देईल. बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे", असं ते म्हणाले.
-
"प्रसाद लाड यांची औकात नाही शिवसेना भवनासंदर्भात बोलण्याची. प्रसाद लाड वगैरे सगळे बाटगे आहेत. भाजपाचे पूर्वीचे पदाधिकारी संघवाले आहेत. त्यांना संस्कृती आहे. ते कधीच असं वक्तव्य करणार नाहीत", अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
-
यानंतर सत्ताधाऱ्यांकडून एकापाठोपाठ एक नेत्यांनी प्रसाद लाड यांच्या विधानांचा समाचार घेतला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना तर हसू अनावर झालं आणि त्यांनी उत्तर दिलं, "काही लोकांना अधूनमधून विनोद करायची फारच हुक्की येते!"
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसाद लाड यांच्या खांद्यावरून थेट भाजपावर निशाणा साधला. "भारतीय जनता पार्टीची जी प्रवृत्ती आहे, ते त्यांचे शब्द आहेत. त्या प्रवृत्तीमध्ये आम्ही जात नाही. आम्ही गांधी विचारांचे लोक आहोत. ते कोणत्या प्रवृत्तीचे लोक आहेत. हे मला सांगायची गरज नाही. ते लोकांना माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
-
या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना अप्रत्यक्ष टोला हाणला आहे. आम्हाला थापडा मारण्याची धमकी कुणी देऊ नये, असं ते म्हणाले आहेत.
-
अखेर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकला. "प्रसाद लाड यांच्या खुलाशानंतर हे प्रकरण आमच्यासाठी संपलं आहे", असं ते म्हणाले.

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील ‘त्या’ नवजात जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!