-
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार डॉ. सायरस पूनावाला यांना आज पुण्यात प्रदान करण्यात आला. (सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला यांनी अनेक विषयांवर आपली रोकठोक मतं मांडली. अगदी थापाडे राजकारणी, लसीचा डोस, मोदींचं पुण्याकडे दुर्लक्ष यासारख्या विषयांवर पूनावाला यांनी भाष्य केलं. जाणून घेऊयात या पत्रकार परिषदेतले १० महत्वाचे मुद्दे. (सर्व फोटो रॉयटर्स, पीटीआय, सागर कासार आणि आशिष काळे यांच्याकडून साभार)
-
करोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. पहिले दोन डोस घेऊन झाल्यानंतर सहा महिन्यांनी लसीचा परिणाम कमी होत असल्याचं अभ्यासामध्ये दिसून आलं आहे. त्यामुळेच तिसरा डोस घेण्याची गरज असल्याची माहिती पूनावाला यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिलीय. सहा महिन्यानंतर कोव्हिशिल्ड लसीचा प्रभाव कमी होत असल्याचं निरिक्षण समोर आलं आहे. यावर पूनावाला यांनी कोव्हिशिल्डच्या बुस्टर डोसचा पर्यायही सुचवला आहे.
कोव्हिशिल्डच्या प्रभावासंदर्भात बोलताना पूनावाला यांनी मी स्वत: तिसरा डोस घेतला असल्याचं सांगितलं. इतकच नाही तर कंपनीतील सात-आठ हजार कामगारांनाही आपण तिसरा डोस दिल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं. "सहा महिन्यांनी लसीचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. लस दिल्यानंतरचा मेमरी सेल कायम शरीरामध्ये राहतो मात्र लसीचा प्रभाव कमी होतो. मी स्वत: तिसरा डोस घेतलाय. सिरममध्ये जे सात-आठ हजार कामगार आहेत त्यांनाही आम्ही तिसरा डोस दिलाय," असं पूनावाला म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहनही केलंय. "ज्यांना कोव्हिशिल्डची लस घेऊन सहा महिने झालेत त्यांना माझी विनंती आहे की तिसरा डोस त्यांनी घ्यायलाच पाहिजे," असं मत पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे. -
लोकांच्या दु:खातून पैसे कमवायाचे नाहीत : करोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना वेळेत उपचार मिळाले नाही किंवा त्यांच्याकडे पैसे नव्हते. देवाचा कोप होईल या भीतीने काहींनी उपचार नाकारले ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पण लक्षणे दिसताच लगेच उपचार घेतल्यास लवकर बरे होण्यास मदत होईल. मला लोकांच्या दु:खातून पैसे कमवायाचे नाहीत. मी लस विकून पैसे बनवायला बसलेलो नाही. मात्र लोकांनी लस घ्यावी, असंही ते म्हणालेत.
-
सरकारने प्रोत्साहन दिले… : पूर्वी कोणत्याही परवानग्या मिळविताना नोकरशाहचा खूप जाच व्हायचा आता कमी झाला असून याचं श्रेय मोदी सरकारला आहे, असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे. सिरमचा आजवरचा प्रवास खूप परिश्रमाचा आणि वेदनादायी राहिला आहे. मात्र आता पतिस्थिती बदलली आहे. करोनावरील लस बनवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ मिळल्या. त्याचप्रमाणे सरकारकडून प्रोत्साहन देखील मिळाले आहे, असंही पूनावाला म्हणाले.
-
सर्वात स्वस्त लस : कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत, असंही यावेळी पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या इतक्या नाममात्र किमतीत दिल्या आहेत, असंही पूनावाला यांनी म्हटलंय.
-
करोना परिस्थिती हाताळण्यात आपण अपयशी ठरलो आहे का?, त्यावरही पूनावाला यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "सर्वांना अपेक्षा की आम्हाला लस पाहिजे. पण हे काही सोपे नाही. आमच्याकडे आम्ही २० लसी तयार करायचो ज्या १५ कोटीपर्यंत होत्या. पण आता आम्ही करोना लसीचे उत्पादन १५ कोटींवर घेऊन गेलो आहे. त्यामुळे इतर लसीचे काही प्रमाणात उत्पादन कमी केले आहे, आम्हाला देशाची काळजी आहे."
-
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. तरी यासंदर्भातील एक मोठा खुलासा आता पूनावाला यांनी केला आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण असल्याचं अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचं सायरस पूनावाला म्हणाले आहेत.
-
वर्षाअखेरीसपर्यंत लसीकरण होईल आणि सप्टेंबर पर्यंत ४५ कोटी लस मिळतील असे सांगितले जात आहे. त्यावर पूनावाला म्हणाले की, "राजकारणी लोक हेच थापा मारतात, आम्ही महिन्याला १० कोटी लसींचं उत्पादन घेतलं आहे. हे काही सोपे काम नाही. यामध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही महिन्याला १० कोटी प्रमाणे वर्षाला ११० ते १२० कोटी होईल. तसेच इतर कंपन्यांच्या आकडेवारीवरून देखील स्पष्ट होईल की किती लस उपलब्ध होईल."
-
कोणी केलेला डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याचा दावा? : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोदी सरकारच्या वतीने देशातील संपूर्ण लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा दावा केलेला. "देशात आत्तापर्यंत तीन टक्के लसीकरण झाले असले तरी, करोना प्रतिबंधक लशींच्या २१६ कोटी मात्रा डिसेंबरपर्यंत दिल्या जातील, म्हणजेच १०८ कोटी नागरिकांचे लसीकरण पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही जावडेकरांनी दिलेली. लसीकरणासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचा वापर केला जात आहे. शिवाय, झायडस कॅडिला कंपनीची लस, नोव्हाव्हॅक्स, स्पुटनिक, जनोव्हा या लशी उपलब्ध होतील. परदेशी लशीही देशात मिळू शकतील. एकूण २१६ कोटी लशींचे उत्पादन केले जाणार असल्याने २०२१ संपण्यापूर्वी संपूर्ण लसीकरण केले जाईल, असं जावडेकर म्हणाले होते.
-
पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोविशील्ड लसीने जगभरातील कोट्यवधी नागरिकांना करोनापासून सुरक्षित ठेवले आहे. तसेच विविध प्रकारच्या लस निर्मितीमधील जागतिक स्तरावरील कंपनी आहे.
-
त्या पार्श्वभूमीवर टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आलीय, अशी माहिती लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी पुस्कार जाहीर करताना दिली होती.
-
माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला.
-
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.
-
आत्तापर्यंत देशाविदेशात अनेक पुरस्कार मिळाले. पण लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार विशेष आहे. टिळकांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आत्तापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्या तुलनेत मी काही नाही. आजवरचा प्रवास खूप वेदनादायी होता, अशा शब्दांमध्ये पूनावाला यांनी या पुरस्काराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
पूनावाला यांनी हा पुरस्कार त्यांची दिवंगत प्रिय पत्नी विलू यांना समर्पित केला. (फोटो : सागर कासार/ लोकसत्ता)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा