-
देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन करोनामुक्त वातावरणात साजरा करणारच अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं आहे.
-
जर परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.
-
गेल्या दीड वर्षापासून करोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
-
निर्बंधांच्या शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
-
करोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील
-
ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
-
काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाउन पुन्हा लागू करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेची माहिती दिली होती.
-
जर राज्यात तिसरी लाट आली आणि त्यामध्ये दिवसाचा आपला ऑक्सिजन वापर ७०० मेट्रिक टनाच्या वर गेला, तर राज्यात ऑटोमॅटिक मोडवर कठोर लॉकडाउन लागू केला जाईल”, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं होतं.
-
आज स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात ध्वजारोहण केल्यानंतर केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनीही पुन्हा इशारा दिला आहे.
-
याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत भाष्य केलं होतं. ”आपण निर्बंध शिथिल केले असले आणि तिसरी लाट येणार की येणार नाही याचे अंदाज करीत असलो, तरी या विषाणूच्या बदलत्या अवतारापासून आपण सावध राहिलेच पाहिजे," असं त्यांनी सांगितलं होतं.
-
राज्य सरकारकडू 'ब्रेक द चेन' अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे.
-
राज्यात १५ ऑगस्टपासून दुकाने, उपाहारगृहे आणि मॉल्स आठवड्याचे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
-
मुंबई, ठाणे वगळता राज्यात अन्यत्र दुकाने रात्री ८ पर्यंत खुली ठेवण्यास गेल्या आठवड्यात मुभा देण्यात आली होती. नव्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र दुकाने रात्री १० पर्यंत खुली राहतील. मॉल्सनाही रात्री १० पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
-
मॉलमध्ये प्रवेश करताना लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे.
-
उपाहारगृहे सायंकाळी ४ पर्यंत खुली ठेवण्यास सध्या परवानगी आहे. ही वेळ रात्री उशिरापर्यंत वाढवून देण्याची मागणी उपाहारगृहांच्या संघटनेकडून करण्यात येत होती. उपाहारगृहे रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बारही रात्री १० पर्यंत खुले राहू शकतील.

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल