-
काबुल ताब्यात घेतल्यानंतर आख्ख्या अफगाणिस्तानवर तालिबाननं आपला अंमल प्रस्थापित केला आहे. तिथल्या सरकारी इमारती, शासकीय निवासस्थानं आणि सार्वजनिक आयुष्यात देखील तालिबान्यांनी घातलेला धुमाकूळ आणि जनतेमधली दहशत देखील समस्त मानवजातीने पाहिली आहे.
-
या पार्श्वभूमीवर आता अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय होणार? रस्त्यावर दहशत पसरवणारे तालिबानी नेमकं कोणत्या प्रकारचं सरकार अफगाणिस्तानमध्ये स्थापन करणार? याविषयी मोठी चर्चा आणि चिंता जगभरातल्या नेतृत्वांमध्ये पसरली आहे.
-
अफगाणिस्तानमध्ये कोणत्या विचारांचं, कोणत्या स्वरूपाचं सरकार अस्तित्वात येईल, त्या आधारावर त्याचे जागतिक पटलावर पडसाद उमटतील.
-
अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारे लोकशाही अस्तित्वात असणार नाही, हे तालिबाननं स्पष्ट केलं आहे.
-
तालिबानचा कमांडर वहिदुल्लाह हाशिमी यानं रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तालिबान्यांचा पुढचा प्लॅन ऑफ अॅक्शन सांगितला आहे.
-
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी शासन व्यवस्था ही पूर्णपणे शरिया कायद्यानुसार काम करेल. हा देश इस्लामिक पद्धतींनुसार काम करेल, असं वहिदुल्लाह म्हणाला आहे.
-
इथे कोणत्याही प्रकारे लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असणार नाही. कारण लोकशाहीला आमच्या देशात काहीही आधार नाही. आमचे अफगाणिस्तानमधले, कतारमधले नेते या व्यवस्थेवर काम करत आहेत, असं वहिदुल्लाहनं स्पष्ट केलं आहे.
-
तालिबानमध्ये काही प्रमुख नेत्यांची एक कौन्सिल स्थापन केली जाईल. या कौन्सिलचे अध्यक्ष असतील. ते संपूर्ण अफगाणिस्तानचे अध्यक्ष असतील. ही कौन्सिलच मंत्रिमंडळाची नियुक्ती करेल.
-
अफगाणिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्ष देखील असतील. पण राष्ट्राध्यक्ष हे कौन्सिल प्रमुख अर्थात संपूर्ण अफगाणिस्तानच्या प्रमुखांशी चर्चा करून राज्यकारभार पाहतील. हैबतुल्लाह अखुंदझादाच अफगाणिस्तानचे प्रमुख असतील.
-
१९९६ ते २००१ या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये असलेल्या तालिबानी राजवटीप्रमाणेच बऱ्यापैकी यावेळी देखील सरकारची रचना असेल. त्या वेळी सर्वोच्च नेता असलेला मुल्लाह ओमर यानं रोजच्या कारभाराची पूर्ण व्यवस्था कौन्सिलवर सोडून दिली होती.
-
यंदा अखुंदझादा कौन्सिलच्या अध्यक्षाच्याही वर असतील आणि देशाच्या राष्ट्राध्यक्षाशी सल्लामसलत करतील, असं देखील वहिदुल्लाहनं सांगितलं आहे. कदाचित अखुंदझादाचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता देशाचा राष्ट्राध्यक्ष होईल.
-
अफगाणिस्तानचं लष्कर पूर्णपणे नष्ट झालं आहे. पण आता आम्ही पुन्हा त्याची बांधणी करणार असल्याचं वहिदुल्लाह म्हणाला.
-
अफगाणिस्तानच्या लष्करातील जवान, अधिकारी कुठे आहेत हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला वाटलं तर आम्ही त्यांना कॉल करून देशाच्या लष्करात सहभागी होण्यासाठी सांगू, असं वहिदुल्लाहनं स्पष्ट केलं आहे.
-
अफगाणिस्तानच्या लष्करातील मोठ्या संख्येने सैनिकांना तुर्की, जर्मनी, इंग्लंडमध्ये उच्च दर्जाचं लष्करी प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांची आम्हाला गरज आहे, असं देखील वहिदुल्लाह म्हणाला आहे.
-
आधीच्या लष्करातील अधिकारी आणि सैनिकांना पुन्हा घेतलं जाणार असलं, तरी एकूणच लष्करामध्ये सुधारणा करून नव्या स्वरूपात लष्कर तयार करण्यात येईल.
-
तालिबानला सध्या प्राामुख्याने वैमानिकांची गरज आहे. अफगाणिस्तानच्या हवाई दलाची अनेक हेलिकॉप्टर्स आणि विमाने तालिबान्यांनी ताब्यात घेतली आहेत. त्यांना चालवण्यासाठी पायलट्सची आवश्यकता असेल.
-
“आम्ही अनेक पायलट्सला संपर्क केला आहे. नव्या लष्करामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्यांना विचारणा केली आहे. आम्ही अजूनही अनेकांना बोलावणार आहोत”, असं वहिदुल्लाहनं सांगितलं आहे.
-
अफगाणिस्तानची एकूण २२ लष्करी विमानं, २४ हेलिकॉप्टर्स आणि शेकडो अफगाण सैनिक उझबेकिस्तानमध्ये आहेत.
-
तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर लागलीच शरिया कायदा लागू करण्यात आला असून महिलांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
-
अफगाणिस्तानमध्ये अनेक ठिकाणी तालिबान्यांनी महिलांचे भिंतींवर असलेले पोस्टर्स स्प्रे कलरने रंगवून झाकून टाकले आहे.
-
१९९० च्या दशकात तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर शरिया कायद्यानुसार महिला आणि मुलींना शिक्षणासह काम करण्यास मज्जाव केला होता. त्यांना पूर्ण चेहरा झाकणे बंधनकारक करण्यात आले आणि पुरुषांशिवाय एकटं बाहेर पडण्यावरही बंधनं घालण्यात आली होती.
-
यावेळी मात्र महिलांना बुरखा घालण्याची गरज नाही, त्या फक्त हिजाब घालून देखील घराबाहेर पडू शकतात, असं तालिबानने म्हटलं आहे.
-
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर स्थानिकांमध्ये देखील दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
-
अनेक ठिकाणी स्थानिकांनी आपलं घर-दार सोडून पळ काढण्याचा मार्ग अवलंबला आहे.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”