-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय भेटींच्या मालिकेदरम्यान गुरुवारी दुसरी बैठक अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत केली.
-
कमला हॅरिस यांच्यासोबतच्या या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी करोनाच्या महामारीमध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या सहकार्यासाठी अमेरेकीचे मनापासून आभार व्यक्त केले.
-
मोदी आणि कमला हॅरिस या दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये खाजगीत चर्चा झाली आणि नंतर शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीला उपस्थिती लावली.
-
पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रणही दिले आहे. “भारताचे लोक तुमचे स्वागत करण्याची वाट पाहत आहेत. मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो,” असे पंतप्रधानांनी म्हटले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि देशाला दहशतवादी गटांचे समर्थन थांबवण्यास सांगितले आहे.
-
कमला हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हॅरिस यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही.
-
बैठकीपूर्वी दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोविड साथीच्या काळात कमला हॅरिस यांच्या मदतीची आठवण करून दिली.
-
“उपराष्ट्रपती झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. भारत कोविडशी लढत असताना एकदा संभाषण झाले होते. त्यावेळी कमला हॅरिस यांचे एकतेच शब्द मला आठवले. अमेरिकन सरकार आणि कंपन्या आणि परदेशातील भारतीय समुदाय कोविड महामारीशी अत्यंत कठीण लढाईत खूप मदत करत आहेत,” असं मोदी म्हणाले.
-
“अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि हॅरिस यांनी स्वतः अशा वेळी पदभार स्वीकारला जेव्हा संपूर्ण जगाला एक अतिशय कठीण आव्हान भेडसावत होते आणि अतिशय कमी कालावधीत त्यांनी कोविड किंवा हवामान बदलांसारख्या आपत्तींसोबत लढा देत यश मिळवले,” अशा शब्दात मोदींनी कमला यांच्या कामाचं कौतुक केलं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिकेला गेलेले परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी भविष्यातील सहकार्याच्या क्षेत्रासह अंतराळ सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, उदयोन्मुख तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य या विषयांवर चर्चा केल्याचे सांगतले.
-
भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही आहेत असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. “आमची मूल्ये समान आहेत आणि आमचे सहकार्य हळूहळू वाढत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून तुमची निवड ही एक अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे,” असंही मोदी म्हणाले.
-
“तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात आणि मला खात्री आहे की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमचे द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील,” असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. (सर्व फोटो ट्विटर आणि रॉयटर्सवरुन साभार)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?