-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मास्क यांचं नातं आता सर्वश्रुतच आहे. आपण मास्क कधीच घालत नाही, असं खुद्द राज ठाकरेंनीच जाहीरपणे सांगितलं आहे.
-
शनिवारी राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाची लागण झाल्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या या वक्तव्यांची चर्चा सुरू झाली. त्यांनी करोनाविषयी आणि मास्कविषयी केलेली विधानं पुन्हा व्हायरल होऊ लागली.
-
राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाची सौम्य लक्षणं असून ते दोघेही घरीच विलगीकरणात उपचार घेणार आहेत.
-
मात्र, राज ठाकरे यांनी अनेकदा मास्कविषयी केलेल्या विधानांचे आता दाखले दिले जाऊ लागले आहेत. खरंच राज ठाकरेंना मास्क घालायला आवडत नाहीत का? असा प्रश्नही विचारला जातोय.
-
या सगळ्याला सुरुवात झाली ७ मे रोजी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोनाची परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
-
या बैठकीला राज ठाकरे काळा कुडता घालून पोहोचले. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली. करोनाविषयी चर्चा करताना राज ठाकरे मास्कविनाच मंत्रालयात पोहोचले, असं बोललं जाऊ लागलं.
-
मंत्रालयात जाताना राज ठाकरेंचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटोही तुफान व्हायरल झाले. फोटोत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मास्क दिसत असताना राज ठाकरेंनी मात्र मास्क घातला नव्हता.
-
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मास्क का घातला नव्हता, असं माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता सगळ्यांनी मास्क लावला आहे म्हणून मी मास्क लावला नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.
-
२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे हे विना मास्क दिसून आले. त्यावर विचारणा केली असता “मी मास्क घालतच नाही”, असं राज ठाकरे म्हणाले होते.
-
त्याआधी देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळा अनावरण सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिले होते. मात्र, त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी मास्क घालूनही राज ठाकरे विनामास्क होते.
-
राज ठाकरेंच्या मास्क न वापरण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एका पत्रकार परिषदेत विचारणा केली असता, “मास्क न घालणाऱ्यांना माझा नमस्कार”, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली होती.
-
संजय राऊत यांनीही राज ठाकरेंना यावरून टोला लगावला होता. “करोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कोणालाही सोडत नाहीत. याच्यापासून तुम्हाला त्रास आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास आहे”, असं संजय राऊत एबीपीशी बोलताना म्हणाले होते.
-
दरम्यान, या वर्षी जुलै महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला. यावेळी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी मात्र त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातल्याचं दिसून आलं.
-
बाबासाहेबांसोबत जितका वेळ राज ठाकरे चर्चा करत होते, तेवढा पूर्ण वेळ त्यांनी मास्क लावून ठेवला होता. या भेटीचे आणि राज ठाकरेंनी मास्क लावण्याचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.
-
लोकसत्तातर्फे आयोजित दृष्टी आणि कोन या संवाद मालिकेमध्ये राज ठाकरे पाहुणे म्हणून उपस्थित होते, तेव्हा त्यांना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मास्क न घालण्याचं कारण विचारलं.
-
लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी यावर आपली भूमिका मांडली होती. “जर घरातच राहायचं आहे तर तोंडाला पट्टी का बांधावी? बाहेर कुठे फिरणं नसताना मास्क लावून काय करायचं? ज्यांनी मास्क लावले त्यांना करोना झाला नाही असं म्हणणं आहे का? मी मास्क लावला काय आणि नाही लावला काय”, असं राज ठाकरे म्हणाले होते.
-
“मध्यंतरी मला हाताच्या आणि पायाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात जावं लागलं तेव्हा मास्क लावला होता. मला तिरस्कार नाही पण गुदरमल्यासारखं होतं”, असं ते म्हणाले होते.
-
“शिवाजी पार्कात मी पाहिलं तर अनेक लोक मास्क लावून धावत होते. मी म्हटलं एक तर धावू नका किंवा मास्क लावू नका. कुठेतरी बेशुद्ध होऊन पडाल. त्यामुळे मास्क लावण्यास माझा विरोध आहे असं काही नाही”, असा किस्सा देखील त्यांनी लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलताना सांगितला होता.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल