-
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले. मात्र यावरुन भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीची मोट बांधणारे मुख्य नेते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुख्यंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुली संदर्भात आरोप केल्यानंतर देशमुखविरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते.
-
अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. त्यांना अनेकदा समन्स बजावले होते
-
परंतू देशमुख ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते.त्यांचं म्हणणं ते वकिलांच्या मार्फत न्यायालयात मांडत होते.
-
गेल्या पाच महिन्यांपासून विविध तपास यंत्रणा अनिल देशमुखांचा शोध घेत होत्या परंतु त्यांचा कोणतीच माहिती हाती लागत नव्हती.
-
मात्र आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी ट्विट करत त्यांची बाजू मांडली असून या प्रकरणाशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
“मला ईडीने समन्स बजावल्यानंतर मी ईडीला तपासात सहकार्य करत नसल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवलं की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केलीय,” असं देशमुख म्हणाले आहेत.
-
“परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत. ते भारत सोडून पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. माझ्यावर आरोप करणारा व्यक्तीच पळून गेलाय,” असंही देशमुख यांनी म्हटलंय.
-
“परमबीर सिंगांवर पोलीस खात्यातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन वाझेने परमबीर सिंगच्या सांगण्यवारून माझ्यावर आरोप केलेत,” असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
-
“याआधी तो (वाझे) तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना त्याला नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यामुळे त्याने माझ्यावर आरोप केलेत,” असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.
-
“माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय, याचं मला दुःख आहे. मी नैतिकतेला धरून चालणारा माणूस आहे. गेल्या ३० वर्षात माझ्यावर एकही आरोप झालेला नाही. माझ्यावर आरोप करणारा परमबीर सिंग कुठे आहे,” असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
-
दरम्यान, देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधल्याचं पहायला मिळालं
अखेर अनिल देशमुख यांना इडीच्या कस्टडीत जावं लागणार. ते आले स्वतःच्या गाडीने परंतु जाणार इडीच्या कस्टडीत असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. -
अनिल देशमुख यांना आता शंभर कोटींचा हिशोब द्यावा लागणार, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे
-
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे हे पैसे कसे वळवले जात होते हे अनिल देशमुख यांना सांगावं लागणार,” असं वक्तव्य सोमय्या यांनी केलं आहे.
-
आत्ता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार अशी प्रतिक्रिया त्यांनी सोमय्या यांनी दिली आहे.
-
दरम्यान अनिल देशमुख यांची आज चौकशी ईडीच्या कार्यालयामध्ये झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये नक्की काय प्रश्न विचारण्यात आले आणि इतर तपशील अद्याप समोर आलेला नाही.
-
देशमुख प्रकरणावरुन महाविकास आघाडीवर विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाने टीकेची झोड उठवली होती. त्याचाच प्रत्यय आज सोमय्यांच्या टीकेने पुन्हा आला.

Ashish Shelar : “राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते ते आता संपले…”, आशिष शेलार यांचं वक्तव्य