-
विद्येचं माहेर घर आणि सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराची एक ओळख आहे. ही ओळख शहरातील सर्वांनी जपली आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे शहराचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि भाजपचे नेते शहराचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी वाडेश्वर कट्ट्यासाठी पुढाकार घेतलाय.
-
यावेळी शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी एकत्रित दिवाळीचा फराळ घेत मनमोकळ्या गप्पा मारल्या. या फराळाच्या सोबतीला इडली सांबर, वडा सांबर आणि चहा घेत नेहमीच्या राजकीय टीका टिप्पणीच्या पलीकडे जाऊन गप्पा मारल्या.
-
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई हे उपस्थित होते.
-
मागील काही महिन्यापासून पुणे महापालिकेमधील सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या निमित्ताने राजकीय गोडवा निर्माण होण्याच्या दृष्टीने महापालिकेतील सर्व पक्षीय नेते वाडेश्वर कट्ट्यावर सहभागी झाले.
-
यावेळी सर्व नेत्यांनी पुणे शहराच्या विकासासाठी सर्वजण एकत्रित येऊन काम करुयात अशी भूमिका पुण्यात दिवाळी फराळ निमित्ताने आयोजित केलेल्या कट्ट्यावर मांडली.
-
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे महापालिकेत काम करताना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र, असेच चित्र कायम राहणार नाही. त्या पार्श्वभूमीवर आज दिवाळी फराळ निमित्ताने सर्वांना एकत्रित आणण्याचे काम केले.”
-
“सभागृहात, व्यासपीठावर प्रत्येक जण पक्षाची भूमिका मांडत असतो. मात्र त्यानंतर आपण सर्वांनी आपल नात जपण्याची गरज आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रित काम करुयात.” तसेच अनेक विषयावर प्रत्येक जण भूमिका मांडत असतो. मात्र ते वैचारिक मतभेद टोकाचे असता कामा नये,” अशी भूमिका मोहोळ यांनी मांडली.
-
राजकीय क्षेत्रात काम करताना आरोप प्रत्यारोप अनेक वेळा पाहिले. मात्र मागील काही दिवसात वैयक्तिक पातळीवर जी टीका सुरू आहे ती होता कामा नये, कुठेही मन भेद होणार नाही याची आम्ही निश्चित काळजी घेऊ आणि पुणे शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करुयात, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली.
-
तसेच जिथे पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप चुकीचे काम करेल तिथे राष्ट्रवादी आवाज उठविणार, असा इशारा देखील देण्यास ते विसरले नाही.
-
काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी काँग्रेस शिवाय पुणे शहराचा महापौर होऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं.
-
“राजकीय क्षेत्रात मतभेद असतात, मात्र आज मनभेद झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. अशा गोष्टी होता कामा नये. आज दिवाळी सणाच्या निमित्ताने सांगायचे झाल्यास जे फटाके फुटले त्याचं प्रदूषण घरापर्यंत जातं. यामुळे कुटुंबावर देखील परिणाम होतो. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे,” अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल यांनी मांडली.
-
आगामी महापालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असून त्यामुळे काँग्रेस शिवाय पुणे शहराचा महापौर होऊ शकत नाही, असाही दावा आबा बागुल यांनी केला.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”