-
क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानपाठोपाठ ३१ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या मुनमुन धमेचाची भायखळा कारागृहातून सुटका करण्यात आली.
-
केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) क्रूझ टर्मिनसवर केलेल्या कारवाईत आर्यन खानसह मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना अटक केली होती. त्यांच्याकडून १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि एक लाख ३३ हजार रोख रुपये जप्त केले होते.
-
मात्र जामीनावर बाहेर असणाऱ्या मुनमुन धमेचाने आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असून जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या काही अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी तीने याचिकेद्वारे केलीय.
-
मुनमुनने एनसीबीच्या मुंबईमधील कार्यालयापेक्षा दिल्ली कार्यालयात हजेरी लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केलीय.
-
मी दिल्लीला राहते त्यामुळे मला दिल्ली एनसीबी कार्यालयामध्ये जाणं हे अधिक सोयीस्कर ठरेल असं मुनमुनने म्हटलं आहे.
-
मुंबईत आपलं कोणतंही घर नसल्याने मुंबईत राहून एनसीबी कार्यालयात आठवड्याला हजेरी लावणं गैरसोयीचं असल्याचं मुनमुनने म्हटलं आहे.
-
मुनमुनला आर्यन आणि अरबाज मर्चंटसोबतच २८ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर झालेला. मात्र तिची सुटका सर्व कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती.
-
जामीन देताना न्यायालयाने घातलेल्या अटकीनुसार धमेचा हिला दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान मुंबई एनसीबी कार्यालयामध्ये हजेरी लावणं अनिवार्य आहे.
-
तसेच तपास यंत्रणांना माहिती दिल्याशिवाय तिला कुठे प्रवास करता येणार नाही, असं न्यायालयाने घातलेल्या अटींमध्ये म्हटलं आहे.
-
त्याचप्रमाणे प्रवास करायचा झाल्यास कुठे आणि कसा प्रवास करणार आहे हे सांगितल्याशिवाय मुंबई बाहेर जाऊ नये असंही न्यायालयाने जामीन देताना मुनमुनला सांगितलं आहे.
-
धमेचा हिने वकील काशीफ अली खान देशमुख यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून मी मूळची मध्य प्रदेशची असून दिल्लीमध्ये काम करते असं म्हटलं आहे.
-
मुंबईमध्ये माझं घर नाहीय. त्यामुळे माझ्यावर जामीन देताना टाकण्यात आलेली बंधन ही माझ्या प्रोफेशनल तसेच सामाजिक जीवनावर परिणाम करणारी आहेत, असा दावा मुनमुनने केलाय.
-
मुंबईमध्ये दर आठवड्याला एनसीबी कार्यालयात येण्यासाठी मला मुंबईबाहेर जाण्याची परवानगी दिली तरी कठीण आहे असं मुनमुनने याचिकेमध्ये म्हटलंय.
-
जामीन देताना मुंबईसंदर्भातील या अटी व्यवहार्य आणि अंमलात आणताना अडचणी येण्यासारख्या असल्याचं मुनमुनने म्हटलंय.
-
इतकच नाही तर आवश्यकता असल्यास आपण आपल्या कामाची आणि सर्व प्रवासाची माहिती मध्य प्रदेश किंवा दिल्ली एनसीबीच्या कार्यालयात हवी तेव्हा आणि हव्या त्या पद्धतीने देण्यास तयार असल्याचंही मुनमुनने म्हटलं आहे.
-
तसेच तपास यंत्रणांना आपण कुठे जाणार आणि कधी जाणार यासंदर्भातील माहिती आधीच देण्याच्या अटीमध्येही शिथिलता देण्यात यावी असंही या अर्जात मुनमुनने म्हटलं आहे.
-
त्यामुळे मुंबई बाहेर जाऊ देणे, दिल्लीत एनसीबीच्या कार्यालयात हजेरी ग्राह्य ठरणे आणि कुठे आणि कसा प्रवास करणार याबद्दलची माहिती तपास यंत्रणांना न देणे अशा तीन प्रमुख मागण्या मुनमुनने केल्यात. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
-
आता न्यायालय मुनमुनला दिलासा देणार की तिला अशाच प्रकारे मुंबईमधील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार हे पुढील आठवड्यातच स्पष्ट होईल. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो