-
जगभरातल्या संशोधक आणि शास्त्रज्ञांची झोप उडवणारा करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतापर्यंत येऊन पोहोचला आहे.
-
भारताच्या कर्नाटकमध्ये ओमायक्रोन व्हेरिएंटची लागण झालेले दोन रुग्ण आढळले असून ते दक्षिण अफ्रिकेतून भारतात आल्याचं समोर आलं आहे.
-
सर्वप्रथम ओमायक्रॉनचे रुग्ण दक्षिण अफ्रिकेमध्ये आढळून आले होते. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण अफ्रिकेतील लॅन्सेट लॅबमध्ये यासंदर्भातल्या नमुन्यांची तपासणी करताना डॉ. रकेल वियाना यांना हा व्हेरिएंट सर्वप्रथम दिसला.
-
नोव्हेंबर महिन्यात जेव्हा आपण नमुने पाहिले तेव्हाच याचा खूप मोठा परिणाम होणार असल्याची जाणीव झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. “मी जे पाहत होती ते पाहिल्यानंतर मला धक्काच बसला होता. प्रक्रियेत काही चूक तर नाही झाली ना असा प्रश्नही मी उपस्थित केला होता,” अशी माहिती रकेल वियाना यांनी दिली आहे.
-
यानंतर २०-२१ नोव्हेबंरदरम्यान जोहान्सबर्गमधील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ कम्युनिकेबल डिसीज संस्थेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू केल्या. तिथेच एकूण ३२ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ओमायक्रोन या नव्या व्हेरिएंटची खात्री पटली.
-
शास्त्रज्ञांनी ही माहिती GISAID ग्लोबल सायन्सच्या डेटाबेसमध्ये दिली. यावेळी बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्येही अशाच केसेस रिपोर्ट झाल्याची माहिती NICD ला मिळाली. गांभीर्य लक्षात घेत जागितक आरोग्य संघटनेला कळवण्यात आलं. काही दिवसांतच दक्षिण अफ्रिकेत ओमायक्रॉन पसरायला सुरुवात झाली.
-
दक्षिण अफ्रिकेनंतर आफ्रिकेतील इतर काही छोट्या देशांमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार झाला. त्यापाठोपाठ युरोपात देखील या विषाणूनं हातपाय पसरले.
-
करोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट अधिक वेगाने प्रसारित होत असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला. त्यांचा अंदाज खरा ठरवत अवघ्या १० दिवसांमध्ये तब्बल ३० देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले.
-
अफ्रिकेमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागताच अनेक देशांनी अफ्रिकेतून होणाऱ्या विमान वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा गांभीर्याने विचार सुरू केला. काही देशांनी तसे निर्बंध घातले देखील. मात्र, भारताने तसे निर्बंध घातले नव्हते.
-
आफ्रिका खंडात वावरणाऱ्या या व्हेरिएंटबद्दल भारतात फक्त बातम्याच येऊन धडकत असताना प्रत्यक्ष हा व्हेरिएंट येऊन धडकण्याची देखील भिती अनेक शास्त्रज्ञ व्यक्त करत होते.
-
“भारतात ओमायक्रॉन आढळल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या विषाणूची संक्रमणक्षमता पाहता काही दिवसात हे होण्याची शक्यता आहे,” असं आयसीएमआरचे साथीसंदर्भातील विभागाचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी यांनी सांगितलं.
-
अवघ्या काही तासांतच डॉ. पांडा यांनी वर्तवलेली शक्यता खरी ठरली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतात दोन ओमायक्रोन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याची माहिती दिली.
-
ओमायक्रॉनच्या दोन्ही केसेस कर्नाटकमध्ये आढळल्या असून जगभरातील ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा ३७३वर गेल्याचं देखील त्यांनी सांगितलं. जगातल्या एकूण १० देशांमध्ये ओमायक्रॉन फोफावला आहे.
-
कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दोन्ही रुग्ण हे पुरुष असून ६६ वर्षे आणि ४६ वर्षांचे आहेत. दक्षिण अफ्रिकेतून गेल्याच आठवड्यात ते भारतात परतले होते.
-
या दोन्ही रुग्णांना करोनाची अत्यंत सौम्य लक्षणं दिसत असून त्यांचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जगभरात सापडलेल्या या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये देखील अशाच प्रकारची सौम्य लक्षणंच आढळली आहेत.
-
यापैकी ६६ वर्षीय रुग्ण २० नोव्हेंबर रोजी भारतात आला होता. यावेळी त्याच्यात लक्षणं नसल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं होतं. दोन दिवसांनी त्याची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, नंतर जेनोम सिक्वेन्सिंगद्वारे आलेल्या अहवालात ओमायक्रोन व्हेरिएंटचे विषाणू असल्याचं दिसून आलं.
-
एकूण २४ व्यक्ती ६६ वर्षीय रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांच्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या २४० व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहेत.
-
४६ वर्षीय रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण ३ व्यक्तींच्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्ती २२ आणि २५ नोव्हेंबरदरम्यान पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्या सगळ्यांना विलगीकरण करून ठेवण्यात आलं आहे. त्यांचे अहवाल जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
-
ओमायक्रोन व्हेरिएंटची WHO ला सर्वप्रथम २५ नोव्हेंबर रोजी माहिती देण्यात आली होती. B.1.1.529 या कोडने ओळखल्या जाणाऱ्या व्हेरिएंटला WHO नं २६ नोव्हेंबर रोजी ‘ओमायक्रॉन’ असं नाव दिलं.
-
ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत अभ्यासाअंतीच निष्कर्ष काढता येतील, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, आत्ता प्राधान्याने देशातील सर्व पात्र व्यक्तींना करोनाचे दोन्ही डोस देणं आवश्यक असून त्यात अजिबात उशीर करू नये, असा सतर्कतेचा इशारा नीती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल यांनी दिला आहे.
-
दरम्यान, भारतात देखील ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर विमान वाहतुकीवर नवे निर्बंध टाकण्यात आले आहेत.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख