-
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट विश्वात चर्चा सुरू आहे ती विराट कोहलीची. विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून सध्या बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
-
टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झालेल्या विराटकडून एकदिवसीय संघाचं कर्णधारपद देखील काढून घेण्यात आलं आहे.
-
मात्र, यावरूनच विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं उघड झालं आहे. कारण विराट आणि बीसीसीआय यांनी त्याच्या कर्णधारपदाविषयी परस्परविरोधी दावे केले आहेत.
-
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीनं “विराट कोहलीला टी-२० संघाचं कर्णधारपद सोडू नकोस असं सांगितलं गेलं होतं”, असा दावा केला.
-
पण विराट कोहलीनं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बीसीसीआयचा हा दावा तर खोडून काढलाच, शिवाय एकदिवसीय मालिकेचं कर्णधारपदही इच्छेविरुद्ध काढून घेतल्याचं सांगितलं.
-
विराट कोहलीनं आज पत्रकार परिषदेमध्ये अनेक खळबळजनक खुलासे केले असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. त्यात सर्वात पहिला दावा म्हणजे बीसीसीआयनं कर्णधारपद सोडू नकोस वगैरे सांगितलंच नाही!
-
“हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने मिळून घेतला होता. खरे तर बीसीसीआयने विराटला टी-२० चे कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती, पण त्याला ते मान्य नव्हते. यानंतर, दोन भिन्न लोक मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करावेत, असे निवड समितीला वाटत नव्हते”, असं गांगुलीनं म्हटलं होतं.
-
मी टी २०चे कर्णधारपद सोडू नये असे बोर्डाने कधीच म्हटले नाही असा खुलासा विराटने केला आहे. मी टी-२० कर्णधारपद सोडण्यापूर्वी बोर्डाशी बोललो होतो. बोर्डानेही माझ्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. मी टी-२० चे कर्णधारपद सोडू नये, असे बोर्डाने कधीच म्हटले नाही,” असे विराट म्हणाला.
-
मी त्यांना सांगितलं होतं की मी एकदिवसीय आणि कसोटी संघाचं कर्णधारपद सांभाळेन. मी तेव्हाही त्यांना म्हटलं होतं की तर निवड समितीला वाटलं की ही जबाबदारी मी सांभाळू शकत नाही, तर त्यालाही माझी हरकत नाही, असं विराट म्हणाला.
-
“एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाविषयी माझं बीसीसीआयशी काहीच बोलणं झालेलं नव्हतं. मला फक्त विश्रांती हवी होती. निवड समितीच्या बैठकीच्या दीड तास आधी मला संपर्क करण्यात आला. त्याआधी यावर काहीही चर्चा झालेली नव्हती”, असं विराटनं सांगितलं.
-
फक्त एका ओळीत कर्णधारपद काढल्याचं सांगितल्यातंही विराटनं सांगितलं. निवड समितीच्या प्रमुखांनी माझ्यासोबत कसोटी संघाविषयी चर्चा केली. आणि तो फोन कॉल संपवताना निवड समितीच्या पाचही सदस्यांनी मला सांगितलं की तू आता एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील. हे ठीक आहे”, असं विराट कोहली म्हणाला.
-
“कर्णधारपदाविषयी म्हणाल, तर मी प्रामाणिकपणे कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाविषयी माझा हा निष्कर्ष आहे. इथे तुम्हाला माहिती असतं की चांगली कामगिरी कशी करायची आहे. तुम्हाला फक्त तुमची जबाबदारी समजून घेऊन तुमच्या क्षमतांनुसार कामगिरी करायची असते”, असं देखील विराट कोहलीनं यावेळी नमूद केलं.
-
दरम्यान, हा वाद सुरू असतानाच विराट कोहली आणि रोहीत शर्मामधील वादाचीही चर्चा सुरू झाली आहे. या वादामुळेच रोहीतनं दक्षिण अफ्रिका दौऱ्याच्या कसोटी मालिकेतून माघार घेतल्याचं बोललं जातंय. विराटनंही याच कारणामुळे एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्याची चर्चा सुरू होती.
-
मात्र, या चर्चेवर विराट कोहलीनं स्पष्टीकरण दिलं आहे. “मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे आणि होतो. तुम्ही हे प्रश्न मला विचारायलाच नकोत. तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारायला हवेत, जे यासंदर्भात चुकीच्या गोष्टी लिहीत आहेत. माझं म्हणाल तर मी सिलेक्शनसाठी उपलब्ध आहे. मी नेहमीच खेळण्यासाठी इच्छुक असतो”, असं विराट कोहली म्हणाला.
-
रोहित शर्मासोबत वाद असल्याच्या चर्चेवर विराटनं यावेळी प्रतिक्रिया दिली. “माझ्या आणि रोहितमध्ये कोणतीही अडचण नाही. गेल्या अडीच वर्षांपासून मी यावर स्पष्टीकरण देत आहे. या चर्चांमुळे मी आता थकलो आहे,” असे विराट कोहलीने म्हटले आहे.
-
“कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर माझ्या फलंदाजीवर फारसा परिणाम होणार नाही. जेव्हा मी भारतासाठी खेळतो तेव्हा मी माझे सर्वस्व देतो. जसे मी भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये माझे योगदान देत असेन,” असेही विराटने यावेळी सांगितले.
-
मात्र, आता विराट कोहलीच्या या स्पष्टीकरणावर बीसीसीआयनं आपली बाजू मांडली आहे. “आम्ही विराट कोहलीला या निर्णय प्रक्रियेची माहिती दिली नाही, असं विराट म्हणू शकत नाही”, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
-
“आम्ही विराट कोहलीसोबत सप्टेंबरमध्ये बोललो होतो आणि टी-२० कर्णधारपद न सोडण्याविषयी त्याला सांगितलं. पण विराटनं टी-२०चं कर्णधारपद स्वत:हून सोडल्यानंतर व्हाईट बॉल मॅचेससाठी दोन स्वतंत्र कर्णधार ठेवणं कठीण होतं”, असंही बीसीसीआयनं सांगितलं आहे.
-
दरम्यान, ज्या फोनकॉल मीटिंगविषयी विराटनं दावा केला, त्या मीटिंगच्या दिवशीच त्याला एकदिवसीय कर्णधारपदाविषयी कळवलं असल्याचा दावा बीसीसीआयनं केला आहे.
-
“मीटिंगच्या दिवशीच सकाळी चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला एकदिवसीय कर्णधारपद रोहीत शर्माला देत असल्याचं कळवलं होतं”, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
-
बीसीसीआयचे दावे आणि विराट कोहलीचे खुलासे यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून त्यावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं