-
विदर्भ, मराठवाडय़ात अवकाळी पावसासह मंगळवारी गारपीट झाली़ औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनेक गावांत मंगळवारी सायंकाळी गारपीट झाल्याने शेतीवर पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे.
-
गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर, कांदा, तसेच मोसंबी व डाळिंब आदी फळबागांचेही नुकसान झाले. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले असून नागपूरसह, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला.
-
मोहाडी तालुक्यातील नवेगाव धुसारा शिवारात नयन पुंडे हा बारा वर्षीय मुलगा वीज पडून ठार झाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
-
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, नरखेड तालुक्यात गारांसह पाऊस झाला. मोहपा, वाढोना व मेंढला परिसरात गारपीट झाली. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्याला गारपिटीने झोडपले. गणोरी, बाभूळगाव शहर, आसेगाव राणी अमरावती आणि जवळपासच्या तालुक्यात गारा पडल्या.
-
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील १० ते १२ गावांत तर वैजापूर, गंगापूर तालुक्यातही गारांसह मोठा पाऊस झाला. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी गारपिटीचा अंदाज दिला होता. मंगळवारी दुपारी अचानक वातावरण बदलले आणि दोन जिल्ह्यांत गारपीट व पावसाने झोडपून काढले.
-
या गारपिटीसह पडलेल्या पावसाने तूर व कांदा या दोन पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. उशिराच्या कापूस विक्रीवरही या पावसाचा मोठा परिणाम होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. दरम्यान किती गावात गारपीट झाली व त्याची गंभीरता किती याची माहिती महसूल विभागाकडून गोळा केली जात आहे.
-
वैजापूर तालुक्यातील गंगथडीच्या भागात अचानक गारांचा पाऊस झाला. चेंडुफळ, अव्वलगाव, हमरापूर, नागमठाण, या गावांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. पैठण तालुक्यात आडुळ भागातील अंतरवली, आडगाव, बिडकीन या भागात गारपीट झाली.
-
दुपारच्या वेळी औरंगाबाद जिल्ह्यातील वातावरण बदलत गेले. अचानक अभाळ भरुन आले आणि सायंकाळपासून पाऊस सुरू झाला. जालना जिल्ह्यातील अंबड व भोकरदन तालुक्यात वालसावंगी परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
-
दोन ठिकाणी वीज पडली. तर बाभळीच्या झाडाखाली बांधलेला बैल ठार झाला. पारध, पिंपळगाव रेणुकाई, हिसोडा, वडोदतांगडा, पद्मावती, धावडा येथे अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याचे वृत्त आहे. तूर काढणीत असल्याने ती भिजल्यानेही नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
-
जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील फळबागांनाही याचा मोठा फटका बसला असून द्राक्ष, डाळिंब या फळबागांनाही मोठा फटका असल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लोहगाव, बालानगर, ७४ जळगाव, तारू पिंपळवाडी, मुलानी वाडगाव, आडुळ, वरुडी, गोपीवाडी आदी भागांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस व गारपीट झाली.
-
या गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर, कांदा, तसेच मोसंबी, संत्रा व डाळिंब आदी फळबागांचेही नुकसान झाले. तसेच वेचणीला आलेला कापूस ओला झाल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
-
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील दुनगाव, पिठोरी, सिरसगाव परिसरात मंगळवारी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. तीर्थपुरी गावाच्या परिसरातही अवकाळी पाऊस झाला आणि काही ठिकाणी गारा पडल्या.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच