-
अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी (४ जानेवारी) निधन झाले.
-
दीड हजारांहून अधिक अनाथ मुला-मुलींचे त्या संगोपन करीत होत्या.
-
सिंधुताई सपकाळ यांना गेल्या वर्षी ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आले होते.
-
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड महिन्यांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
-
या काळात त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
-
सिंधुताई सपकाळ यांनी ममता बाल सदन संस्थेसह बाल निकेतन (हडपसर), सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह (चिखलदरा) अभिमान बाल भवन (वर्धा), गोपिका गायीरक्षण केंद्र (वर्धा), सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था (पुणे) या संस्थांची स्थापना केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने सिंधुताई यांनी परदेश दौरे केले होते. आपल्या वक्तृत्वाने त्यांनी सर्वाना प्रभावित केले होते.
-
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यामध्ये तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
-
त्यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स अॅन्ड प्रॉडक्शन निर्मित ‘अनाथांची यशोदा’ हा अनुबोधपट निघाला होता.
-
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी सिंधुताई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
-
‘लोकसत्ता’तर्फे ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
-
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्काराने सिंधुताईंना गौरविण्यात आले आहे.
-
सिंधुताई सपकाळ ४० वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या.
-
सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता.
-
नकोशी असलेली मुलगी म्हणून त्यांना चिंधी या नावाने ओळखले जात होते.
-
मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकलेल्या सिंधुताई यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला.
-
वैवाहिक आयुष्यातील संघर्षांनंतर त्यांनी अनाथ मुलांसाठी काम करण्याचा वसा घेतला.
-
आपली कन्या ममता हिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले.
-
अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.
-
संस्थेमध्ये मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठी मार्गदर्शन केले जाते.
-
आर्थिक स्वावलंबी झाल्यावर या युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधून त्यांच्या विवाहाचे आयोजनही संस्थेतर्फे केले जाते. अशी सुमारे एक हजारांहून अधिक मुले या संस्थेशी संबंधित आहेत.

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य