-
अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. (सर्व फोटो फेसबुक आणि सागर कासार (लोकसत्ता डॉटकॉम प्रतिनिधी) यांच्याकडून साभार)
-
दीड हजारांहून अधिक अनाथ मुला-मुलींचे त्या संगोपन करीत होत्या. सिंधुताई सपकाळ यांना गेल्या वर्षी ‘पद्मश्री‘ने गौरवण्यात आले होते.
-
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड महिन्यांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
-
सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज (५ जानेवारी) ठोसरपागा येथे महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
-
सिंधुताईंच्या निधनाच्या वृत्तानंतर महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संस्थेच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी, हितचिंतकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.
-
हडपसर येथील मांजरी परिसरात असलेल्या सन्मती बाल निकेतन संस्थेत माईच पार्थिव आणण्यात आले.
-
सिंधुताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
-
सिंधुताईंनी स्थापन केलेल्या सन्मती बाल निकेतनमध्ये सिंधुताईंच्या निधनाच्या वृत्तामुळे शोककळा पसरलीय.
-
सिंधुताई सपकाळ यांनी ममता बाल सदन संस्थेसह बाल निकेतन (हडपसर), सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह (चिखलदरा) अभिमान बाल भवन (वर्धा), गोपिका गायीरक्षण केंद्र (वर्धा), सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था (पुणे) या संस्थांची स्थापना केली आहे.
-
आज सकाळपासूनच सन्मती बाल निकेतनमध्ये संस्थेमधील महिला, मुली आणि संस्थेशीसंबंधित सदस्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.
-
सकाळी नऊच्या सुमारास सिंधुताईंचं पार्थिव सन्मती बाल निकेतनमध्ये आणण्यात आलं.
-
सिंधुताईंनी स्थापन केलेल्या या संस्थेत काल रात्रीपासूनच शोकाकूल वातावरण आहे.
-
संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळच सिंधुताईंचा मोठा फोटो लावण्यात आलाय.
-
अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या महिलांना अश्रू अनावर होत असल्याचं, अनेकजणी हुंकदे देत रडत आहेत.
-
सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थेच्या मदतीने शिक्षण घेणाऱ्या मुलींनी सिंधुताईंच्या अंत्यदर्शनासाठी संस्थेच्या मुख्यालयात हजेरी लावण्यास सुरुवात केली.
-
या मुलींमध्ये सर्वच वयोगटातील मुलींचा समावेश होता.
-
संस्थेच्या प्रवेशद्वारापासून अगदी लांबपर्यंत सिंधुताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रांग लागल्याचं चित्र दिसत आहे.
-
सिंधुताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे.
-
तोंडावर मास्क, डोळ्यात पाणी अशा अवस्थेत अनेक महिला या रांगेत उभ्या असल्याचं दिसून येत आहे. सिंधुताईंना शेवटचं डोळे भरुन पाहण्यासाठी या महिला संस्थेच्या प्रवेशद्वाराबाहेर उभ्या आहेत.
-
या ठिकाणी बॅरिकेट्स लावून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र सिंधुताईंचे समर्थक शांतपणे रांगेत उभं राहून प्रशासनाला सहकार्य करत अंत्यदर्शनाच्या रांगेत गोंधळ उडणार नाही याची काळजी घेत आहेत.
