-
देशातील अन्य राज्यांमध्ये निर्बंध कठोर करण्यात आल्याने राज्यातही करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे.
-
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कोणते उपाय योजता येईल याबाबत चर्चा झाली.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, करोना नियंत्रण कृती गटाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यात नेमकी काय स्थिती आहे याचा टास्क फोर्सकडून आढावा घेतला.
-
राज्यातील रुग्ण वाढ येत्या काही दिवसात आणखी तीव्रतेने वाढणार असून किमान २०-२५ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
-
तसेच ओमायक्रॉनच्या लाटेत डॉक्टर, रुग्णालयातील अन्य कर्मचारी, आणि पोलीसही अधिक प्रमाणात सापडण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा ताण येऊ शकतो.
-
हा संभाव्य धोका टाळण्यासाठी आतापासूनच कठोर उपाययोजना करण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
-
रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला कृती गटाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
-
यानुसार अन्य राज्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची माहिती घेण्यात येत आहे.
-
गर्दी टाळण्याकरिता कोणते उपाय योजता येतील यावर भर देण्यात आला आहे.
-
अत्यावश्यक नसलेल्या सेवा बंद कराव्यात यावर चर्चा झाल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
-
मंत्रालयातल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाणार आहे. त्यानतंर मुख्यमंत्री कोणते निर्बंध लावायचे यासंबंधी निर्णय़ घेणार आहेत. त्यानुसार काही कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.
-
वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार आहेत.
-
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तूर्तास लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक केले जाण्याची शक्यता आहे. करोनामुळे आधीच आर्थिक कंबरडं मोडलं असताना आणि राज्याची आर्थिक स्थिती पाहता लॉकडाउन लावण्याचा सरकारचा विचार नाही अशी माहिती मिळत आहे. मात्र यावेळी मिनी लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो.
-
शनिवार – रविवार दुकानांच्या वेळांवर निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
-
मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले.
-
दरम्यान यावेळी अजित पवारांनी आरोग्य सुविधांना लागणाऱ्या आर्थिक मदतीला कोणतीही कात्री लावली जाणार नाही असे आदेश वित्त विभागाला दिले आहेत.
-
राज्यातली सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सनं लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
-
“टास्क फोर्सनं ऑगमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द वापरलाय. म्हणजे अशीच संख्या वाढत गेली, तर लॉकडाउनसारखा १०० टक्के बंद करण्याची आज तरी गरज नाही. पण अनावश्यक गोष्टींवर दररोजची रुग्णसंख्या तपासून बंधनं आणता येतील का? याविषयीचा निर्णय घेतला जाईल. या विषाणूला रोखण्यासाठी गर्दी थांबवणं गरजेचं आहे. त्यानुसार गर्दी करणाऱ्या गोष्टींवर काही निर्बंध टाकण्यासाठी निर्णय घेतला जाईल. पण आजच त्यावर निर्बंध टाकले जातील, असं नाही. मुख्यमंत्र्यांना त्यावर माहिती दिली असून त्या त्या वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल”, असं राजेश टोपे म्हणाले.
-
(File Photos)
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…