-
लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यात ४१ हजार नवे रुग्ण आढळले, तर १३३ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. या आदेशानुसार १० जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. यात लग्न समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याशिवाय केवळ लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार आहे. हे निर्बंध काय आहेत जाणून घेऊयात.
-
पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.
-
खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे.
-
सरकारी कार्यालयांची दारे अभ्यगतांसाठी बंद करण्यात आली आहेत.
-
लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
-
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
-
अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.
-
मॉल्स, व्यापारी संकुले : ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद.
-
उपाहारगृहांमध्ये ५० टक्केच प्रवेशाला परवानगी असेल.
-
शाळा व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय.
-
चित्रपट आणि नाटय़गृहे : ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी
-
केसकर्तनालये ५० टक्के क्षमतेने रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
-
जलतरण तलाव, सौंदर्य प्रसाधनगृह बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र केशकर्तनालय सुरु असताना ब्युटी पार्लर बंद ठेवण्यास सांगितल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर त्यांनाही सुधारित आदेश काढत परवानगी देण्यात आली.
-
व्यायामशाळा बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र विरोध झाल्यानंतर ५० टक्के क्षमतेसह जीम सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.
-
जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
-
प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.
-
रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतुकीवर कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नाहीत. जिल्हाबंदीही घालण्यात आलेली नाही. रेल्वे गाड्यांमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवास करण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. मास्क नसल्यास दंड ठोठावण्यात येईल. खासगी गाड्यांमधून प्रवास करताना मास्क आवश्यक असेल.
-
आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र सरकारच्या नियमांनुसार होणार. राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या प्रवासासाठी ७२ तासात केलेली RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार.
-
दरम्यान कोणाचीही रोजी रोटी बंद करायची नाही, पण आरोग्याचे नियम पाळताना हलगर्जीपणा नको, असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम धुडकावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश यंत्रणांना दिले. आपल्याला टाळेबंदी जारी करून सर्व व्यवहार ठप्प करायचे नाहीत, असेही स्पष्ट केले.
-
अनावश्यक घराबाहेर पडून व नियम पाळण्यात हलगर्जीपणा करून करोनाचे दूत बनू नये, असे आवाहन ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.
-
राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी आणि गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,
-
कोरोनाच्या लढताना दोन वर्षांच्या काळात आपण दोन मोठय़ा लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पावले उचलून रोखल्या. मात्र आता नवीन विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही, यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. त्यामुळे वारंवार कृतीगट आणि केंद्रीय आरोग्य विभागाशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून राज्यात काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
-
आपल्याला लॉकडाउन लागू करायचा नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही. प्रत्येक नागरिकाने आता ही लढाई अंतिम आहे, अशा निश्चयाने आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही, तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही, पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
-
नियम बहुतांश नागरिक पाळतात, पण काही मूठभर नागरिकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळे प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना आणि पोलिसांना दिले आहेत. हे सर्व आपल्या भल्यासाठीच आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले.
-
(All – File Photos)

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक