-
आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली.
-
राज्यातील दहा जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एकाला पद्मविभूषण, दोघांना पद्मभूषण तर सात जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
-
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
-
“राष्ट्रीय स्तरावर माझ्या कामाची नोंद घेतली गेली याचा आनंद आहे. माझ्या आजवरच्या कामाचे चीज झाल्याची भावना आहे. पुरस्कारांनी प्रोत्साहन मिळते. मात्र, मैफिलीत मिळणारी श्रोत्यांची दाद हा सर्वात मोठा पुरस्कार आहे.”, अशी भावना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली आहे.
-
‘टाटा’सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आणि ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
-
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर “देशाच्या जडणघडणीत अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या बरोबर पद्म किताबाचा मानकरी ठरणे हा माझा बहुमान आहे. भारत सरकारला मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. आरोग्य हा समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्वाना समान आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.”, अशी भावना सायरस पूनावाला यांनी व्यक्त केली.
-
विंचू दंशावरील संशोधनासाठी डॉ. हिंम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. “चाळीस वर्षांपासूनच्या संशोधनाची पद्मश्री ही पावती आहे. विंचूदंश आणि सर्पदंशावर उपचारांसाठी रुग्णांनी विश्वास दाखवल्यामुळेच मी दीर्घकाळ काम करू शकलो. महाडमध्ये मी काम करतो. येथील नागरिक आणि रुग्ण यांना या सन्मानाचे श्रेय देतो. येत्या काळात बी-१२ जीवनसत्त्वाची कमतरता आणि करोना अशा विषयांवरील संशोधन पूर्ण करायचे आहे. त्यासाठी हा किताब उत्साह वाढवणारा ठरेल.”, असं मत बावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.
-
‘खेळताना रंग बाईचा होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’ अशा एकापेक्षा एक सरस, ठसकेबाज लावणी गाणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
-
तीन दशके हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल आवाजाच्या बळावर स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या पार्श्वगायक सोनू निगम यांचीही पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते सोनू निगम यांनी हिंदूीबरोबरच मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड, तमिळ भोजपुरी, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
-
सातारा जिल्ह्यातील अनिल राजवन्सी यांचा देखील पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे ते संचालक आहेत.
-
वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. विजयकुमार डोंगरे आणि डॉ. भिमसेन सिंघल यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
-
डॉ. बालाजी तांबे यांना आयुर्वेद क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा