-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना एक तासाहून अधिक भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. टुकडे टुकडे गँगचा उल्लेख करण्यापासून ते तुम्ही देशभर करोना पसरवला असे आरोप मोदींनी यावेळी केले. त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात…
-
करोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने आणि दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे अनंत हाल-अपेष्टा सहन करत या मजुरांना आपापल्या गावी परत जावे लागले. देशात करोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील ‘आप’ कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.
-
‘‘करोनाच्या पहिल्या लाटेत देश टाळेबंदीचे पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. त्यांनी लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन करोना पसरवण्याचे काम करा, असा संदेश हे नेते देत होते. तुम्ही (काँग्रेस) लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही गोंधळाचे वातावरण निर्माण केले. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तुम्ही देशभर करोना पसरवला’’, असा आरोप मोदींनी केला.
-
दिल्लीच्या राज्य सरकारनेही झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन लोकांना गावी जाण्यासाठी बाहेर काढले. त्यांच्यासाठी दिल्लीतून बसगाडय़ांची व्यवस्था केली आणि मध्येच कुठेतरी सोडून दिले. त्यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांत नसलेला करोना वेगाने पसरत गेला, अशी टीकाही मोदींनी केली.
-
काँग्रेसच्या या ‘कृती’मुळे संपूर्ण देश अचंबित झाला आहे. गेली दोन वर्षे देश शंभर वर्षांतील सर्वात मोठय़ा संकटाचा सामना करत आहे. हा देश, इथले नागरिक तुमचे नाहीत का? खरेतर राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. किती नेत्यांनी लोकांना मुखपट्टी वापरण्याचे आवाहन केले? जनतेला करोना नियमांच्या पालनाचे आवाहन त्यांनी सातत्याने केले असते तर, भाजपच्या सरकारला लाभ मिळाला असता का? संकटाच्या काळातील हे कसले राजकारण आहे, असा प्रश्न विरोधकांना विचारला.
-
काँग्रेस पक्ष ‘तुकडे तुकडे टोळी’चा नेता
इंग्रज निघून गेले पण, तोडा आणि राज्य करा, ही त्यांची वृत्ती काँग्रेसला देऊन गेले. काँग्रेस हा ‘तुकडे तुकडे टोळी’चा नेता बनला आहे, असा गंभीर आरोप मोदींनी केला. -
काँग्रेसची सत्तेत येण्याची इच्छा संपलेली आहे पण, विभाजनवादाची मुळे बळकट करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. गेली ७० वर्षे काँग्रेसने विभाजनवादाचा खेळ खेळला, पण, हा देश अमर होता, श्रेष्ठ होता, आहे आणि राहील, असे मोदी म्हणाले.
-
तिन्ही सैन्यदलाचे तत्कालीन प्रमुख (सीडीएस) दिवंगत जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. तामिळनाडूमधून त्यांचे पार्थिव आणले जात होते, तेव्हा लोक दुतर्फा उभे राहून ‘’वीर वणक्कम’’च्या घोषणा देत होते. तमिळनाडूतील जनतेला रावत यांचा अभिमान होता. ‘’राष्ट्र’’ म्हणजे कोणी सरकार नव्हे, तो जिवंत आत्मा आहे, हजारो वर्षे इथले लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. मग, तुम्ही कुठल्या ‘’राष्ट्रा’’बद्दल बोलत आहात, असा सवाल मोदींनी केला.
-
नेहरूंचे बोल विसरलात!
काँग्रेसला आता कर्तव्य सुचू लागले आहे, असा टोला मारत मोदींनी पं. नेहरूंची विधाने उद्धृत केली. देशाचा स्वातंत्र्यदिन आपण साजरा करतो, स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते, ती समजून घेतली नाही तर, देश स्वतंत्र ठेवता येणार नाही, असे नेहरू म्हणाले होते. पण, नेहरूंचे बोल तुम्ही विसरला आहात.. विद्या ज्ञानासाठी एक एक क्षण महत्त्वाचा असतो. संसाधनांचा एक एक कण गरजेचा असतो. क्षण बरबाद करून ज्ञान मिळत नाही, कण बरबाद केले तर संसाधने नष्ट होतात, या मुद्दय़ावर काँग्रेसने मंथन करावे, असा सल्ला मोदींनी दिला. -
भाजपावर टीका करत राहा, अनेक संधी तुम्हाला मिळतील. राजकारण होत राहील, निवडणुकीत आमच्याशी लढा. पण, ‘’अमृत काळा’’त सकारात्मक योगदान द्या. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करा, ७५ वर्षांतील कमतरता भरून काढा, देशहितासाठी काम करा. पुढील २५ वर्षांनंतर स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षांत संसदेत तेव्हा उपस्थित असलेले सदस्य देशाने काय मिळवले याची चर्चा करतील. त्यासाठी तुम्ही आत्ता प्रयत्न करा, असेही मोदी म्हणाले.
-
‘मेक इन इंडिया’मुळे लाचखोरी संपली!
काहींना ‘’मेक इन इंडिया’’ची अडचण वाटत असल्याने ते सातत्याने टीका करतात. या योजनेमुळे त्यांना भ्रष्टाचाराची संधी मिळत नाही, खिसे भरता येत नाहीत. हे टिकेमागील खरे कारण आहे. या योजनेवर टीका करून तुम्ही देशावर टीका करत आहात. पूर्वी आपण संरक्षण उपकरणासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होतो, अगदी सुटे भागही आयात करावे लागत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनले पाहिजे तरच आपण देशाचे संरक्षण करू शकू, असे मोदी म्हणाले. -
महागाई आटोक्यात आणण्यात असमर्थ कोण?
काँग्रेसला महागाईची चिंता ‘’यूपीए’’ सरकारच्या काळात का नव्हती? काँग्रेस सरकारच्या अखेरच्या ५ वर्षांत ती दोन आकडी राहिली. महागाई कमी करणे म्हणजे ‘’अल्लाउद्दीनची जादू’’ नव्हे, असे तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले होते. देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू ‘’लालकिल्या’’वरून काय म्हणाले होते बघा! कोरियामधील लढाई झाली, अमेरिकेत काही घडले तर त्याचा विपरित परिणाम देशातील महागाईवर होतो.. नेहरूंनीही महागाई नियंत्रणात आणण्यात असमर्थता व्यक्त केली होती. करोनाच्या काळात काँग्रेसचे सरकार असते तर महागाईचे खापर करोनावर मारून काँग्रेस नामानिराळा झाला असता. २०१४-२० या भाजपप्रणित सरकारच्या काळात चलनवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. २०२१मध्ये हा दर ५.२ टक्के आणि खाद्यान्नाच्या चलनवाढीचा दर ३ टक्के होता, असे मोदी म्हणाले. -
काँग्रेसने केलेल्या गरिबीच्या मुद्दय़ाला प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले की, ७० च्या दशकापासून काँग्रेसने ‘’गरिबी हटाओ’’चा नारा दिला, गरिबी संपली नाही पण, काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. २०१३ मध्ये गरिबीचे निकष बदलून काँग्रेसने १७ कोटी गरिबांना श्रीमंत बनवले, अशी उपहासात्मक टिप्पणी मोदींनी केली.
-
‘अहंकार जात नाही..’
काँग्रेसने ५० वर्षे राज्य केले पण, नंतर सत्ता का गमावली, याचा पक्षाने विचार केला पाहिजे. नागालँडने १९९८ मध्ये, ओडिशाने २७ वर्षांपूर्वी काँग्रेसला अखेरचे निवडून दिले होते. गोव्यात २८ वर्षांपूर्वी काँग्रेसने बहुमताने सत्ता मिळवली होती. त्रिपुरात १९८८ नंतर, तर पश्चिम बंगालमध्ये १९७२ नंतर काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही. तेलंगण राज्य बनवण्याचे श्रेय तुम्ही (काँग्रेस) घेता पण, लोकांनी ते मान्य केलेले नाही. इतक्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करूनही काँग्रेसचा अहंकार कमी झालेला नाही, अशी टीका मोदींनी केली.
![Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025 Due to Lower Back Injury](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Jasprit-Bumrah-Ruled-out-of-Champions-Trophy.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा