-
मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या पाचव्या सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. १८ फेब्रुवारीला हे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित असणार आहे.
-
पाचवी आणि सहावी मार्गिका ठाणे आणि त्यापल्ल्याडील वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नुकतेच या मार्गिकाच्या निर्माणाचे काम पूर्ण झाले आहे.
-
या मार्गिकांमुळे लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी आणि उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्या आहेत. पण या मार्गिका नक्की आहेत तरी कशा, त्याचं वैशिष्ट्य काय जाणून घेऊयात…
-
ठाणे ते दिवा अवघ्या ९.४० किलोमीटर लांबीच्या या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेला सेवेत येण्यासाठी बारा वर्षाहून अधिक कालावधी लागला आहे.
-
२००८ रोजी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला मंजुरी मिळालेली. मात्र अनेक ठिकाणच्या परवानग्या आणि उन्नत मार्गिकेमुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब लागला.
-
मुंब्रा रेतीबंदर येथील खाडी किनारी उन्नत मार्ग तयार करण्याचं मोठं आव्हान रेल्वे समोर होतं. सुमारे ६२५ कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प अखेर १२ वर्षानंतर पूर्ण करण्यात आलाय.
-
‘सीएसएमटी’मधून सुटणाऱ्या व त्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल, मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना ठाणे ते दिवादरम्यान स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने वेळापत्रक विस्कळीत होत होते.
-
लोकल, लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचा वेग मंदावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत होता. आता या नवीन मार्गिकांमुळे हा प्रवास विनाअडथळा होणार आहे.
-
ठाणे-दिवा स्थानकादरम्यान एक्स्प्रेस गाडय़ांसाठी संपूर्ण पाचवी व सहावी मार्गिका उपलब्ध होत आहे. यातील सहाव्या मार्गिकेसाठी नुकताच ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.
-
यात मोठय़ा प्रमाणात कामे पूर्ण करण्यात आली. २३ जानेवारीला १४ तासांचा ब्लॉक घेतल्यानंतर पाचवी मार्गिका सुरु झाली होती.
-
पाचव्या, सहाव्या मार्गिकेला अंतिम स्वरुप देण्यासाठी ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला.
-
यामध्ये ५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत होते. याआधी १९ डिसेंबर २०२१ मध्ये १८ तासांचा, त्यानंतर २ जानेवारी २०२२ ला २४ तासांचा, ८ जानेवारीला ३६ तासांचा, २३ जानेवारीला १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.
-
मेल, एक्स्प्रेस गाडय़ांसाठी सध्या ठाणे ते कुर्लापर्यंत आणि दिवा ते कल्याणपर्यंत पाचवी, सहावी स्वतंत्र मार्गिका आहे. ठाणे ते दिवा दरम्यान ही मार्गिका नसल्याने जलद लोकलच्या उपलब्ध दोन मार्गिकांवरूनच मेल, एक्स्प्रेसही जात होत्या.
-
ठाणे ते दिवादरम्यान अप व डाऊन जलद मार्गिकेवर मेल, एक्स्प्रेस किंवा लोकल गाडीला प्राधान्य देताना यातील काही सेवांना अर्धा ते पाऊण तास थांबवलेही जात होते. यामुळे काही वेळा जलद लोकलबरोबरच मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडत होता.
-
त्यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून ‘एमआरव्हीसी’ (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आणि मध्य रेल्वेने ठाणे ते दिवादरम्यान पाचवी, सहावी मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेतला होता.
-
२००८-०९ साली या मार्गिकेला मंजुरी मिळाल्यानंतर अन्य प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु, रुळांजवळील अतिक्रमण, तांत्रिक अडचणी इत्यादींमुळे प्रकल्पाचे काम लांबले आणि सुरुवातीच्या पाच वर्षांनंतर सेवेत येणे अपेक्षित असलेली मार्गिका उपलब्ध होण्यासाठी २०२२ साल उजाडले.
-
ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेदरम्यान एकूण ३२ पूल उभारण्यात आलेत यापैकी आठ पादचारी पूल आहेत. तर १.४० किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे उड्डाणपूल, तीन मोठे पूल, २१ लहान पुलांची उभारणी केली असून १७० मीटर लांबीचा बोगदा तयार केला आहे. या सर्व कामांची नुकतीच मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी केली.
-
कुर्ला ते थेट कल्याणपर्यंत मेल, एक्स्प्रेससाठी आणि मालगाडय़ांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका उपलब्ध होणार आहे.
-
पारसिक बोगद्यातून जाणारी मार्गिका मेल, एक्स्प्रेस गाडय़ांसाठी असेल, तर मुंब्रा स्थानकाजवळच उभारलेल्या १.४० किलोमीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल व त्यामार्गे लोकलसाठी मार्ग करून देण्यात आला आहे.
-
लोकल व मेल, एक्स्प्रेस गाडय़ांची ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान व त्यापुढे अप व डाऊन मार्गावर रखडपट्टी थांबेल.
-
एक्स्प्रेससाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचवी, सहावी मार्गिका सेवेत येणार असल्याने लोकलचे वेळापत्रकही सुधारेल़ त्यामुळे टप्प्याटप्याने सुमारे ८० लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आह़े या लोकल वातानुकूलित असतील, असे मध्य रेल्वेने आधीच स्पष्ट केले होते. परंतु, वातानुकूलित लोकल गाडय़ांना प्रतिसाद कमी असल्याने सामान्य लोकल फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. लवकरच या मार्गावरील तांत्रिक कामही पूर्ण होणार आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल