-
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार वाद सुरू आहे.
-
काल पोलिसांत जबाब नोंदवल्यानंतर संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर देणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले होते.
-
त्यानुसार, आज किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
-
गेल्या १० दिवसांत संजय राऊतांनी मला खूप शिव्या दिल्यात, परंतु त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. कारण हे शब्द संजय राऊतांचे नाहीत, तर उद्धव ठाकरेंचे आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.
-
संजय राऊतांनी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी मला पत्र लिहिलं होतं. “भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे तुम्ही सार्वजनिकरित्या उघड केली आहेत. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचाराविरोधातील आपल्या लढ्यास बळ मिळावे, असं त्या पत्रात नमुद केलं होतं. चार महिन्यांपूर्वी माझं कौतुक करणारे उद्धव ठाकरे आता माझा इलाज करावा लागणार, अशी भाषा बोलत आहेत, त्यामुळे शिवसेनेला नेमकं काय म्हणायचंय,” असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
-
जानेवारी २०१९ मध्ये आणि २३ मे २०१९ रोजी रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना पत्र लिहिलं होतं, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आणि ते पत्र माध्यमांसमोर वाचून दाखवलं. “सरपंच, कोर्लई आपणांस विनंतीपूर्वक अर्ज करतो की आम्ही ३० एप्रिल २०१४ रोजी जमीन मालक अन्वय मधुकर नाईक यांची जागा खरेदी केली असून यातील काही जागेवरील घर आमच्या नावे करून सहकार्य केल्यास आम्ही तुमचे आभारी राहू, असं त्यात लिहिलं होतं. आणि त्यामध्ये रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांची नावं होती, असा दावाही सोमय्यांनी केला. तसेच हे पत्र आपल्याला कोर्लई ग्रामपंचायत आणि तलाठ्यांनी दिलंय, त्यामुळे ते खोटं असल्याचं तुम्ही म्हणूच शकत नाही,” असंही सोमय्या म्हणाले.
-
१९ बंगल्यांचा घोटाळा उघडकीस आणल्यानं मला जोड्याने मारण्याची भाषा केली जाते. परंतु स्वतः मुख्यमंत्री १२ कोटी जनतेची फसवणूक करत आहे, त्याचं काय, असा सवाल सोमय्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावर एकही वाक्य बोलण्याची हिंमत मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या एकही नेत्यामध्ये नाही, अशी टीका सोमय्या यांनी केली. यावेळी मातोश्रीवरून फोन आल्यानंतर कोर्लईचा सरपंच जबाब बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
-
“लाइफलाइन हेल्थ केअर आणि इटर्नल हेल्थ केअर या दोन्ही कंपन्यावर गुन्हे दाखल झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह आणखी काही जण अडकतील,” असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला.
-
१९ बंगल्याच्या प्रकरणावर सरपंच बोलतात, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? बायकोची बाजू घ्यायची नाही का?, असा सवाल त्यांनी केला.
-
“मला तुरुंगात टाकण्यासाठी कोणतेच पुरावे शिवसेनेला सापडत नव्हते. त्यातच पत्रकारांनी विचारल्यानंतर छगन भुजबळांची बेनामी संपत्ती दाखवण्यासाठी मी त्यांना सांताक्रूझ पश्चिमला घेऊन गेलो. त्यावेळी दुर्दैवाने त्या बंगल्याच्या सहाव्या मजल्यावरून समीर भुजबळ पाहत होते. हे सर्व सहा महिन्यांपूर्वी घडलं आणि आता मला करोनाचे नियम मोडल्याप्रकरणी समन्स बजावलं. करोनावरून कारवाई करायचीच असेल तर त्या ब्लॅकलिस्टेड कंपनीवर करा,” असं आव्हान सोमय्यांनी दिलं.
-
संजय राऊतांना त्यांनी दिलेल्या *** या शिवीचा अर्थ कळतो का?, असा सवाल करत अर्थ कळत नसेल तर माझ्या बायको आणि आईला जाऊन विचारा, असं म्हणाले. संतापलेले किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, “माझी बायको आणि माझ्या सूनबाई दोघीही मराठी आहेत. अशा प्रकारची शिवी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेतर्फे संजय राऊत देतात. कारण मी त्यांची चोरी लबाडी लोकांसमोर आणली. त्यांचे घोटाळे लोकांसमोर आणले म्हणून मला शिवीगाळ करत आहेत,” असा आरोप सोमय्यांनी केला.
-
ईडी ऑफिसरने माझ्या प्रकल्पात पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला. मी विचारतोय, कुठल्या अधिकाऱ्याने पैसे दिले?, मला सांगा. त्या अधिकाऱ्याविरोधात मी तक्रार दाखल करतो. पालघरच्या जमिनीचं व्हॅल्युएशन मुख्यमंत्री ठाकरेंच्या कलेक्टरने केलंय, असंही ते म्हणाले.
-
संजय राऊत चाणक्य आहेत, त्यामुळे राकेश वाधवान कोण आहेत, हे त्यांनी सांगावं. कारण शरद पवार आणि राकेश वाधवान यांचे कौटुंबीक संबंध असल्याची माहिती मला मिळाली आहे, असं सोमय्यांनी सांगितलं.
-
संजय राऊत यांनी ईडीकडे जाण्याचा इशारा दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले, “पत्रकार परिषद घेऊन २ ट्रक पेपर घेऊन जाणार म्हणतात, काय सेन्सेशन करता? ७५००कोटी अमित शहा, फडणवीस यांना दिले काय म्हणता? ईडीकडे तक्रार करण्याची काय पद्धत आहे माहिती तरी आहे का? राज्य सरकारने तक्रार रजिस्टर करायची असते. मग ईडीकडे जायचं असतं.”
-
संजय राऊतांच्या शिव्यांमुळे माझे कुटुंब व्यथित झाल्याचंही सोमय्या म्हणाले. (सर्व फोटो – संग्रहित)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स