-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका घेण्याची वृत्ती आणि आक्रमक शैली सर्वश्रुत आहेच. पण यासोबतच राज ठाकरेंची नक्कल करण्याची स्टाईल देखील नेहमीच चर्चेत असते.
-
राज ठाकरेंनी आत्तापर्यंत व्यासपीठावरून भाषण करतानाच अनेकांच्या नकला केल्या आहेत. मग त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपासून ते महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारींपर्यंत अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
-
नुकतीच राज ठाकरे यांनी पुण्यात मनसेच्या १६व्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतच शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांची देखील नक्कल केली.
-
९ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात राज ठाकरेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला. “ते संजय राऊत किती बोलतायत? सगळ्यात त्यांची एक अॅक्शन असते. कॅमेरा लागला की हे सुरू. कॅमेरा हटला की पुन्हा नॉर्मल. हे अॅक्शन कुठून आणतात?” असा सवाल करत राज ठाकरेंनी संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलतात तशी नक्कल करून दाखवली.
-
राज ठाकरेंनी केलेली नक्कल संजय राऊतांच्या फारशी पचनी पडली नाही आणि त्यांनी देखील राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. त्यावर पुन्हा राज ठाकरेंनी संजय राऊतांना प्रतिटोला लगावला. मनसे नेते संदीप देशपांडे यांचं खोचक ट्वीट देखील मध्ये येऊन गेलं.
-
“डोळे, भुवया उडवून बोलणं… बोलणं हा प्रश्न नाही. आपण किती बोलतो? आपण काय बोलतो? कसं बोलतो? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या हे पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?” असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.
-
राज ठाकरेंनी केलेली नक्कल संजय राऊतांना तितक्याच खोचकपणे लागल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना प्रतिटोला लगावला. “नक्कल मोठ्या माणसाचीच करतात. तुम्हीही बोला. सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे. आम्ही कुणाचे मिंधे नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. इथे डुप्लिकेट, नकली काही नाही”, असं राऊत म्हणाले.
-
“जे सत्य आहे, जे प्रखर आहे ते शिवसैनिक बोलणार. कर नाही त्याला डर कशाला? आमचं राजकारण नकलांवर उभं नाहीये. आमचं राजकारण कामावर, स्वाभिमानावर आणि संघर्षावर उभं आहे”, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला होता.
-
दरम्यान, समोरून थेट टप्प्यात बॉल आल्यावर राज ठाकरेंनी देखील त्यावर सिक्सर लावला. “संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी”, असा खोचक सल्ला राज ठाकरेंनी दिला.
-
यादरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं एक सूचक ट्वीट देखील आलं. यामध्ये संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांचं नाव घेतलं नसलं, तरी त्यांचा रोख राऊतांच्याच दिशेने असल्याचं बोललं जात आहे.
-
पुष्पा सिनेमातला डायलॉग ट्वीट करत “उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर ‘सामनाकार’ रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना. झुकेगा नहीं साला”, असं संदीप देशपांडे या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
-
राज ठाकरेंनी केलेल्या नकला या राजकीय टोलेबाजी असून देखील यातल्या अनेक नेतेमंडळींनी या नकला तितक्याच शांतपणे घेतल्या, प्रसंगी त्यांना दाद देखील दिली.
-
एकंदरीतच मिमिक्री आणि राजकारण या दोन मुद्द्यांवरून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.
-
राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये मनसे-शिवसेनेचे कार्यकर्ते देखील एकमेकांवर खोचक टीका करू लागले आहेत.
-
गेल्या काही काळापासून राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुरू केल्या असून पक्षाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी