-
मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज यांनी मनसैनिकांना दिला आणि आक्रमक हिंदूत्वाचा पुरस्कार केला. दरम्यान यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.
-
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. तासाभराच्या जोशपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेला पािठबा देत एकीकडे उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील कारभाराचे कौतुक केले, तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभारावर सडकून टीका केली.
-
दरम्यान राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर आव्हान दिलं आहे. प्रबोधनकारांची पुस्तकं वाचली तर जात-पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
-
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या करत तसंच पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली.
-
“राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन,” असं जाहीर आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिलं. “मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमाने राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका,” असं ही यावेळी आव्हाड म्हणाले.
-
“एकीकडे शरद पवार सर्व जाती-धर्माच्या लोकांना घेऊन एकत्र चालतात तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या घराबाहेर मागासवर्गीय समाजातील तरुणांना बेदम मारहाण होते यातच जनतेने काय ते समजून घ्यावे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
-
“कळवा-मुंब्रा मतदारसंघात ६७ टक्के हिंदू आहेत आणि ३३ टक्के मुसलमान आहेत. त्यात मी कळव्यातून ५७ हजार मतांनी विजयी झालो. कळव्यातून ३० हजारची आणि आणि मुंब्र्यातून ४५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. लोक कामावर मत देतात, जाती पातीवर नाही. १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे लागते,” असंही आव्हाड यांनी म्हटलं.
-
“महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा,” असा टोला आव्हाडांनी यावेळी लगावला.
-
प्रबोधनकारांची पुस्तकं वाचली तर जात-पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील. शरद पवार साहेबांचे नाव घेतले की महाराष्ट्रात चर्चा होतेच हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
-
“पाच वर्षांपूर्वी राज्याच्या प्रगतीची ब्ल्यू प्रिंट सादर करणारे राज ठाकरे आज तरुणांना मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचा सल्ला देतात. याला मानसिक अधोगती म्हणायचं का?,” असा सवाल त्यांनी केला.
-
“ज्या घरात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली त्याच घरात राज ठाकरे जातीपातीचे राजकारण करत असून महाराष्ट्राला जाळून टाकण्याचा प्रयत्न करु नका,” असंही ते म्हणाले.
-
“निष्कारण जाती पातीत, धर्मांमध्ये राजकारण करत आग लावायची आणि महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा जो कट आखला आहे त्याचे हे सूत्रधार आहेत. काही जणांना सूत्रं हातात घ्यायची नाही आहेत. पुढे करण्यासाठी कोणीतरी लागतं,” असंही ते म्हणाले.
-
“जातीपातीचे राजकारण आपण कधी बंद करणार आहात. झेंडा पाहून घ्या एकदा,” असा सल्लाही यावेळी आव्हाडांनी दिला.
-
“टाळ्या मिळवण्यासाटी असं वक्तव्य करणं ठीक आहे पण आपल्या वक्तव्याचे महाराष्ट्रात काय पडसात उमतील त्याचा जरा तरी विचार करा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
-
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही. दंगल कशाला म्हणतात हे त्यांना माहिती नसावं. अजोबांची चार पाच पुस्तकं वाचली तर जात पात काय आणि त्याचे जन्मदाते काय आहेत हे समजेल,” असं आव्हाड म्हणाले.
-
“तुमचं प्रेम, डोक्यातील घृणा आजपर्यंत विशिष्ट कृतीतून कायम दिसली आहे. तुमची मानसिकता उशिरा कळली पण जाहीर झाली आहे,” अशी टीका यावेळी आव्हाडांनी केली.
-
शरद पवार यांच्यावर बोलल्यानेच आपल्याला प्रसिद्धी मिळते हे जाणून राज ठाकरे पवारांवर टीका करतात असा टोला त्यांनी लगावला.
-
“राज ठाकरे महाराषट्राचे एकच नेते आहेत जे दर पाच वर्षांनी आपले रंग बदलतात. सरड्यापेक्षा जलदगतीने रंग राज ठाकरे बदलतात त्यामुळे त्यांचं भाषण गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असं आव्हाडांनी सांगितलं.
-
“लोक सुट्टी असली आणि एखादा छान वक्ता असली की जातात. प्रल्हाद केशव अत्रेंच्या सभेला लाखो लोक जायचे, पण ते कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत. भाषणाला लोकं आली म्हणजे तो फार आवडता. लोकप्रिय, मास लिडर असं काही होत नाही. लोकांमध्ये, शेवटच्या घटकापर्यंत जावं लागतं. आपली जात विसरावी लागते. शेवटच्या माणसालाही आपला वाटावा असं वातावरण निर्माण करावं लागतं,” असं आव्हाडांनी यावेळी सांगितलं.
-
तुम्हाला तर ६ डिसेंबरला घराबाहेरु जाणाऱ्यांबद्दल काय वाटतं हे तुम्ही बोलून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे हे सर्वांना माहिती आहे,” असंही आव्हाड म्हणाले.
-
“शिवरायांच्या महाराष्टात गाडलेल्या जेम्स लेनला परत वरती काढायची गरज नव्हती. जेम्स लेनचे जन्मदाते हे कोण होते हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. जे गेले त्यांच्याबद्दल बोलणे आमच्या संस्कृतीत नाही,” असंही यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.
-
“६ डिसेंबरला चैत्यभूमीला भेट देणाऱ्या बंधू भगिनींबद्दल आपण काय बोललात हे कुणी विसरलेले नाही. नुसत्या मिरवणूका काय काढायला सांगता. संविधानाचा सन्मान राखीन अशी शप्पथ घ्या. तुमचे भाषणच संविधान विरोधी होते आणि हो भाषणाच्या शेवटी जयभीम देखील म्हणा,” असा सल्ला आव्हाडांनी यावेळी दिला.
-
“एकेकाळी तुम्ही शऱद पवारांची मुलाखत घेता आणि तोंडभरुन कौतुक करता. असा काय चमत्कार घडला? मुलाखत घेताना शरद पवार यांना जातीयवादी वाटले नाहीत आणि काही दिवसातच जातीयवादी वाटू लागले. शरद पवार आज राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत का? शरद पवार १९६२ पासून युवक काँग्रेसमध्ये काम करत आहेत. त्यावेळी या लोकांचे जन्मही झाले नव्हते. अशा लोकांनी शरद पवारांवर टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकल्यासारखं आहे. राज ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
-
यावेळी अजित पवारांनीही राज ठाकरेंच्या जुन्या गोष्टींचा संदर्भ देत ते सरड्याप्रमाणे रंग बदलत असल्याची टीका केली
-
“काल मेट्रोचं तसंच इतर काही प्रकल्पांचं उद्घाटन झालं, त्याच्यावर बोला. तुमच्या भोंग्याचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं यासाठी सरकार समर्थ आहे,” असा टोला संजय राऊत यांनीही लगावला.
-
पुढे ते म्हणाले की, “शरद पवारांनी जातीवाद परसरवला असं म्हणता…पण सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या चरणाशी तुम्हीदेखील जात होतात. कशासाठी इतक्या मोठ्या माणसांवर बोलायचं. तेवढ्यापुरच्या टाळ्या मिळतात पण त्यादेखील प्रायोजित आहेत”.
-
शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा होता अशी टीका यावेळी संजय राऊतांनी केली. तसंच अक्कलदाढ उशिरा येते हे काल महाराष्ट्राला दिसलं असा टोलाही लगावला.
-
“काल त्यांनी मराठीभाषा भवनचं स्वागत करायला हवं होतं. महाराष्ट्राच्या राजधानीत इतकं मोठं कार्य घडलं आहे. त्याच्याविषयी काही बोलले नाहीत. फक्त टीका केल्याने काय मिळतं?आहे ते देखील गमवून बसाल,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला. भाजपा त्यांची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.
-
शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, “ एक गोष्ट चांगली झाली, हे कुठे भूमिगत झाले होते, याचा काही कोणाला अंदाज येत नव्हता. त्यामुळे ठाकरे महाराष्ट्रात सार्वजनिक यायला उत्सुक आहे हे कालच्या सभेतून दिसलं. त्यांचं हेच वैशिष्ट आहे की, दोन-चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने काय करतात मला माहीत नाही. ते जातीयवादाबाबत जे बोलले त्याबद्दल सांगायचं झालं तर, ते काही म्हणू शकतात त्यांच्या तोंडावर कुणी मर्यादा आणू शकत नाही. ”
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी मागील पाच -सात वर्षांचा त्यांनी उल्लेख केला.“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व राज्यात कोण कोण करत होतं? महाराष्ट्राची विधानपरिषदेत पहिल्यांदा छगन भुजबळ नेते होते. त्यानंतर मधुकरराव पिचड हे नेते होते. भुजबळ कोणत्या समाजाचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. अशी सर्वांची जर यादी बघितली, तर यावेळी पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली आणि त्याचं कारण, सभासदांनी असं सांगितलं की त्यांना विधीमंडळात येऊन ३० वर्षे झाली आणि एवढा काळ एखादी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना, त्यांना संधी द्यावी. त्यातून ही निवड झाली. सर्व जाती-जमातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आणि यापुढेही राहील. ” असंही शरद पवार म्हणाले.
-
“राज ठाकरेंनी मोदींबाबत काय काय भूमिका मांडलेली आहे, हे संबंध महाराष्ट्राने पाहीलं आहे. आता त्यांच्यात काहीतरी बदल झाल्याचं दिसतोय. नुकतच मी हे देखील वाचलं आहे की ते अयोध्याला जाताय, आणखी काय काय करत आहेत. तर असा त्यांच्या बदल होताना दिसतोय. त्यामुळे त्यांची मोदींबाबतची भूमिका सध्या, आज, उद्या काय असेल याबद्दल मी काही सांगू शकत नाही. कारण, त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे.” असंही म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
-
याचबरोबर,“उत्तर प्रदेशचं कौतुक त्यांनी केलं, तर मघाशीच मी सांगितलं की ते काही बोलू शकतात. आता उत्तप्रदेशात कौतुकासारखं त्यांना काय दिसलं हे मला माहिती नाही. उत्तर प्रदेशात अलीकडच्या काळात काय काय घडलं? निवडणुकीचा निकाल वेगळा लागला त्याची कारणं दुसरी आहेत. पण त्या ठिकाणी लखीमपूरला शेतकऱ्यांची हत्या झाली, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जवळपास वर्षभर शेतकरी बसले होते, त्या सगळ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायला. कोणी पुढे आलं नाही. कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या उत्तर प्रदेशात घडलेल्या आहेत, योगींच्या राजवटीच्या काळात आणि अशा पद्धतीची राजवट उत्तम आहे असं जर राज ठाकरे म्हणत असतील, तर मला काही त्यावर भाष्य करायचं नाही. पण महाराष्ट्रात असं कधी उद्धव ठाकरेंचं सरकार होऊ देणार नाही.” अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंवर शरद पवारांनी निशाणा साधला.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी