-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली.
-
दरम्यान, यावेळी राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला.
-
शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हणाले.
-
राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच शरद पवारांचे पुतणे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अजित पवार यांनी खोचक पद्धतीने या वक्तव्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. हे दोन्ही नेते नेमकं काय म्हणालेत पाहुयात…
-
वडिलांवर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन सुप्रिया सुळे यांनी थेट राज यांना २१०० कोटींच्या ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) पाठवलेल्या नोटीसची आठवण करुन देणारं वक्तव्य केलंय.
-
“लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं,” असा टोला सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना लगावलाय.
-
तर, “दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केलाय. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत,” असं खोचक विधानही सुप्रिया यांनी केलंय.
-
“शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाइन होत नाही हे ५५ वर्ष महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे त्यांच नाव घेतलं की कोणाचीही हेडलाइन होते,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
-
“याचा उपयोग जर (राज ठाकरेंच्या) पक्षाला होणार असेल तर मला त्याचा आनंद आहे,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
-
राज यांनी केलेल्या भाषणावरुन अजित पवार यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
-
“टीका आणि नकला करण्याशिवाय राज ठाकरे यांना दुसरे काही जमत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारविरोधात रान पेटवणारे आता त्यांचीच री ओढून सरड्यासारखे रंग बदलत आहेत,” असं अजित पवार यांनी राज यांच्यावर निशाणा साधताना म्हटलंय.
-
“राष्ट्रवादीला आणि शरद पवारांनी जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे स्वत: जास्त जातीयवादी आहेत,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रविवारी प्रत्युत्तर दिले.
-
“शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे,” अशी टिपणीही अजित पवारांनी राज यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना केली.
-
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा अजित पवार यांनी इंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना खास शैलीत समाचार घेतला.
-
“एकेकाळी १३ आमदारांचा पक्ष असलेला मनसेचा आता एकच आमदार आहे. बाकी नेते पक्ष सोडून का गेले? आमदारांची संख्या कमी का झाली?,” असे प्रश्नही अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका करताना विचारलेत.
-
“नुसती भाषणे करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. राज ठाकरे पलटी मारणारा माणूस आहे,” असा टोमणाही अजित पवार यांनी मारला.
-
“शरद पवारांचे राजकारण बघितले तर कुठेही जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्वधर्मसमभावाचे राजकारण केले,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.
-
“एका कार्यक्रमात मुलाखत घेतली, तेव्हा पवारसाहेब जातीयवादी नव्हते. पण, आता हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावे आता,” अशा शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर टिपणी केली. (सर्व फोटो फाइल फोटो आहेत)
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी