-
ईडीनं संजय राऊतांवर केलेल्या कारवाईमुळे आज महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं.
-
ईडीनं संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या मालकीची ११ कोटी १५ लाखांची मालमत्ता जप्त केली.
-
या मालमत्तेमध्ये अलिबागमधील आठ प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅटचा देखील समावेश आहे. मुंबईतील बहुचर्चित १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई झाल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
-
दरम्यान, या कारवाईनंतर संजय राऊतांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपासोबतच केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आगपाखड केली आहे.
-
आम्ही काय मालमत्तावाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली, असं संजय राऊत म्हणाले.
-
हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना… एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत, असं आव्हानच राऊतांनी भाजपाला दिलं आहे.
-
दरम्यान, कष्टाच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचं राऊत यावेळी म्हणाले. “२००९ची मालमत्ता आहे. एक एकरही पूर्ण जागा नाही. आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातल्या लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत. ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला”, असं ते म्हणाले.
-
आमचं राहतं घर जप्त केलंय. त्यावर भाजपाचे लोक उड्या मारतायत. बघितलं मी.. फटाके वाजवतायत. मराठी माणसाचं हक्काचं राहतं घर जप्त केल्याबद्दल. आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
-
दरम्यान, यावेळी किरीट सोमय्यांविषयी बोलताना राऊतांची जीभ घसरली. किरीट सोमय्या चु*** आहे. महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? कोण आहे तो? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
-
“अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं”, असा दावा संजय राऊतांनी केला.
-
दरम्यान, आपण घाबरत नसल्याचं राऊतांनी यावेळी म्हटलं. “मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे हे लक्षात घ्या. आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत”, असं ते म्हणाले.
-
ईडीनं नोटीसच पाठवली नसल्याचं राऊतांनी यावेळी सांगितलं. “मला ईडीकडून कोणतीही नोटीस आली नाही. कुणाचेही नंबर येऊ द्यात, तुमचेही नंबर येणार आहेत”, असा इशाराही राऊतांनी दिला.
-
आज राज्य सरकारने मी केलेल्या आरोपांवर एसआयटी स्थापन केली. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. हा संयोग तुम्ही समजून घ्या. कोर्ट सुद्धा त्यांचेच आहेत. पण बघू, असं देखील राऊत म्हणाले.
-
राऊतांवरील कारवाईमुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही हवं तर आमची प्रॉप्रर्टी जप्त करा, हवं तर गोळी घाला किंवा जेलमध्ये टाका संजय राऊत लढत राहील, तुमची पोलखोल करत राहील. मी आता शांत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांना नाचायचंय, त्यांना नाचू द्या. येणाऱ्या दिवसांत कळेल खरं काय आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपाला इशारा दिला आहे.
-
दरम्यान, गेल्या दोन अडीच वर्षांत रोज ते शिव्या देत आहेत. त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या भाषेची अपेक्षा आहे. त्यांनी वापरलेल्या शब्दांचं एक पुस्तक तयार करायचं काम मी एकाला दिलं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला विचारणार आहे, ‘उखडणार आहेत का?’ ‘भिकारडे’ हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसतात का? असा खोचक सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”