-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या जाहीर सभेत मशीदींवरील भोंगे न काढल्यास तिथे हनुमान चालीसा लावू असे विधान केले होते.
-
तसेच यावेळेस बोलताना राज ठाकरेंनी मशिदींवर त्याचप्रमाणे मदरशांवर छापे मारण्यासंदर्भात भाष्य केलेलं. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
-
असं असतानाच आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंविरोधात आंदोलन केलं. यावेळी राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आले. तसेच वसंत मोरे जिंदाबादच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या.
-
मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त करत आपण अशाप्रकारे मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावणार नाही असं म्हटलं होतं.
-
राज ठाकरेंविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यामध्ये आंदोलन केलं.
-
पुणे शहरातील सर्वाधिक मुस्लिम समाज असलेल्या कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
-
या आंदोलनामध्ये भारतेचे प्रतिक तसेच प्रत्येक धर्माच्या व्यक्तींची वेशभूषा केलेली मुलंही सहभागी झाले होते. सर्व धर्म समभाव हा संदेश देण्यात आला.
-
या आंदोलनामध्ये मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
-
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कठोर शब्दांमध्ये मनसेवर निशाणा साधला. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे विधान केले आहे ते निषेधार्थ असून दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे,” असं जगताप म्हणाले.
-
वसंत मोरे यांनी मुस्लीम समाजाच्या बाजूने भूमिका मांडल्याने त्यांना पदावरून बाजूला करण्यात आले आहे. एका चांगल्या कार्यकर्त्याने आणि नेत्याने भूमिका मांडल्यावर काय होते हे आपण सर्वांनी पाहिले आहे,” असा टोला मोरेंच्या उचलबांगडीवरुन जगताप यांनी लागवलाय.
-
“राज ठाकरेंविरोधात आज आम्ही आंदोलन केलं. २ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी मुंबईत भाषण करताना या राज्यात हिंदू मुस्लीम वाद पेटतील, दंगल घडेल अशाप्रकारच्या रणनितीचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय, असं जगताप म्हणाले.
-
भाजपाची सी टीम म्हणून काम करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. त्यांनी तो जरुर करावा हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय आहे, असा टोलाही जगताप यांनी लगावला.
-
“या राज्यात हजारो वर्षांपासून जो समुदाय एकत्र राहतो त्यांच्यात जो वेगळा भाईचारा आहे तो संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चित करु नये,” असा सल्ला जगताप यांनी दिलाय.
-
“एक इशारा आम्ही नक्की देऊ की राजसाहेब तुम्ही या गोष्टींच्या माध्यमातून कितीही वाद पेटवण्याचा प्रयत्न केला तरी आता या गोष्टींना मतदार बधणार नाही. ज्या पक्षाने मागील १५ वर्षांमध्ये स्वत:चा झेंडा दोनदा बदललाय, ब्रीद वाक्य दोनदा बदललंय त्या पक्षातील कार्यकर्त्यांची गळती आता थांबू शकत नाही,” असंही जगताप म्हणाले.
-
“भाजपाची कुबडी होण्याचं किंवा त्यांना कुबडी देण्याच काम राज ठाकरे करतायत हे मतदारांना ठाऊक आहे. त्यामुळेच या आंदोलनात आज हिंदू- मुस्लीम बांधव एकत्रित सहभागी झालेले,” असं जगताप यांनी म्हटलं आहे. (फोटो आशिष काळे, सागर कासार आणि सोशल मीडियावरुन साभार)

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना