-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर शुक्रवारी काही आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला तसंच दगडफेक केली. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. दरम्यान यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विदर्भात शक्तीप्रदर्शन करण्यात आल. यावेळी शरद पवार यांच्यासहित एकनाथ खडसे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अमोल मिटकरी हेदेखील मंचावर उपस्थित होते.
-
शरद पवारांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून घरावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना काही आठवणींना उजाळा दिला.
-
“कार्यकर्त्यांच्या मनात असलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी दोन दिवसांचं शिबीर चिंतन घेण्याची गरज आहे. राज्य आपल्या हातात राहिलं नाही त्यामुळे अस्वस्थता असलेला मोठा वर्ग आपल्यात आहे. देशाची सत्ता हातात असल्याने त्या सत्तेचा वापर करुन महारष्ट्रातील राज्य संकटात कसं आणता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे,” असा आरोप शरद पवारांनी केला.
-
“चौकशा केल्या जातात, तुरुंगात टाकलं जातंय, खटले दाखल होत आहेत. काही ना काही करुन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कसा त्रास देता येईल याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. आपण सामूहिक शक्ती एकत्र उभी केली तर हे प्रयत्न हाणून पाडू शकतो,” असा विश्वास यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला.
-
“एसटी कामगार हा समाजातील लहान घटक आहे. गेली ४०-५० वर्षांपासून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले,” असं शरद पवार म्हणाले.
-
“कामगारांना दोष देता येणार नाही. नेतृत्व चुकीचं असलं की सैनिक चुकीच्या दिशेने जातात. एसटी कामगारांच्या बाबातीत काय घडलं हे लोकांनी टीव्हीवर पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं. त्यातून सर्वसामान्य एसटी कामगाराला चुकीच्या रस्त्याने नेण्याचं काम काही लोकांनी केल्याचं दिसत आहे,” असं शरद पवार म्हणाले.
-
“सार्वजनिक जीवनात संकटं येतात. काही आयोजित केलेली असतात तर काही परिस्थितीने आणलेली असतात. पण त्यांना तोंड देण्याची भूमिका घ्यायची असते,” असं शरद पवार म्हणाले.
-
संकटं येतात पण त्यावर मात कऱण्याची हिंमत लागते असं शरद पवार म्हणाले.
-
कालचं काही संकट नव्हतं, कोणीतरी चिथावणी दिली म्हणून ती घटना घडली असंही ते म्हणाले.
-
आयुष्यात येणाऱ्या संकटांबद्दल सांगताना शरद पवारांनी मुंबईतील दंगली आणि लातूरच्या भूकंपाचा किस्सा सांगितला.
-
“मुंबईत हिंदु मुस्लिम दंगली झाल्या तेव्हा मी केंद्रात संरक्षणमंत्री होतो. दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी मला तातडीने मुंबईला जाण्याचा आग्रह केला. ज्याठिकाणी दंगल झाली होती, त्याठिकाणी मी रोज दुपारी आणि संध्याकाळी चर्चा करायला लागलो. लोकांना शांततेच आवाहन करत सांगू लागलो त्या गोष्टीला यश आले,” असं शरद पवार सांगतात.
-
पुढे ते म्हणाले की, “पण एक आठवडा गेला, ऑफिसमध्ये आवाज ऐकायला मिळाला. मंत्रालयाजवळ एअर इंडियानजीक बॉम्बस्फोट झाल्याचे ऐकायला मिळाले. एकुण ११ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी हिंदु मुस्लिम दंगल पुन्हा भडकेल अशी स्थिती होती. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता, काँग्रेसचे कार्यकर्ते, राज्याचे अधिकारी, पोलीस दलाचे घटक यांनी सगळ्यांनी मिळून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला आणि सोमवारी मुंबई शहर हे १०० टक्के सुरू झाले. त्यामुळे संकट येतात पण मात करण्याची हिंमत लागते,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
पुढे बोलताना त्यांनी लातूरच्या भूकंपाचा किस्सा सांगितला.
-
“मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जनाचा दिवस होता. अशा दिवशी पोलीस दल, गृह खात्याला उशिरापर्यंत काम असते. कारण शेवटचा गणपती जात नाही, तोवर राज्य शांत आहे की नाही कळत नाही,” असं शरद पवार म्हणाले.
-
“मी मुख्यमंत्री होतो. रात्री ३ वाजले होते. एका शहरातील गणपती जात नव्हते, दोन संस्थेत भांडण झाले होते, पण रात्री ३ वाजता तेथील गणपती विसर्जित झाले. त्यानंतर मला झोपायला पहाटेचे ४ वाजले,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“त्यानंतर ५ वाजता माझ्या घराच्या खिडक्या हलल्या आणि काचा फुटल्या. एरवी भूकंप हा कोयना धरण परिसरात होतो म्हणून तिथे फोन केला. पण तिथे भूकंप झाला नव्हता. नंतर माहिती घेतली तर लातूरच्या तिलारी येथे भूकंपाच केंद्र असल्याची ५ वाजता माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने मी सकाळी ७ वाजता लातुरला पोहचलो,” असं शरद पवार म्हणाले.
-
“गावागावात गेलो अन् पाहिले की ८०० लोक भूकंपात मृत्यूमुखी पडले होते. जवळपास १ लाख घरं उद्ध्वस्त झाली होती. प्रत्येक गावात रडण्याचा आवाज येत होता, प्रेतं पडली, रक्त वाहत होते,” अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.
-
“त्या संकटाच्या काळात शासकीय यंत्रणा, कार्यकर्त्यांची मदत सगळ्यांचे सहकार्य झाले. आम्ही सरकार म्हणून १ वर्षात प्रत्येकाचे घर बांधून दिले, त्या संकटातून बाहेर पडलो. म्हणून आले की संकट घाबरायचे नसते, त्या संकटाला तोंड द्यायचे असते,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काश्मीर फाइल्स चित्रपटाचा मुद्दा उपस्थित केला.
-
यावेळी त्यांनी म्हटलं की, “एक वेगळं जातीय वातावरण देशात निर्माण केलं जात आहे. हिंदू-मुस्लिम दंगल, दलितांमध्ये काही करता येईल का यासाठी सतत काहीतरी सुरु आहे”.
-
“काश्मीरमध्ये हिंदू समाज एकेकाळी राहत होता. एक काळ आला तेव्हा दहशतवाद्यांनी हिंदूंवर हल्ला केला आणि त्यांना काश्मीर सोडून यावं लागलं. यावर एका गृहस्थांनी सिनेमा काढला आणि हिंदूंवर अत्याचार कसा केला असं दाखवलं. ज्यावेळी एखादा लहान समाज संकटात जातो आणि तिथला मोठा समाज असणारा मुस्लिम त्यांच्यावर हल्ला करत होता हे दिसतं तेव्हा देशातील बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्था निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला,” असा आरोप शरद पवारांनी केला.
-
“ज्या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनीच हा सिनेमा पाहिला पाहिजे अशी घोषणा करणं दुर्दैवी आहे,” अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली.
-
“त्यावेळी काँग्रेस सत्तेत नव्हतं, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मही झाला नव्हता. त्या हल्ल्याची जबाबदारी भाजपाला टाळता येत नाही,” असं शरद पवार म्हणाले.
-
“हे देशाच्या इतिहासाला सुरुंग लावण्याचं काम आहे. ज्यावेळी राज्यकर्ते अशा दिशेने जाता तेव्हा चिंतेची बाब असते,” असा आरोप शरद पवारांनी केला.
-
“महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्राचं सहकार्य नसतानाही आपण पुढे जात आहोत,” असं शरद पवार म्हणाले.
-
“आज देशासमोर महागाईचा मोठा प्रश्न आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती रोज वाढत आहेत. यामुळे सगळ्या गोष्टींची किंमत वाढते आणि सर्वसामान्यााला याचा फटका बसतो,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“तरुणांना पदवी मिळवूनही रोजगार मिळत नाही म्हणून वणवण फिरत आहे. तरुणांचा विचार करण्यासाठी देशाची सत्ता वापरण्याची गरज असताना मोदी सरकार त्याकडे ढुंकून पाहत नाही,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
(File Photos)

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी