-
मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तरं दिली आहेत.
-
वर्ष-सहा महिन्यात एखादं वाक्य बोलून आपलं मत व्यक्त करत असतात. पण ते फार गांभीर्यानं घ्यायची गरज नसते. पण तुम्ही प्रश्न विचारला, म्हणून मला त्यात काहीतरी सांगावं लागेल असं सांगत शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना उत्तर दिलं.
-
“ते काल म्हणाले, की शिवाजी महाराजांचं नाव मी कधी घेत नाही. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीला होतो. तुम्ही माझं अमरावतीचं भाषण मागवलं, तर शिवाजी महाराजांच्या योगदानावर माझं किमान २५ मिनिटांचं भाषण होतं. सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचण्याची माझी सवय आहे. पण त्यासाठी मला सकाळी उठावं लागतं. सकाळी त्यांनी काय लिहिलंय, हे न वाचता त्यांनी वक्तव्य केलं असेल, तर मी त्यांना दोष देणार नाही,” असं शरद पवार म्हणाले.
-
“फुले-शाहू-आंबेडकरांचा उल्लेख केला जातो, असा आरोप केला. पण त्याचा अभिमान आहे मला. फुले, आंबेडकर, शाहू महाराज हे शिवचरित्राबद्दल अतीव आस्था असलेले घटक आहेत. महाराजांबद्दलच्या आस्थेचा विचार करून हातातल्या सत्तेचा वापर कसा करावा, याबाबत भूमिका या तिघांनी मांडली,” असं पवारांनी म्हटलं.
-
“पुरंदरेंबद्दल मी बोललो. मी काही लपवून ठेवत नाही. पण पुरंदरेंनी जिजाऊंनी शिवाजी महाराजांचं व्यक्तीमत्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेवांनी ते घडवलं असा उल्लेख केला. त्याला माझा सक्त विरोध आहे. शिवछत्रपतींचं व्यक्तीमत्व राजमाता जिजामातांनी कष्टानं उभं केलं. बाबासाहेबांनी त्यावर लिहिण्याचा केलेला प्रयत्न योग्य नव्हता. त्यावर मी टीका केली. जेम्स लेननं केलेल्या लिखाणात त्याचा आधार म्हणून माहिती पुरंदरेंकडून ही माहिती घेतली असं म्हटलं होतं. एखाद्या लेखकानं गलिच्छ प्रकारचं लिखाण केलं आणि त्याला माहिती देण्याचं काम पुरंदरेंनी केलं असेल, आणि त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली असेल, तर मला त्याचं दु:ख वाटत नाही तर अभिमान वाटतो. त्यामुळे याबाबत कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल फारसं बोलायचं नाही,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“सोनिया गांधींनी देशाचं पंतप्रधान व्हावं की नाही, या मुद्द्यावर माझं मत जाहीर होतं. पण मला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे की सोनिया गांधींनी स्वत:हून पंतप्रधानपदाची उमेदवार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हा प्रश्न संपला. सोनिया गांधींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आमचा वादाचा विषयच राहिला नाही. त्यानंतर एकत्र येऊन काहीतरी करावं, अशी सूचना अन्य सहकाऱ्यांनी केल्यानंतर आम्ही एकत्र आलो, आजही आहोत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना एकच आहेत. त्यामुळे ही भूमिका मी काही ऐन वेळी बदललेली नाही,” असं उत्तर शरद पवारांनी दिलं.
-
त्यांनी स्वताच्या पक्षाबाबत काय बोलायचं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते म्हणतात हा पक्ष संपवणारा पक्ष आहे. याची नोंद महाराष्ट्राच्या मतदारांनी घेतली आणि त्यांच्या पक्षाला विधिमंडळात एकही जागा दिलेली नाही. त्यातून मतदारांनी त्यांची योग्य किंमत केली आहे असा टोला शरद पवारांनी लगावला.
-
त्यांच्या सभा मोठ्या होतात. पण त्या सभेत शिवराळ भाषा, नकला असतात. त्यातून करमणूक होते. त्यामुळे लोक जातात. त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं की मी नास्तिक आहे. मी माझ्या देवधर्माविषयीचं प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. निवडणुकीचा नारळ कुठे फोडतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा. एकच मंदीर आहे. तिथे फोडतो. त्याचा आम्ही कुठे गाजावाजा करत नाही. दुसरी गोष्ट आहे की माझ्यापुढे काही आदर्श आहेत. त्या आदर्शांमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. त्यांचं लिखाण वाचलं, तर याबाबत सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. त्यांनी देवधर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रचंड टीका केली आहे. त्याचा गैरफायदा घेणारा कुणी घटक असेल, तर त्याला ठोकून काढण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं लिखाण आम्ही लोक वाचतो, पण सगळेच वाचत असतील, कुटुंबातले लोक वाचत असतील असं नसावं. त्यामुळे अशी विधानं केली गेली असावीत. यावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही असं शरद पवार म्हणाले.
-
राज ठाकरेंनी काहीतरी बालिश पद्धतीने भाषणात उल्लेख केला. त्याच्यावर काय उत्तर द्यायचं? अजित पवार-सुप्रिया सुळेंबद्दलचा आरोप राजकीय नसून पोरकट आरोप आहे. मी आणि अजित पवार काय वेगळे आहोत का? अशी विचारणा शरद पवारांनी केली.
-
“मी धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी आलो आहे. आज वेगळ्या कारणासाठी आलो आहे. तुम्ही कोणीतरी काहीतरी बोलणार आणि त्याबद्दल विचारणार. त्यांना फार महत्व देऊ नका. माझ्या दृष्टीने धनंजय मुंडेंची प्रकृती जास्त महत्वाची आहे. माझा सहकारी अॅडमिट असून त्याला भेटण्यासाठी आलो आहे. योग्य वेळी उत्तर देईन, त्याची काळजी करु नका. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.
-
“बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंबंधी भूमिका मांडली होती. पण हा भाजपाचा भोंगा आहे. ईडीची कारवाई झाली त्याबद्दल भाजपाने सूट दिली असून त्यानंतर हा भोंगा सुरु झाला आहे. दीड वर्ष हा भोंगा बंद होता,” अशी टीका संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
-
“हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही, ते आमच्या रक्तात आहे. जेव्हा हिंदुत्वावर हल्ला झाला आहे तेव्हा भाजपा आणि त्यांचे भोंगे समोर नव्हते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना हिंदुत्वासाठी लढली आहे. कालची गोष्ट सोडून द्या, रात गई बात गई…दिवा विझताना मोठा होतो आणि तसंच झालं आहे,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.
-
“काही गोष्टींकडे राजकारणात दुर्लक्ष केलं पाहिजे. हा भाजपाचा भोंगा असल्याचं सर्वांना माहिती आहे. जे महाविकास आघाडीसोबत थेट लढू शकत नाहीत ते असे भोंगे लावून माहौल तयार करत आहेत. अशा लोकांना आमच्याविरोधात बोलण्यास लावलं जात असून राजकीय पोळ्या भाजत असतात,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
-
“अल्टिमेटम राज्य सरकारला कोणी देत नाही. अल्टिमेटम देण्याची हिंमत या देशात आणि महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. बाळासाहेबांनी दहशतवाद्यांना अल्टिमेटम दिला होता. अमरनाथ, वैष्णेदेवी यात्रा असो किंवा दहशतवादी कारवाया…अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत राजकारणात, देशात फक्त बाळासाहेबांमध्ये होती,” असं यावेळी संजय राऊत म्हणाले.
-
“ईडीच्या कारवाईबाबत केंद्राकडून अभय मिळाल्याने हा भोंगा वाजू लागला आहे. खोट्या कारवायंविरोधात आम्ही लढत आहोत, आम्हाला चिंता नाही. आमच्या नकला करा, खोटं बोला पण शिवसेना, महाविकास आघाडी भक्कम आहे,” असं राऊत म्हणाले,. तसंच एका वैफल्यातून, निराशेतून असे भोंगे वाजत आहेत असंही ते म्हणाले.
-
दरम्यान राज ठाकरेंनी शिवराळ भाषेवरुन केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “होय…बरोबर आहे. पण ज्यासंदर्भात मी शिवराळ भाषा वापरली त्या शिवराळ भाषेचं कौतुक करायला हवं होतं कारण कालपर्यंत मराठी अभिमानी म्हणून ते मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच तारणहार आहोत, शिवसेना नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यामुळे त्यांनी जर माझ्या शिवराळ भाषेचं कौतुक केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं मराठीप्रेम दिसलं असतं”.
-
“किरीट सोमय्यांविरोधात वापरलेल्या शिवराळ भाषेचा मला आणि शिवसेनेला गर्व आहे. माझी उद्धव ठाकरेंशी यावर चर्चा झाली. किरीट सोमय्यांना मी शिवराळ भाषा का वापरली याचा अभ्यास केला असता तर एक मराठी म्हणून माझी वेदना त्यांना समजून घेता आली असती. याच किरीट सोमय्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची असू नये यासाठी कोर्टात धाव घेतली होती त्यांच्याविरोधात मी शिवराळ भाषा वापरली. हेच किरीट सोमय्या आणि त्यांचे अमराठी बिल्डर्स, फंटर्स यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी सादरीकरण तयार केलं आहे. मुंबई महााराष्ट्रापासून तोडावी, मराठी माणसाचा अधिकार असू नये यासाठी सादरीकरण तयार असून दिल्लीत जाऊन सतत लॉबिंग करत आहेत. किरीट सोमय्या आणि काही बिल्डर्स सूत्रधार आहेत असं समजल्यानंतर तोंडातून शिवी बाहेर पडली असेल तर मराठी जनता मला त्या शिवीबद्दल माफ करेल आणि उत्तेजन देईल. हा शिवसेनेच्या तोंडातून निघालेला अंगार आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.
-
“किरीट सोमय्यांनी घेतलेली मराठीविरोधी भूमिका आणि मुंबई तोडण्यासाठी केलेल्या सादरीकरणाचं समर्थन करणार असाल तर माझ्यावर जरुर टीका करा. तुमची भूमिका बदलली असेल तर किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करा, त्याच्यासमोर झुका आम्हाला काही म्हणायचं नाही. पण मराठी माणूस हे सहन करणार नाही,” असंही संजय राऊतांनी म्हटलं.
-
“किरीट सोमय्या ज्यांना शिवी घालतो असा आक्षेप आहे त्यांना अजून घालणार कारण ते महाराष्ट्रद्रोही आहेत. आयएनएस विक्रांतचा घोटाळा करणारे किरीट सोमय्या प्रिय असतील तर त्यांना बोलवा आणि तुमच्या वतीने एखादं पदक देऊन टाका. तुमचं रत्न म्हणून मिरवायचं असेल तर त्यांच्या गळ्यात ते पदक घाला. हे ढोंग आणि भंपकपणा सुरु आहे. हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. एका द्वेषातून तुम्ही हे सर्व बोलत आहाता. हे तुम्ही बोलत नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावला आहे. तुम्ही फक्त फुंका मारत आहात. महाराष्ट्राच्या जनतेला यात रस नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
-
महाराष्ट्रावर जर कोणी अशाप्रकारे थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक, मराठी माणूस अशाच प्रकारची शिवराळ भाषा वापरेल असा इशारा संजय राऊतांनी दिला. ज्यांना ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर द्यावं असं बाळासाहेब आणि आचार्य अत्रे यांनी सांगितलं होतं. ते आमचे दैवत आहेत, तुमचे नसतील. तुमचे म्हसोबा बदलले असतील. दुसरे शेंदूर लावून फिरत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. तुमची अक्कल दीड वर्ष ईडी कार्यालयात गहाण पडली होती. ती काल सोडवण्यात आल्याने तुमचे भोंगे वाजू लागले आहेत ते महाराष्ट्राची जनता बंद करेल असंही ते म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय बोलले असते अशी खंतही संजय राऊतांनी व्यक्त केली.
-
“कालच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेखच नाही. तुम्ही जय भीमदेखील म्हणाला नाहीत. तुम्हाला अचानक काय झालं? शरद पवारांनी जातीयवाद वाढवला असं सांगता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला हे तुम्हाला माहिती नाही का? आईला सती न जाऊ देता शिवाजी महाराजांनी सगळं कर्मकांड तोडलं हे तुम्हाला माहिती नाही का? दुर्दैवाने तुम्ही पुरंदरेच वाचता. अफजलखानाचा कोथळा काढला त्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. पण त्याचसोबत अफजलखान खाली पडल्यानतंर महाराजांच्या आयुष्यात त्यांच्यावर एकदाच वार झाला. उजव्या खांद्यावर झालेला वार कोणी केला होता? अफजलखानाचा वकील कोण होता हे लपवून का ठेवता? अफजलखानाची सैनिक म्हणून जिजामातेंच्या आदेशाप्रमाणे कबर बांधली होती. पण ज्या माणसाने हल्ला केला होता त्याचं मुंडकं तलवारीवर घेत अख्ख्या गावभर फिरवलं त्याचं नाव तुम्ही का नाही सांगत? त्याचं नाव होता कृष्णा भास्कर कुलकर्णी…हे महाराष्ट्राला काही नाही सांगत? कोण जातीयवाद वाढवतंय?,” अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली.
-
“त्यानंतरच्या इतिहासात जिंकले तर पेशवे आणि हारले तर मराठा हा जातीय मतभेद कोणी निर्माण केला. पेशवे नव्हते असं तुम्ही कसं सांगू शकता. चित्रपट निघतात ते कोणावर निघतात. हे सगळं तुम्ही कधी सांगणार? ते उभं राहून हिडीस तिडीस बोलणं, टिंगळटवाळ्या करणं…तुम्हाला पेट्रोलचे, डिझेलचे, गॅसचे, भाजीपाल्याचे भाव दिसत नाहीत. त्यावर काहीच बोलणार नाही. एवढं भोंग्याबद्दल प्रेम आहे तर कालची सभा तुम्ही का घेतली? जिथे सभा घेतली तिथे एका बाजूला शाळा आणि शिवसमर्थ विद्यालय आहे. सुप्रीम कोर्टाचा नियम १०० मीटरच्या आजुबाजूला कर्णे लावू नये सांगितलं आहे. मग तुमच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही का?,” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
-
“तुम्ही म्हणालात की दाढीच करत नाहीत तर वस्तरा कसा सापडेल…मुसलमान दाढीच करत नाही. तुमचा एक हाजी अराफत शेख नावाच मित्र होता हे विसरलात का..जो सध्या भाजपात आहे. तो मनसेच्या वाहतूक सेनेचा अध्यक्ष होता. त्याच्या बाजूला बसून तुम्ही अनेकवेळा जेवला होतात. तो दाढीच करायचा नाही हे विसरलात का?,” अशी विचारणा आव्हाडांनी केली.
-
“मी २००९ ला मुंब्र्यात गेलो, तेव्हापासूनचा इतिहास चाचपडून पाहा. फक्त दोनदा तेही बाहेरुन आलेले लोक ही अतिरेक्यांच्या रेकॉर्डवर आहेत. तेव्हा राज ठाकरेंनी बोलताना इतिहास जाणून घ्या. तुमच्यासमोर एक मुस्लिम बसला होता त्याचं उदाहरण दिलंत, त्याला दाढी नव्हती का? म्हणजे तुम्ही आता मुस्लिमांना प्रमाणपत्र देणार की देशद्रोही आहेत की देशप्रेमी…हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?,” असं आव्हाड म्हणाले.
-
“तुम्ही इतरांच्या नाकावर, चेहऱ्यावर, रंगावर जाता…म्हणजे तुमच्यात वर्णभेद, जातीवाद किती ठासून भरला आहे ते दिसत आहे. आम्ही आता जर तुम्ही ढोरपुटे झालात, तोंड कसं सुजलंय म्हटलं तर आवडेल तुम्हाला? राजकारणात वैयक्तिक टीका करणं पाप आहे. तुम्ही माझी अक्कल काढलीत..तुम्हा फार हुशार आहात. तुमच्या आजोबांनी प्रतापसिंह राजेवर यांच्यावर लिहिलेलं पुस्तक वाचा,” असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला.
-
“शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधली. पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली,” याची आठवण आव्हाडांनी यावेळी करुन दिली. “शाहू महाराज तर वारसदार होते. दोघेही माझे आदर्श असल्याचं सांगत बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. त्यामुळे तिघांच्या रक्तात, शब्दात, क्रियेत शिवाजी महाराज होते. त्यामुळे या तिघांचं नाव घेणं शिवरायांच्या विचारांचं नाव घेण्यासारखं आहे,” असं आव्हाड म्हणाले.
-
तुम्हाला नेहमी फूट पाडण्याची सवय आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला. शिव्या आम्हीदेखील घालू शकतो फक्त ते आमच्या संस्कारात बसत नाही असंही ते म्हणाले. तुमचं भाषण तुम्हाला लखलाभ असो पण संत तुकाराम महाराजांनी उत्तर जशास तसं द्यायला हवं असं सांगितलं आहे. तुमच्या भाषणावरचे ट्रोल जरा पहा. कौतुकापेक्षा हसत आहेत. तुम्हाला आत लोक जॉनी लिव्हर म्हणत आहेत याची लाज वाटते असं आव्हाड म्हणाले.
-
“पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील शरद पवारांचा फोटो समोर आला ना? उद्धव ठाकरेंच्या घरी गणपतीच्या पाया पडतानाचा फोटो समोर आला ना? तुम्ही म्हणजे इतिहासतज्ञ नाही. तुम्हाला अक्कल आहे असं नाही,” अशी टीका आव्हाडांनी केली.
-
“सुळे घुसले की किती दुखतं ते विचारुन घ्या एकदा…हत्तीचे सुळे कसे घुसतात माहिती आहे ना? आम्हालाही बोलता येतं. पण राजकारणात हे खूप गांभीर्याने, प्रगल्भतेने घ्यायचं असतं. लोकांच्या सुखात भर पडेल, त्यांचे अश्रू पुसायचे असतात…हास्यविनोद करणारे जगात फार आहेत आणपही आहात,” असा टोला आव्हाडांनी लगावला.
-
“त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे की माझं तोडं काहीतरी नागाच्या फण्यासारखं दिसतं. अशा वैयक्तिक कोट्या तर कोणालाही करता येतात. ते मिमिक्री आर्टिस्टचं काम आहे. पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आादर करतो जे महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे, ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे त्यांना मी अरे तुरे करत नाही,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
-
“माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो,” असं प्रत्युत्तर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं.
-
‘‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली आहे. त्यावरही आव्हाडांनी भाष्य केलं.
-
“शाहू, फुले, आंबेडकर हे छत्रपतींच्या विचारांचे वारसदार होते हे यांना कळलंच नाही, कारण यांनी बहुजन समाजाचा इतिहास वाचला नाही. हे नेहमी पुरंदरेंचा इतिहास वाचत गेले. ज्या पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती देऊन आमचया जिजाऊंची बदनामी केली ते यांचे आदर्श. इंग्लंडहून आलेला माणूस आमच्या जिजाऊंची बदानीमी करतो, चारित्र्यावर शिंतोडे उडवतो, चारित्र्यावर संशय व्यक्त करतो…पान नंबर ९३, परिच्छेद क्रमांक ४ यामध्ये काय लिहिलं आहे ते वाचा,” असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.
-
“त्यांनी पुस्तकात १२ लोकांचे आभार मानले असून त्यात एक नाव बाबासाहेब पुरंदरेंचं आहे. मग ही माहिती कोणी दिली? पुस्तक छापण्याआधी वाचण्यासाठी दिलं जातं ते बाबासाहेब पुरंदरेंना वाचता नाही आलं? आज ते मृत आहेत. त्यांचा मी सन्मान करतो, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नव्हतं. मृत्यू झाल्यावर आपण विसरुन जातो, पण तुम्ही आठवण करुन देऊ नका. तुम्ही ज्यांची शिकवण घेऊन शिकलात त्यांची पुस्तकं वाचा,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
-
“जहिर सभा”, “उत्तर सभा” आता वाट “पुरवणी सभेची”. सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न…वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे. प्रश्न राष्ट्रवादीचे उत्तर BJP च्या C टीमचे,” असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका