-
गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून सुरू असलेलं राजकारण आता चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला असून यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भोंगे न उतरल्यास मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान राणा दांपत्याने यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला असल्याने वाद पेटला आहे.
-
राणा दांपत्याने ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दांपत्याला धडा शिकवण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले आहेत. (Express Photo: Amit Chakravarty)
-
शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांसोबत पक्षाचे अनेक मोठे नेतेही उपस्थित आहेत. दरम्यान दुपारी ४.३० च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी मातोश्रीबाहेर आली. शिवसैनिकांची गर्दी पाहून उद्धव ठाकरे तिथेच गाडीतून खाली उतरले आणि हात जोडत शिवसैनिकांचे आभार मानले.
-
“तुम्ही कृपा करुन सगळ्यांनी घरी जा. इकडे कोणी हिंमत करणार नाही. तुम्ही दिवसभर इथे आहात त्यामुळे घरी जा,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना केले.
-
यावेळी अनेक मोठे नेतेही उपस्थित होते.
-
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं असलं तरी शनिवारी राणा दांपत्याने मातोश्रीसमोर येण्याचं आव्हान दिलं असल्याने शिवसैनिकांनी रात्री जागता पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
राणा दांपत्याला पोलिसांची नोटीस
उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं त्यांनी राणा दांपत्याने जाहीर केलं होतं. यानंतर त्यांना अमरावतीमध्येच रोखण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न होता. पण त्यांना गुंगारा देत राणा दांपत्य रात्रीच मुंबईतील खास निवासस्थानी दाखल झालं होतं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खेरवाडी पोलिसांनी राणा दांपत्याला त्यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली. -
शनिवारी हनुमान चालिसा पठण कऱणार
अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “महाराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या मुक्तीसाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचं नाव घेत वारंवार मत मागितली आहेत. पण तेच आता हिंदुत्वाचा विरोध करत आहेत. राज्यातील सत्ता मिळताच त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना जागं करण्यासाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत. उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणार आहोत”. -
“बाळासाहेब ठाकरे आता हयात असते, तर त्यांनी आमचं स्वागत केलं असतं. एकवेळ नव्हे तर, शंभर वेळा हनुमान चालिसा पठण करा, असं ते आम्हाला म्हणाले असते. पण शिवसेनेला सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडला आहे. याचीच जाणीव करून देण्यासाठी आम्ही उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहोत. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही”, असं रवी राणा म्हणाले.
-
दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहारचे कार्यकर्ते शिवसैनिकांसोबत असतील असं सांगितलं आहे.
-
“खरं तर अतिशय मूर्खपणा आहे. कोणते मुद्दे घ्यावेत याचं कोणतंही भान राणांना राहिलेलं दिसत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु आहे. शिवसेनेने जे आव्हान दिलं आहे त्यामध्ये आम्हीदेखील त्यांच्यासोबत आहोत. प्रहारचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत असतील,” असं बच्चू कडू यांनी सागितलं आहे.
-
“या जिल्ह्याचे ते खासदार, आमदार आहेत. त्यांचा अपमान होऊ नये असं आम्हाला वाटतं. सामान्य माणसाशी संबंध नसलेले मुद्दे घेऊन आपला अपमान कऱण्याच्या सोयीने ते जात आहेत. उलट निवडून येताना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत. ही मतदारासोबत फार मोठी बेईमानी आहे,” अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
-
“मूळ विषय सोडून जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल याचं भान न ठेवता मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी जात आहेत. यांची इतकी उंची नाही की मातोश्रीवर जातील,” असा टोला त्यांनी लगावला.
-
“ज्या विचारधारेवर निवडून आले ती कायम ठेवली नाही उलट त्यावर आक्रमण करत आहेत. शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही,” असा इशारा यावेळी बच्चू कडूंनी दिला आहे.
-
“वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं,” असंही यावेळी ते म्हणाले.
-
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडुन आलात हे विसरु नका. निवडणुकीच्या वेळी तुमचा बाप दुसरा होता आणि आता तुमचा बाप बदलला आहे. ही नालायकी थाबवा,” अशा शब्दांत त्यांनी राणा दांपत्यावर निशाणा साधला.
-
“भोंग्याने देशाचा विकास होत नाही. हनुमान चालिसा म्हणा हे राणा दांपत्य ठरवणारं कोण? उद्या संघर्ष झाला तर शिवसेना आणि प्रहार सोडणार नाही,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
-
(Photos: Video Grab/Express/File)

३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत…; मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ट्रोलिंगवर म्हणाला, “मी ज्या झोपडपट्टीतून…”