-
कला, कलाकार व संस्कृतीचे देशाच्या सांस्कृती व कलाविश्वाच्या वैभवात भर घालणारे झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय पुण्यात होत असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १९ मेपासून ते सर्वांसाठी खुले होत आहे, अशी माहिती झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाचे संस्थापक व पीएनजी सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ यांनी दिली.
-
अजित गाडगीळ यांनी पुण्यात खडकवासला धरणाजवळ एडीए पीकॉक बेच्या पुढे कुडजे येथे कला व संस्कृतीचे व्यासपीठ झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय स्थापन केले आहे. या ठिकाणी चित्र-हस्त-शिल्प कलेबरोबर ललित कलेसाठी व्यासपीठ, कार्यशाळा, चर्चासत्र यांच्याबरोबर प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत. तसेच, येथे देशातील विविध भागांतून गाडगीळ यांनी गोळा केलेल्या पुरातन कलात्मक वस्तू, वारसा असणाऱ्या वस्तू, शिल्प येथे आहेत. तब्बल आठ एकरांत असणाऱ्या झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयात ८ कलादालने आहेत. प्रत्येक दालनाचे वैशिष्ट्य आहे.
-
येथे २०० वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रीयन दागिने, चांदीच्या जुन्या कलात्मक वस्तू, नाणी, १५० वर्षांपूर्वीच्या ३०० पैठण्या-शेले-फेटे-टोप्या, लहान मुलांचे पोषाख, विविध राज्यांतील पुरातन वस्त्रे, दुर्मीळ-वारसा असणाऱ्या वस्तू, विविध प्रकारचे दिवे, पुतळे, पोथ्या, ताम्रपट, टिन टॉइज, मुगल चित्रकला, राजा रविवर्मा लिथोग्राफ्स पासून ते मॉडर्न आर्टमधील एम.एफ हुसेन आदींनी काढलेली मूळ चित्रे येथे पहायला मिळतील. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बरवे यांचे स्वतंत्र दालन असून, येथील प्रत्येक कलादालनाचे क्यूरेशन त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांसाठी येथे स्वतंत्र दालन असून, त्याअंतर्गत जयंत जोशी यांनी काढेल्या अबस्ट्रॅक पेंटिंग व फोटोग्राफचे पहिले प्रदर्शन येथे भरविले आहे.
-
वर्ल्ड टेक्स्टाइल आर्ट सुरू होऊन २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतात पहिल्यांदा टेक्स्टाइल आर्ट बिनाले पुण्यात झपूर्झा येथे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये करण्याचा मानस आहे. येथे टेक्स्टाइल आर्टमधील जागतिक पातळीवरील कलाकार सहभागी होत असून, यात पारंपरिक ते मॉडर्न टेक्स्टाइल आर्ट पाहता येईल. तसेच, या दरम्यान चर्चासत्र, प्रशिक्षण होणार आहे, असे अजित गाडगीळ यांनी सांगितले.
-
कला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना समर्पित असून, येथे एम. एफ. हुसेन, प्रभाकर बरवे, एस. एस. बेंद्रे, राजा रवि वर्मा, रविंद्रनाथ टॅगोर, रझा, सुझा, आरा आदींची चित्रे आहेत.
-
दिव्याला भारतीय संस्कृतीत खूप मोठे स्थान आहे. आदिमानवापासून सुरू झालेल्या दिव्याचा प्रवास आधुनिक काळातील बॅटरीवरील दिवे, एलईडी दिव्यापर्यंत पोचला आहे. येथे २० व्या शतकापासून ते आजपर्यंतचे दिवे येथे पहायला आहेत.
-
छपाईला सुरुवात झाल्यावर लिथोग्राफ्सचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. तसाच तो भारतातही. राजा रवि वर्मा यांचा लिथोग्राफचा प्रेस पुण्याजवळ मळवली येथे होता. भारतात त्यांनी काढलेली चित्रे लिथोग्राफच्या रूपात त्या काळी उपलब्ध होती. या ठिकाणी राजा रवि वर्मा यांच्या चित्रांच्या लिथोग्राफ्सपासून, विविध कंपन्यांच्या जाहिरातींचे, चित्रपटांच्या पोस्टरचे लिथोग्राफ आहेत.
-
प्रभाकर बरवे यांना महाराष्ट्रात मॉडर्न आर्टसाठी खूप मोठे काम केले आणि त्यांना समर्पित येथे ही गॅलरी आहे. या ठिकामी बरवे यांनी काढलेली विविध चित्रे ठेवण्यात आली आहेत.
-
वस्त्रांसाठी हे स्वतंत्र दालन असून, या ठिकाणी १५०-२०० वर्षांच्या पैठण्या, शैले, उपरणे, फेटे, लहान मुलांचे कपडे व त्यांची विशेषता येथे असेल. तसेच, पारंपारिक पद्धतीने वस्त्र विणण्याची पद्धत येथे दाखविण्याचा विचार आहे.
-
पीएजी सन्स गेल्या सहा पिढ्यांपासून दागिने व्यवसायात असल्याने त्यांनी स्वतःकडील व गोळा केलेल्या अनेक चांदीच्या वस्तू, दागिने येथे ठेवले आहे. त्यात प्रामुख्याने २०० वर्षांपूर्वीचे पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने असून, जुन्या अत्तर-गुलाब दाण्या, चहाचे सेट, पानाचा डबा, दिवे, देवांच्या मूर्ती, कलात्मक कलश, भातुकलीचा खेळ आदी ठेवण्यात आले आहे.
-
महाराष्ट्रातही चांगले कलाकार झाले आहेत. मात्र, लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळेच महाराष्ट्राच्या महान कलाकारांसाठी येथे गॅलरी असून, त्यांची चित्रे येथे ठेवण्यात आली आहेत. त्यात म. वि. धुरंधर, ग. ना. जाधव, अबलाल रहमान, बाबूराव पेंटर, रविंद्र मिस्त्री, शंकर पळशीकर, व्ही. ग. कुलकर्णी, माधव सितावलकर आदींचा समावेश आहे.
-
या ठिकाणी ही महाराष्ट्रातील कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथे सातत्याने नवी प्रदर्शने पाहयला मिळतील. पहिले प्रदर्शन जयंत जोशी यांनी काढलेल्या अबस्ट्रॅक चित्रे व फोटोग्राफचे आहे.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”