-
पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चौफेर टोलेबाजी केली.
-
यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार, उद्धव ठाकरे, अकबरुद्दीन ओवेसी, राज्य सरकार, स्थगित झालेला अयोध्या दौरा अशा विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.
-
विशेषत: अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरेंच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागलं होतं. त्यावर राज ठाकरेंनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली.
-
सभेच्या सुरुवातीलाच साताऱ्यातील शरद पवारांच्या पावसातील सभेचा संदर्भ देत नाव न घेता त्यांनी टोला लगावला. “सभास्थळासाठी नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा” असं राज ठाकरे म्हणाले.
-
ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली, तेव्हा पुण्यात अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही वगैरे. एक वेळ अशी आली की मला लक्षात आलं की हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकायला नको.
-
ज्या प्रकारचा माहौल अयोध्येत उभा केला जात होता…मी उद्या जर तिथे जायचं ठरवलंच असतं, तर महाराष्ट्रातून अनेक बांधव तिथे आले असते. तिथे जर काही झालं असतं, तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि हकनाक काही कारण नसताना तो ससेमिरा तुमच्या पाठिशी लावला असता. म्हटलं मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी.
-
मी म्हटलं जर मशिदीवर बांग जोरात लागली तर त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावा. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का? त्यांना अटक केली. मधु इथे आणि चंद्र तिथे असे अटक झाले.
-
शिवसेनेकडून राणा दाम्पत्याला वाट्टेल ते बोललं गेलं. एवढा राडा झाल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही?
-
मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो.
-
रेल्वे भरती आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. हे सगळं प्रकरण तिथून सुरू झालं.
-
यावेळी आंदोलन अर्धवट सोडल्याच्या टीकेवर राज ठाकरेंनी उत्तर दिलं. मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोलनाक्याच्या आंदोलनानंतर ७० टोलनाके महाराष्ट्रातले बंद झाले. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही का? मुंबईत बॉलिवुडमध्ये पाकिस्तानी कलाकार येत होते. या देशातून हाकलून दिलं त्यांना. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे?
-
परवा मुख्यमंत्री म्हणाले, “संभाजीनगरचं नामांतर झालं, नाही झालं फरक पडत नाही. मी बोलतोय ना”. तू कोण आहेस? मी बोलतोय याला काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रात सरकार होतं, आजपर्यंत संभाजीनगरचा प्रश्न मिटवला का? कारण तो सतत निवडणुकांसाठी जिवंत ठेवायचा आहे.
-
यांच्या राजकारणासाठी, हिंदु-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. एमआयएम सतत हिंदुंविरोधात बोलत राहिली पाहिजे. ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. यांच्या लक्षात आलं नाही की आपण एक राक्षस वाढवतोय. म्हणता म्हणता यांच्या राजकारणात एमआयएमचा खासदार झाला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली.
-
काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय.
-
भोंग्यांचं आंदोलन एका दिवसाचं नाही. या गोष्टीला सातत्य नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला तपासत आहेत. हे विसरले, की हळूहळू आवाज वर यायला सुरू होणार. आत्ता सुरू केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका.
-
येत्या १ तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, की आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही. म्हटलं आपणच सांगितलेलं बरं. पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन-चार आठवडे रिकव्हरीसाठी जातील. त्यानंतर महिना-दोन महिन्यांनी पुन्हा तुमच्यासमोर येईन.

Tanisha Bhise Death Case : “होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”