-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
“इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही,” असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारकडे जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.
-
शरद पवार म्हणाले, “काही लोक प्रश्न उपस्थित करतात की ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? एवढी लोकसंख्या आहे की नाही याबाबत शंकाही व्यक्त करतात. एकदा जनगणना करून टाकुयात, एकदा कळू द्या देशाला की नक्की ओबीसींची संख्या काय आहे. ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करावी.”
-
“इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही. जो न्यायाचा अधिकार आहे तो न्यायाचा अधिकार मिळाला पाहिजे. तो किती न्याय मिळावा हे सांगायचं असेल, ठरवायचं असेल तर या प्रकारची जनगणना केली पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
-
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याची जोशी यांनी एका ठिकाणी बोलताना जातीनिहाय जनगणना मला अजिबात मान्य नाही असं सांगितलंय. का नको तर यांचं कारण सांगताना त्यांनी समाजातील एकीवर प्रहार होईल असं कारण सांगितलं, चुकीचं वातावरण निर्माण होईल. सत्य समोर आलं तर चुकीचं वातावरण निर्माण होतं का?” असा सवाल शरद पवार यांनी विचारला.
-
“जर कुणाला वाटत असेल की जातीनिहाय जनगणनेने अस्वस्थता निर्माण होईल तर ही अस्वस्थता निर्माण करण्यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका गेत शरद पवार यांनी जातीनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला.
-
राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनाला शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे असे दिग्गज नेते उपस्थित होते.
-
या सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठी एकत्रित येण्याचं आवाहन केलं.
-
तसेच ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर उतरू, असा संकल्प जाहीर केला. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्राने जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी करणारा ठराव देखील करण्यात आला.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”