-
आत्तापर्यंत २०२२ हे वर्ष काँग्रेससाठी आव्हानात्मक असंच ठरलं आहे. या वर्षात आत्तापर्यंत काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
-
नुकतंच ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि पक्षाच्या थिंक टँकपैकी एक गणले जाणारे कपिल सिब्बल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं जाहीर केलं. एवढंच नवे, तर त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. कपिल सिब्बल हे काँग्रेसमधील जी-२३ गटाचे सदस्य होते. त्यामुळे या गटाला देखील मोठा धक्का बसला आहे.
-
गेल्या वर्षी पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सत्ता देखील काँग्रेसने गमावली आहे. मात्र, अजूनही पंजाब काँग्रेसमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचंच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखर यांनी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यावरून स्पष्ट झालं आहे. जवळपास ५० वर्षांपासून पक्षासोबत असणारे जाखर यांनी माझा आवाज काँग्रेसमध्ये दाबण्यात येत असल्याचं सांगत पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणले.
-
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत कायदामंत्री असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्विनी कुमार यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला आहे. मला पक्षात अस्वस्थ वाटत होतं. गेल्या काही महिन्यांत मला दुर्लक्षित केलं जात होतं. त्यामुळे आता माझी पक्षाला गरज नसल्याचं मला लक्षात आलं. मला जे हवं होतं, ते मला करता येत नव्हतं. आता पक्ष सोडल्यानंतर मला ते करता येणार आहे, असं सांगत अश्विनी कुमार यांनी राजीनामा दिला.
-
उत्तर प्रदेश निवडणुकांच्या काही दिवस आधीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रतनजीत प्रताप सिंग यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेससमोरचा पेच अजूनच वाढला.
-
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला बसलेला सर्वात मोठा फटका म्हणजे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी दिलेला राजीनामा. काँग्रेसचे गुजरात कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या हार्दिक पटेल यानी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसला रामराम ठोकत जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच, एका मुलाखतीमध्ये त्यांनी भाजपामध्ये जाण्याचा पर्याय का असू नये? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे हार्दिक पटेल भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका