-
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.
-
संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिवसेनेनं पक्षाकडून निवडणूक लढवण्याची अट घातल्यामुळे पेच निर्माण झाला.
-
संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितल्यामुळे शिवसेनेनं संजय पवारांना उमेदवारी दिली आणि संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
-
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजेंनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर टीका करतानाच मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे आपल्याला फार दु:ख झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
-
मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी माझा दिलेला शब्द मोडला. स्वराज्य बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे.
-
लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी स्वराज्यच्या माध्यमातून उभा राहणार आहे.
-
शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्षात प्रवेश करा आणि खासदार व्हा. पण मी सांगितलं होतं की मी जाणार नाही.
-
मला कल्पना आहे की यात नक्कीच घोडेबाजार होणार. घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण ते होताना दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही. पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे.
-
मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आपण दोघांनी तिथे जाऊ. दोघांनी शिवाजी महाराजांचं स्मरण करु. जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगाल ते खरं.
-
दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले होते. आमची बैठक ओबेरॉयमध्ये झाली. त्यांनी दोघांनी मला सांगितलं की शिवसेनेची इच्छा आहे आपण शिवसेनेत प्रवेश करावा, उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी जाहीर करतो. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही.
-
मी त्यांना म्हणालो की शिवसेनेच्या माध्यमातून मला महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार करा. उद्धव ठाकरेंनी विचार केला. त्यांनी सांगितलं की राजे ते शक्य होणार नाही. पण महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनापुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करू शकतो. ही वाक्य मुख्यमंत्र्यांची आहेत. मी ते मान्य केलं नाही.
-
आमची बैठक झाली मंत्र्यांच्या घरी. तिथून आम्ही ओबेरॉयला गेलो. ड्राफ्ट तयार झाला. मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि माझ्या सूचना या एकत्र करून ड्राफ्ट तयार झाला. मंत्र्यांच्या अक्षरात हस्तलिखित आहे. माझ्या मोबाईलमध्ये तो ड्राफ्ट आहे.
-
मंत्र्यांनी हा ड्राफ्ट फायनल असल्याचं सांगितलं आणि मंत्री तिथून निघून गेले. मी तिथून कोल्हापूरला निघालो. तिथे जाताना मला बातम्या दिसल्या की वर्षावर शिवबंधन, उद्या प्रवेश करणार वगैरे. कोल्हापुरात गेल्यानंतर समजलं की संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली.
-
२००९ प्रमाणेच पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी मी सज्ज आहे. आता संघटित तर होऊ देत. मला माझी ताकद बघायचीये. मला लक्षात आलं नाही की माझी ताकद ४२ आमदार नाही. माझी ताकद जनता आहे. म्हणून मी जनतेला भेटायला जाणार आहे.
-
संजय राऊत फार मोठं व्यक्तिमत्व आहे. मी त्यांच्याशी का बोलू. ते एवढे मोठे आहेत की मी त्यांच्याशी का बोलू. मला बोलायचं असेल, तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलेन. कारण त्यांनी मला शब्द दिला होता. त्यांनी उद्या मला काही विचारलं, प्रतिक्रिया दिली, तर मी बोलेन.
-
दरम्यान, संभाजीराजेंच्या या भूमिकेवर शिवसेनेकडून अरविंद सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार, विचार घेऊन चालते. सुदैवाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे दिलेला शब्द मोडला असं कधीच घडलं नाही. या उमेदवारी प्रकरणावरून कुठेच एकदाही अशी बातमी आली नाही की शिवसेना पुरस्कृत उमेदवार उभा करणार आहे, असं ते म्हणाले.
-
राजांबद्दल मला आश्चर्य वाटतं की त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. आम्ही काय अस्पृष्य होतो का? तुम्ही तुमच्या विचारांशी ठाम असाल, तर आम्हीही आमच्या विचारांशी ठाम राहणार, असंही अरविंद सावंत म्हणाले.
-
संभाजीराजेंबद्दल आदर ठेवून सांगतो. तुम्ही खरंच एक नामी संधी घालवली. सातारची गादी बघा कशी फिरली. ती राष्ट्रवादीत होती, नंतर भाजपात गेली. पण गादीबद्दलचा आदर कधी कमी झाला नाही. तो तुमच्याबद्दलचाही कधी कमी होणार नाही, असंही सावंत म्हणाले.
-
दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही