-
टाळेबंदीच्या काळात अमेरिकेमध्ये वास्तव्यास असताना चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांनी कलेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा जागृत केली. ‘कार्त दे विझीत’ या त्यांनी चितारलेल्या व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन शुक्रवारपासून पुण्यात भरविण्यात येत आहे.
-
चारकोल पेपरवरील चित्रांच्या या प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, इरफान खान, सचिन तेंडूलकर, कपिल देव, मधुबाला, श्रीदेवी यांच्या चित्रांसह १२० व्यक्तिचित्रे पुणेकरांना पाहता येणार आहेत, अशी माहिती शुभदा सहस्रबुद्धे यांनी दिली.
-
गेली २३ वर्षे अमेरिकेमध्ये असलेल्या सहस्रबुद्धे सध्या पद्मावती येथे वास्त्यव्याला आहेत. अमेरिकेमध्ये असताना त्यांनी ही सर्व चित्रे साकारली आहेत.
-
सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘करोना काळात ‘स्केच अ डे’ या संकल्पनेतून सलग १४० दिवस विविध देशातील प्रभावी व्यक्तीमत्त्वाचे चित्र मी काढले. या संकल्पनेतून केवळ सकारात्मकतेचा प्रसार झाला आणि जगभरातील लोकांशी मी जोडले गेले.”
-
“प्रत्येक चित्रासाठी अडीच तासांची मुदत देत मी स्वत:ला आव्हान दिले. डोळे, नाक, कान, ओठ ही प्रत्येकाची वैशिष्ट्ये सारखीच असतात. परंतु, बारीकसारीक बदलामुळे चेहऱ्याची ओळख पूर्णपणे बदलते. माझ्यासाठी चेहऱ्यावरचे भाव चित्रामध्ये आणण्याला सर्वोच्च प्राधान्य होते,‘ असंही त्या म्हणाल्या.
