-
शिवसेनेच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत शिवसेनेचे सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीच्या अग्नीपथ योजनेपासून सोमवारी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीपर्यंत सर्वच मुद्द्यांवर तुफान टोलेबाजी केली.
-
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सतर्कतेचा उपाय म्हणून सर्व आमदारांना मुंबईच्या वेस्टइन हॉटेलमध्ये ठेवलं आहे. इथे कालपासून आमदारांसोबत चर्चा आणि खलबतं सुरू आहेत.
-
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद निवडणुकीची अजिबात चिंता वाटत नसल्याचं नमूद केलं. “मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मी चिंता करत बसलो, तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलंय त्याचा उपयोग काय? हारजीत होतच असते. उद्या तर जिंकणारच आहोत. त्याची चिंता नाही.”
-
राज्यसभेच्या निवडणुकीत आपलं एकही मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोणतं? तोही अंदाज लागला आहे. हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल. मला फाटाफुटीची शक्यता अजिबात वाटत नाही. आता शिवसेनेत असा गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
-
आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवलं आहे.
-
बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको”.
-
“उद्याच्या निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावी लागते. तशी ती ठेवली आहे. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, खासदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे.”
-
“उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवायचं आहे”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
-
“सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपाकडे. पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे”, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
-
दरम्यान, आपला पक्ष पितृपक्ष असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. “माझा पक्ष तर पितृपक्षच आहे. कारण माझ्या पित्यानंच हा पक्ष स्थापन केला आहे”, असं त्यांनी नमूद केलं.
-
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचं कौतुक करतानाच शिवसैनिकांना अप्रत्यक्ष साद घातल्याचं बोललं जात आहे. “सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोघांना मी विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही. पण कुठेही धुसफूस न दाखवता दोघेही उत्साहाने आज आपल्या स्टेजवर आहेत. याला म्हणतात शिवसैनिक”, असं ते म्हणाले.
-
“मी जे बोलेन तो आदेश समजून आजही देसाई आणि रावते काम करतायत हा त्यांचा मोठेपणा आहे. एखादी संधी दिली नाही, दुसरी दिली तरी त्या संधीचं सोनं करणारे शिवसैनिक असतात”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.
-
“फक्त उद्धव ठाकरे नावाला दीड दमडीची किंमत नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर समोरचा माणूस आदरानं उभा राहातो. मला कुणी मुख्यमंत्री म्हटलं, नाही म्हटलं तरी फरक पडत नाही. पण माझं नाव कुणीच काढून घेऊ शकत नाही”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
-
अग्नीपथ योजनेवरून त्यांनी केंद्रावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. “ह्रदयात राम आणि हाताला काम हे हिंदुत्व मी म्हणालो होतो. आज तेच चित्र देशात दिसत आहे. हातात काम नसेल, तर नुसतं रामराम म्हणून काहीही उपयोग नाही”, असं ते म्हणाले.
-
“वचनं अशी द्यायला पाहिजे. जी पूर्ण करू शकू. शिवसेनेनं आजपर्यंत एकही अशी गोष्ट सांगितली नाही जी पूर्ण केली नाही. अचानक काहीतरी योजना आणायची, त्याला नाव अग्नीपथ असं मोठं द्यायचं”, असाही टोला त्यांनी लगावला.
-
भाडोत्री सैन्य हवं असेल, तर भाडोत्री राज्यकर्तेही आणा. नाहीतरी पाच वर्षांचंच आपलं काम आहे. त्यानंतर पुन्हा एक्स्टेन्शनसाठी मतं मागायला जावंच लागतं, असंही ते म्हणाले. (सर्व छायाचित्रे संग्रहीत)
![Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025 Due to Lower Back Injury](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Jasprit-Bumrah-Ruled-out-of-Champions-Trophy.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा